विचार संपदा…
…..जीवनाच्या वाटेवर अहंकार हा मोठा शत्रु आहे. काही माणसं विनाकारण स्वकर्तुत्वाचा अहंभाव बाळगतात. परंतु संत तुकोबाराय म्हणतात, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे..
अहंकार वाढला की, मनातील स्नेहाची भावना पूर्णपणे नष्ट होते. विचारवंत म्हणतात, उतू नको मातू नको, मी मी सदा म्हणू नको.. अहंकार आला, तुका म्हणे वाया गेला. जीवनाच्या वाटेवर अहंकार हाच फार मोठा अनर्थ आहे. संतजन म्हणतात, आपल्या जीवनाच्या सर्व वाटचालीचे नियमन ईश्वरच करीत असतो. आपल्या प्रत्येक श्वासनिश्वासामध्ये ईश्वरच असतो. व्यर्थ अहंकार करण्यात अर्थ नाही. रूप शक्ती आणि पदाचा अहंकार तर नकोच. कारण या बाबी वय परत्वे परिवर्तनशील आहेत.
अहो, दोन दिवस एकांत वासात जा. लोक तुमचं नाव सुद्धा विसरून जातील. मनुष्य हा जीवनभर अहंकारात जगतो. त्याला मनोमन असे वाटत असते की, आपण सर्वसामान्य लोकांकरता विशेष आहो. परंतु सत्य परिस्थिती अशी असते की तुमच्या असण्याने वा नसल्याने, तुमच्या अस्तित्वाने कुणाला काही फरक पडत नाही. ज्याला जेवढी गरज असते, तितकाच तो तुमचा वापर करत असतो. एक शायराने असे म्हटले आहे की, “न रुकी वक्त की गर्दीश, न जमाना बदला, पेड सुखा तो, परिंदोने ठिकाण बदला.”
माणूस जन्माला येतो तेंव्हा त्याचे वजन अडीच किलोच्या आसपास असते पण जेंव्हा माणूस पार्थिवाने या जगातून जातो तेव्हा, त्याच्या अस्थिची राख ही अडीच किलोही भरत नाही. संत म्हणतात हे कधी समजदार आपल्याला. सज्जन हो, समाज जीवनात एकमेकाविषयी असलेला स्नेहाचा सूर, हरवत चालल्याची परिस्थिती, आज प्रत्ययास येत आहे. प्रेमाला ओहोटी लागल्याचे अंधकारमय चित्र दिसून येत आहे. पती-पत्नीत सुद्धा ही स्नेहाची निर्मळ भावना नष्ट होण्याची चिन्हे जाणवतात. कारण दोघेही अहंकाराने ग्रस्त असतात. इंग्लंडची राणी हिक्टोरिया स्वभावाने खूपच तापट आणी गर्विष्ठ होती. तिच्या पतीचे नाव अल्बर्ट असे होते. एक दिवस खोली बंद करून, अल्बर्ट ग्रंथ वाचन करीत असताना, ब्रिटनच्या राणीने अहंकाराने दरवाजावर टकटक वाजवले. दरवाजा उघड, दरवाजा उघड अशी म्हणाली. अल्बर्टने तिच्या शब्दातील दर्प जाणवल्याने, दार उघडले नाही. राणीचा अहंभाव त्याला जाणवला होता. शेवटी राणी संपूर्ण शरणागतीने, स्नेहल शब्दात म्हणाली, अल्बर्ट, मी तुझी व्हिक्टोरिया आहे. दरवाजा उघडा. त्या शब्दातील स्नेहाचा भाव अल्बर्ट च्या हृदयाला स्पर्श करून जाताच, अल्बर्टने दार उघडले.
कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात, …मी पण ज्यांचे पक्व फळापरि, सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. संत तुकोबाराय म्हणतात, अहंभाव गेला, तुका म्हणे देव झाला. फक्त अहंकार टाका तुमचे सारे जीवन बदलून जाईल.
कवी म्हणतात……….
“सोच को बदलो सीतारे बदल जायेंगे, नजर को बदलो, नजारे बदल जायेंगे, कस्तियां बदलने की, जरूरत नही, सीर्फ दिशावो को बदलो, किनारे बदल जायेंगे..”
जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. तुमच्या शब्दांना धार नको आधार देण्याची ताकद हवी. मानवाचा जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नाहीत म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या, शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून अहंभाव रहित जीवन जगा. आपल्या सावलीपासून आपणच शिकले पाहिजे की, सावली कधी लहान तर कधी मोठी होत असते. तसेच जगावे. शेवटी काय घेऊन जाणार आहोत आपण सोबत. लंकाधिपती रावणाचे वर्णन करतांना, संत तुकोबाराय वर्णन करतात.
…तुका म्हणे त्याची संपदा एवढी ,सांगाते कवडी गेली नाही…
हा भाव जीवनामध्ये वाढवा. या उक्तीप्रमाणे जीवन आचरण करा.
जो उडते है अहम् के आसमानोमे, जमीपर आने से, वक्त नही लगता.. हर तरह का वक्त आता है जिंदगीमे, वक्त के गुजरने मे, वक्त नही लगता….
संत महात्म्यांनी आम्हाला जाणीव करून दिली आहे की, संपत्तीच्या राशी मिळवाव्यात, त्या राशीचे प्राणपणाने रक्षण करायचे आणि एक दिवस मृत्यू येईल तिकडे फरफटत जायचे ही मानवी जीवनाची भेदक अशी शोकांतिका आहे. बाबा रे, दैवाचे चक्र हे गतीने फिरत असते. सत्ता संपत्तीचे वैभव क्षणार्धात उलथून पाडण्याचे सामर्थ्य नियतीच्या छोट्या संकेतात असते.
म्हणून भक्तांनी,
‘न धरावा अभिमान, ना अपेक्षा वा मान’
‘न करावे दांभिक भजन, अभिलाष न धरावा….’
नियती ही अतिशय क्रूर असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. धनवंताचा गर्व, तरुणीचे सौंदर्य पंडिताचे अभ्यास पांडित्य क्षणात उधळून लावणारी नियती असते, म्हणून कोणत्याही मानवाने, कोणत्याही गोष्टीचा अहंभाव बाळगू नये हा संतांचा विचार संदेश अतिशय मोलाचा आहे. संतांनी काटेरी वाटेने प्रवास केला. त्यांचे पाय अक्षरशः रक्ताळले पण ते चालतच राहिले. आणि अहंभावी मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या जीवनात सातत्यपूर्ण प्रयत्न केले. सार्थ सात्विक जीवन जगणारा श्रीमंत विचाराचा समाज संत महात्म्यांना अपेक्षित होता. जगात येताना मनुष्य एकटाच रिकाम्या हाताने हेतू व एकटाच रिकाम्या हाताने जगाचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी निर्माण केलेले घरदार, पैसा, नातेसंबंध सर्व येथेच सोडून द्यावे लागते हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे.
संत कबीरदासजी म्हणतात, ……. कौडी कौडी माया जोडी, जोड् भरेला थैला, कहत कबीरा सुनो भाई साधु, संग चले ना थैला.. उड जायेगा हंस अकेला, दो दिन का जगमे मेला….. एक दिवस जगातील सगळ्यांना तुम्हाला निरोप द्यायचा आहे. अगदी तुमच्या पार्थिव शरीराचा सुद्धा.
कोण दिवस येईल कैसा, याचा न कळेची भरवसा..
म्हणून वेळीच सावध व्हा. लांबच्या प्रवासात, कधीही परत न येऊ शकणाऱ्या तुमच्या प्रवासात तुमच्या मदतीला कोणीही धावून येऊ शकत नाही. तुमच्या घरात सोन्याची भांडारे असली तरी, प्रवासाला निघताना तुम्ही चिमूटभर पीठही सोबत नेऊ शकत नाही… अखेर शेवटी तुझ्या नशिबी, मातीचे एक मडके रे.. हे वास्तव आहे. पैसा खूप काही होऊ शकतो पण सर्व काही होऊ शकत नाही. ज्यांनी दुसऱ्यांना तुच्छ लेखून,अहंभावाने पैशालाच जीवनात स्थान दिले, त्यांच्यावर जीवनाच्या शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येते, एवढा मोठा सिकंदर बादशहा पण,
….दोनो हात खाली थे, कफनके बाहर निकले, सिकंदर जब गये दुनिया से, तो दोनो हात खाली थे..
श्री. गोपालकृष्ण श्रीमद् भगवद्गीतेत अर्जुनाला म्हणतात अर्जुना, अरे कोणी कोणाते न मारी, येथे मीची हो, सर्व संहारी. निमित्त मात्रंम् भव सव्यसाचीन. तू निमित्त मात्रं आहेस. अर्जुना, हे कौरव तर मी अगोदरच मारले आहेत. कर्तुत्वाच्या अहंकाराचा त्याग गेला पाहिजे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहं न आणता, अति नम्र आणि लौकिकदृष्टया रिक्त होऊनच भगवंताकडे गेले पाहिजे.
संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अहंकार नाश हा गीतेचा पाया आहे. मी पणा टाकल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. परमार्थ ज्यांना करावयाचा आहे, समाज जीवनातील विकृती ज्यांना दूर करावयाची आहे, किंवा लोक जीवनात ज्यांना काही परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करावयाचा आहे, त्यांनी एक पथ्य पाळावे. थोरपणा पर्हा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे ,जै जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी..,
..तुझा आणि माझा नाही भरवसा, गर्व कशाला रे भल्या माणसा… संत संदेश लक्षात घ्या, जीवनात अहंकार टाका. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला..
लेखक –
डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
संत साहित्य उपासक, शेगाव.
संपर्क – ९४०४५५३५०५
Author: डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
लेखक डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील, से. नि. शिक्षण केंद्रप्रमुख असून, संत साहित्याचे व्यासंगी उपासक आहेत. महाराष्ट्रातील विविध दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रे, मासिके आणि वार्षिक अंकात त्यांचे ४५० लेख प्रकाशित झाले आहेत. संत साहित्याचे मंथन करून, शब्दांकित केलेला चिंतन ग्रंथ ही प्रकाशित झालेला आहे. सखाश्री आध्यात्मिक साहित्य मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा प्रदान केलेली आहे. त्यांचे साहित्य लेखन सेवा कार्यआजही सातत्याने सुरूच आहे. एम. ए. एम. एड् साहित्य विशारद, पीएच.डी. उच्च पदवी प्राप्त मिरगे सर, उत्कृष्ट किर्तन प्रवचन कार असून, त्यांनी विदर्भ क्षेत्रात गेल्या ४० वर्षात, कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता, ५०० च्या वर कीर्तन, प्रवचन सेवेचे कार्यक्रम सादर केले आहेत. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार २००१, महामहिम राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते, त्यांना प्राप्त झाला असून, भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. शिक्षण, साहित्य, सामाजिक सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल, महाराष्ट्र शासन, विविध सेवाभावी संस्था, समाज मंडळांच्या वतीने, एकूण १८ दर्जेदार पुरस्कारांनी ते गौरवान्वित आहेत.. महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा, उत्कृष्ट लेखन कार्याचा दर्जेदार, अध्यात्मिक वांग्मय पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. विनम्र, सेवाभावी, गुणवंत, प्रज्ञावंत, उत्कृष्ट अध्यापक म्हणून ते आजही समाजप्रिय आहेत.





