श्रेष्ठ मूल्यांचे कर्माचरण, हेच परमेश्वराचे पूजन……. ‌

SHARE:

प्रत्येकाला प्राप्त झालेले जीवन अतिशय मर्यादित आहे. कोणत्या वेळी काय होईल हे काहीच सांगता येत नाही. म्हणून प्राप्त झालेल्या मर्यादित आयुष्याचा उपयोग विधायक पद्धतीने होणे आवश्यक आहे. जीवनात निकोप दृष्टिकोन वर्धिष्णू व्हावा हा विचार करायला हवा.

 

संत प्रबोधन करतांना वारंवार सांगतात,..
घटका गेली पळे गेली , तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो, राम कारे म्हणाना..
काळ पुढेच सरकत असतो. त्यामुळे वेळेचे महत्त्व जाणून, सतकार्याला लागणे आवश्यक आहे. मंदीरात गेल्यावर देवापुढे विनम्र होऊन, सर्व भावे शरण जाणे आणि मग देवाला, प्रपंचातील विविध समस्या मिटाव्या म्हणून काहीतरी मागणी करणे ही मानवी मनाची दुर्बलता आहे. दुःख बांदवडी अशा संसारात वारंवार दुःखाची अनुभूती होते. अशावेळी दुःख पेलण्याचे सामर्थ्य देणारे, विश्वप्रभू आहेत. त्या प्रभूचे भावपूर्वक ध्यान, चिंतन, मनन करणे आणि सामाजिक जीवनात सदाचारण करणे हेच परमेश्वराचे खरे पूजन आहे. मनातील स्वार्थी, लोभी विचार नष्ट झाल्याशिवाय, विश्व प्रभू दर्शन देत नाहीत हे संत महात्म्यांनी वारंवार प्रकट केले आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली ग्रंथ ज्ञानेश्वरीत म्हणतात….
थोरपण पर्हा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे जै जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी..
या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीनुसार लौकिक दृष्ट्या अति नम्र आणि रिक्त होऊन, प्रभुजवळ गेले पाहिजे. अयोध्येतील मंत्री सुमंत याच पद्धतीने श्रीरामा जवळ गेले. श्रीराम भेटीला जातांना प्रधान सुमंताने 07 प्रकारचे दरवाजे ओलांडले. तेव्हां कुठे श्रीराम प्रभूची भेट झाली. पहिल्या दरवाज्यात सुमंताने रथ सोडला. दुसऱ्या दरवाज्यात सोबत नेलेली छत्र चामरे, तिसऱ्या दरवाज्यात पादत्राणे सोडली. चौथ्या दरवाज्यात अर्थ, पाचव्या दरवाज्यात स्वार्थ, सहाव्या दरवाज्यात मी तू अहंभावाचा त्याग केला….

तेव्हाची भेटले श्रीराम मुख्य परमार्थ या नाव…. मी पण टाकल्याशिवाय ईश्वराची जवळीक होत नाही. अहंभाव गेला, तुका म्हणे देव झाला. जीवनाच्या सार्थकतेसाठी सदाचारण करावे, सामाजिक जीवनात सद्विचारांचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा..‌ असे केले तर आपले सुंदर जीवन गुणात्मक दृष्ट्या अधिक फुलेल. सुख सगळ्यांचे ते सुख माझे, विवेक काही करता यावा, ते अवलोकन ते सावधपण, सदाचार हा सवयीचा व्हावा…

आपण व्यवहारी माणसे धनसंपदेच्या मागे, प्रतिष्ठे मागे, प्रसिद्धीसाठी तोंडात फेस येईपर्यंत सारखे धावत असतो. एक धावतो म्हणून दुसरा धावतो. जगामध्ये सारखी धावा धाव सुरू आहे. धावणाराला कुठे थांबावे, हेच कळेनासे झाले आहे. जीवनात थकून गेल्यानंतर, शेवटी मग ईश्वराचे स्मरण आपण करतो. उशिरा सुचलेले हे शहाणपण असते. आज इमारतीची उंची वाढली परंतु माणसाची उंची कमी होत आहे. प्राप्त जीवनात संतांचा विचार जोपासल्याशिवाय जीवनाचा मार्ग आनंददायी होणार नाही हे लक्षात असू द्या. म्हणूनच समर्थ म्हणतात… सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी तोची तो मानवी धन्य होतो.. हाच परमार्थाचा श्रेष्ठतम विचार आहे. संपूर्ण गीतार्थचे सार असणारा श्लोक आहे.

योगेश्वर श्रीकृष्ण सांगतात हे अर्जुना, माझ्यासाठीच कर्म करणारा, मत्परायण आणि माझा भक्त संपूर्णपणे आसक्ती रहीत जीवन जगतो. आणि तोच भक्त मला प्रिय असतो.

मत्कर्म कृन्मत परमो, मद्भक्ता संग वर्जिता, निर्वैर..
सर्वभूतेषु, या समामेती पांडवा…
भगवद्गीता ११.५५.
संत चरणरज.

 

लेखक –
डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
संत साहित्य उपासक, शेगाव.
संपर्क – ९४०४५५३५०५

डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
Author: डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे

लेखक डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील, से. नि. शिक्षण केंद्रप्रमुख असून, संत साहित्याचे व्यासंगी उपासक आहेत. महाराष्ट्रातील विविध दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रे, मासिके आणि वार्षिक अंकात त्यांचे ४५० लेख प्रकाशित झाले आहेत. संत साहित्याचे मंथन करून, शब्दांकित केलेला चिंतन ग्रंथ ही प्रकाशित झालेला आहे. सखाश्री आध्यात्मिक साहित्य मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा प्रदान केलेली आहे. त्यांचे साहित्य लेखन सेवा कार्यआजही सातत्याने सुरूच आहे. एम. ए. एम. एड् साहित्य विशारद, पीएच.डी. उच्च पदवी प्राप्त मिरगे सर, उत्कृष्ट किर्तन प्रवचन कार असून, त्यांनी विदर्भ क्षेत्रात गेल्या ४० वर्षात, कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता, ५०० च्या वर कीर्तन, प्रवचन सेवेचे कार्यक्रम सादर केले आहेत. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार २००१, महामहिम राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते, त्यांना प्राप्त झाला असून, भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. शिक्षण, साहित्य, सामाजिक सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल, महाराष्ट्र शासन, विविध सेवाभावी संस्था, समाज मंडळांच्या वतीने, एकूण १८ दर्जेदार पुरस्कारांनी ते गौरवान्वित आहेत.. महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा, उत्कृष्ट लेखन कार्याचा दर्जेदार, अध्यात्मिक वांग्मय पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. विनम्र, सेवाभावी, गुणवंत, प्रज्ञावंत, उत्कृष्ट अध्यापक म्हणून ते आजही समाजप्रिय आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा