नास्तिक होणं सोपं नसतं.!

SHARE:

हा प्रवास खूप कष्टाचा आणि नवे भान स्वतःमध्ये निर्माण करण्याचा असतो!!

नास्तिक होण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागत असेल तर स्वतःशीच भांडावं लागतं.
स्वतःच्या विचारांवर वार करावे लागतात. स्वतःलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून पिंजून काढावं लागतं. लहानपणापासून मोठे होईपर्यंत मनात ठेवलेले विचार आणि समजूती यांची झाडाझडती करावी लागते.

नास्तिक म्हणजे आपल्याला हे समजणं की आपले विचार आणि आपल्या समजूती या आपण न तपासता आपल्या डोक्यात ठेवून टाकलेल्या आहेत. जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा नास्तिकतेचा दरवाजा उघडतो.
ज्यांना आयुष्यभर असे वाटत राहते की आपलंच बरोबर आहे.. आपल्या संस्कृतीचंच बरोबर आहे.. तेव्हा आपण प्रश्न विचारायचे सोडून देतो. आणि जैसे थे परिस्थिती आहे ती स्वीकारतो.
हे विचारांचा साचलेपण आणि तुंबलेपण म्हणजेच आस्तिकता. जसे की, “अज्ञात शक्ती आहे” असं आजूबाजूचे सर्व म्हणत असतील तर आपणही हो म्हणणे.
म्हणजे परंपरेने सांगितलेलं ते सर्व सत्य आहे एवढेच डोक्यात ठेवणं असतं.

नास्तिकता म्हणजे परंपरेतील शहाणपण आणि वेडेपण दोन्ही तपासून बघणं आणि वेडेपणावर प्रहार करत आपण ते न स्वीकारणं.

नास्तिकता म्हणजे आपणच आपल्याशी भांडत असताना आपलं म्हणणं अचूक करण्याचं कौशल्य हस्तगत करणे. आपलं म्हणणं आणि आपले विचार चूक की बरोबर हे ठरवण्यासाठी कुठल्यातरी अज्ञात शक्तीची मदत न घेता तर्काची मदत घेणं. म्हणजे आपल्या समजूती घासून पुसून स्वच्छ करणे. त्यातली घाण काढून टाकणे. आणि स्वच्छ केल्यावर कोणीही त्याला प्रतिप्रश्न केला तरीही त्यातील चूक न निघणे. अचूक विचार करणं हे नास्तिकतेचं धन आहे.

नास्तिकता म्हणजे जगाशी उभा दावा करणे! आजूबाजूला सारे जण जेव्हा आपल्या दोष असलेल्या समजूती सोडायला तयार नसतात तेव्हा आपण स्वतः वर्षानुवर्षे बाळगलेल्या समजुती सोडून देण्याचा निश्चय केलेला असतो. आणि या आपल्या निश्चयावर प्रहार करणारे आजूबाजूचे लोक कितीही असले तरी त्यांच्याबरोबर झुंजत राहणं म्हणजे नास्तिकता.

नास्तिक्य हे एका रात्रीत निर्माण होत नाही. कारण दोन्ही पातळ्यांवर सतत संघर्ष करावा लागत असतो. स्वतःशी संघर्ष आणि समाजाशी संघर्ष!! संघर्ष करणे हा नास्तिकतेचा गाभा आहे. म्हणूनच आयुष्यात आलेल्या कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देताना अज्ञात शक्ती आठवत नाही. तर, संघर्षातून आपण शिकलेल्या कौशल्यांचा वापर करणे एवढेच आठवतं आणि आपण त्यातून बाहेर पडतो. नास्तिकता ही या संघर्षातून एक गोष्ट आपल्यामध्ये निर्माण करते. ती म्हणजे सहनशीलता. जो लोकशाहीचा गाभा आहे.

लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. नाहीतर.. “मी म्हणतो तेच खरे” ही हुकूमशाही आपल्यामध्ये रुजेल.
सहनशीलता याचा अर्थ आपण सृष्टीचे विचारांचे व्यक्तींचे वैविध्य मान्य करणे आणि त्याचा वास्तवात स्वीकार करून त्याच्यावर काम करणे. यातूनच नम्रपणा व साधेपणा निर्माण होतो.

नास्तिक्याकडे असलेले एकूण हे गुण म्हणूनच ज्यांना आत्मसात करता येत नाहीत ते नास्तिक्याला नष्ट करण्याचे प्रयत्न करतात. पण..
अचूक विचार करण्याच्या नास्तिकाच्या गुणांमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो आणि त्यातून विज्ञान सृष्टी!
विज्ञानामध्ये अचूकता असते जी अध्यात्मामध्ये नसते. म्हणूनच नास्तिकांची व नास्तिक्याची सातत्याने हेटाळणी करून नावे ठेवण्यात आलेली आहेत.

अचूक विचार जेव्हा निर्माण होतात तेव्हा विवेक आणि नीती याचा सखोल अभ्यास केला जातो आणि ते आत्मसात केले जाते. अज्ञात शक्ती सांगते म्हणून आपण नीट वागायचं असं नास्तिक्य ठरवत नाही. ‘आपल्याला नीटच वागायचं आहे’ असे ठरवून नीट वागणं म्हणजे नास्तिक्य. यातूनच जगण्यासाठी कोणती मुल्यं आवश्यक आहेत याचे भान येतं. म्हणूनच नास्तिक निर्भय बनतो. ही निर्भयता समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता ठेवते. म्हणजेच नास्तिक्य हे सामाजिक प्रश्न आणि समाजाचा विचार आत्मीयतेने करू शकते. आस्तिक्य हे समाजाचा विचार करताना, “देव त्यांचे बघून घेईल” म्हणून सामाजिक प्रश्नांना महत्त्वाचे मानत नाही. किंवा दुर्लक्षित करते. मग ते रस्त्यावरील साधा खड्डा असो नाहीतर परंपरेतील धिंगाणा.

सामाजिक असो वा वैयक्तिक असो, कोणत्या समस्या या चुकीच्या आहेत हे नास्तिक्यामध्ये पटकन लक्षात येते. मग त्या प्रथा असोत वा परंपरा. धर्मग्रंथ असोत वा कर्मकांडे.

म्हणूनच नास्तिक हा अचूकतेचा शोध घेणारा प्रत्येक क्षेत्रातला प्रखर विचार आहे आणि प्रकाशमान समजूत आहे.

नास्तिक होणं येरागबाळ्याचे काम नव्हे! पण..
येरागबाळ्याने ठरवले तर तो नास्तिक होऊ शकतो!

लेखक –
डॉ. प्रदीप पाटील, सांगली.
(संकलन – विवेक गं. राऊत)

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा