तुका म्हणे, शोभा सांगे…
संत तुकाराम महाराजांनी केलेल्या भक्तीचे वर्णन वर्णनातीत आहे. त्यांची भक्ती हृदयातून आहे. ती त्यांच्या स्वतःच्या हृदयाचा अनुभव आहे. संत तुकारामांनी केलेली आणि सांगितलेली भक्ती ही शांतीस्वरूप आहे. त्यांच्या भक्तीचा अनुभवच स्वतः पांडुरंग आहेत. त्याच्या भक्तीनेच त्यांना परमानंद लाभला. त्यांच्या मता प्रमाणे भक्ती ह्या साधना द्वारे प्रत्यक्ष परमेश्वर देखील कोणत्याही क्षणी भक्तासाठी हजर होतो. असे अनेक दाखले पौराणिक कथांमधून आपल्याला दिसतात. अनेक संतांच्या चरित्रातून देखील आपल्याला वाचायला मिळते की प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या मदतीला धावून आलेला आहे. संत जनाबाई, सावतामाळी, नामदेव, संत एकनाथ अशी खूप सारी नाव आहेत.
पंढरपूरचा पांडुरंग कायम संतांच्या घरी चाकरी करताना दिसतो. तो संत जनाबाईला दळण ,कांडण करू लागला. संत एकनाथांच्या घरी चक्क त्याने पाणी भरले. खुद्द तुकारामांच्या अभंगांच्या वह्या तारल्या. ह्या कथा आपण नेहमीच ऐकतो. ह्या कथा खऱ्या की खोट्या ह्या खोलात न शिरता भक्ती ह्या साधनने भगवंत भक्ताकरिता स्वयं प्रेमरूपाने प्रगट होतो हे तर जाणून घेता येते.
तप, वेदाध्ययन, ध्यान, ज्ञान, आणि कर्म, इ. कोणत्याही प्रयत्नाने वा साधनाने भगवत प्राप्ती होत नाही. परंतु भक्ती केल्यास देव आपला होतो. यासाठी गोपींचे उदाहरण देता येईल. मनुष्याला हजारो जन्माच्या पुण्याईने मनुष्य जन्म प्राप्त होतो. हे पुण्य कमविण्यासाठी त्याने भक्ती करावी. आता चालू असलेल्या कलियुगात भक्ती हीच सर्व श्रेष्ठ आहे.
मोक्ष तुमचा देवा l
तुम्ही दुर्लभ ते ठेवा ll
मज भक्तीची आवडी l
नाही अंतरी ते गोडी ll
तुकाराम महाराज म्हणतात की भक्तीचे अंतिम साध्य मोक्ष असले तरी माझ्या मनाला मोक्षाविषयी आवड नाही, लोभ नाही, मला केवळ भक्तीचीच आवड आहे. ते पांडुरंगाला कळकळीची विनंती करतात.
“न लगे मुक्ती आणि संपदा l
संतसंग देई सदा ll”
परमेश्वराच्या अंतरंगात अंतर्बाह्य न्हाऊन निघण्यासाठी भक्ताचा सहवास नित्य घडावा म्हणून ते पांडुरंगास विनंती करतात.
ज्ञानेश्वरादी सकळ संतांच्या भक्ती पंथाचे जे अधिष्ठान होते ते अधिष्ठान तुकारामांचे देखील होते. त्याच अधिष्ठान परंपरेवर तुकोबांची दृढ निष्ठा आणि भक्ती होती. म्हणूनच तुकारामांनी भागवत धर्माची कास सोडली नाही. नवीन पंथ स्वीकारला नाही, की नवीन पंथ निर्माणही केला नाही.
“जाणे भक्तीचा जिव्हाळा l
तोची देवाचा पुतळा ll”
सर्व व्यापक परमेश्वरा विषयी प्रेमभावना म्हणजेच भक्ती आहे. सर्वात्मक ईश्वराच्या भक्तीचे, जिव्हाळ्याचे प्रेम जो जाणतो तो प्रत्यक्ष देवाचा पुतळा आहे.
“देव दयाळ दयाळ l
करी तुक्याचा सांभाळ ll”
हाच संत तुकारामांच्या स्वानुभव आहे.
भक्ती मुळे पांडुरंग तुकारामाचा सखा झाला. त्यांच्यामनातील भयगंड, न्यूनगंड दूर झाले, तुकारामाचे जीवन कृतार्थ झाले.
सर्व पक्षी हरी साहे सखा झाला l
ओल्या अंगणाच्या कल्पलता त्याला ll
पांडुरंग सखा झाला. ईश्वर दर्शनासाठी तुकारामाचा आक्रोश सुरू झाला. त्याची कल्पना इतरांना येणार नाही. गुरूपदेश, आत्मबोथ झाल्यानंतर माणूस ज्ञानी होतो, तसेच तुकारामांचे झाले. त्यांना आत्मानूभूती प्राप्त झाली आणि तुकारामाचे सारे जग भक्तिमय झाले. जीवन प्रेममय झाले.
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
संत साहित्यिक तथा कवी, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






