“प्रा. बी. टी. देशमुख यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावरील डॉ. किशोर फुले यांचे ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ एक संग्राह्य पुस्तक”

SHARE:

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रथम जनसंपर्क अधिकारी लेखक प्रा. डॉ. किशोर फुले लिखित मा. आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांच्या जीवन कार्यावर व प्रभावी व्यक्तिमत्त्वावरआधारित ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ पुस्तकाची समीक्षक व साहित्यिक
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांनी लिहिलेली ‘समीक्षा’ येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत .

नागपूर विद्यापीठ टिचर्स असोसिएशनच्या ‘नुटा बुलेटिन’ च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के. जी. देशमुख सभागृहात दि. २३ ऑगस्ट २०२६ ला संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये अ. भा. प्राध्यापक महासंघाचे माजी महासचिव प्रा. अशोक बर्मन, कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते, ज्येष्ठ विधिज्ञ अँड.फिरदोस मिर्झा, एमफुक्टोचे सरचिटणीस डॉ. आर. के. चव्हाण, नुटाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण रघुवंशी व सरचिटणीस डॉ. नितीन कोगरे यांच्या शुभहस्ते प्रा. डॉ. किशोर फुले लिखित ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ या पुस्तकाचे थाटात प्रकाशन झाले.

प्रा. डॉ. किशोर फुले लिखित प्रकाशित झालेल्या ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न. प्रा. बी. टी. देशमुख यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेल्या या पुस्तकामध्ये लेखक डॉ. किशोर फुले यांनी मलपृष्ठावर प्रा. बी. टी. देशमुख यांचा दिलेला परिचय त्यांचे जीवन दर्शन घडवितो. प्रा. बी. टी. देशमुख यांचा जन्म बेलोरा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती येथे दि. २१ ऑगस्ट १९३९ रोजी झाला. छात्रसंघाचे अध्यक्ष, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग, राज्यशास्त्राचे प्राध्यापक व विभाग प्रमुख, नागपूर विद्यापीठ शिक्षक संघ (नुटा) आणि महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो) या संघटनांचे अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, ‘भारतीय संविधान व स्वातंत्र्य आंदोलन’, ‘महाराष्ट्राचा जलसिंचन अनुशेष किरण परीक्षा’, ‘भारतीय शासनव्यवस्था’ या पुस्तकाचे लेखन व विविध ज्वलंत प्रश्नांवर विशेषांक निर्मिती १९८० ते २०१० तीस वर्ष सलग पाच वेळा महाराष्ट्र विधान परिषदेत विदर्भ व अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व, महाराष्ट्र विधान परिषदेतील पहिल्या ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्काराचे मानकरी, राष्ट्रकुल सांसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, नेदरलैंड, स्वित्झर्लंड, जर्मनी या देशांचा अभ्यास दौरा, १९९४ च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या विधेयकासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य, विदर्भाच्या अनुशेषाच्या प्रश्नावर विधानमंडळात प्रदीर्घ व प्रभावी दिलेला लढा,
अमरावती पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेला विशेष पुढाकार एक अत्यंत अभ्यासू लोकप्रतिनिधी, प्रभावी वक्ता व लेखक, उत्कृष्ट संघटक म्हणून महाराष्ट्रभर लौकिक असलेले बी. टी. सरांचे दि. १९ जून २०२६ रोजी हृदयक्रिया बंद पडून अमरावती येथे प्राणोत्क्रमण झाले. अशाप्रकारे प्रा. बी. टी. देशमुख यांचा अतिशय सुटसुटीत असा जीवनपट वाचून बी. टी. सर वाचकांसमोर उभे राहतात.

लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेल्या ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर फुले यांचे शिक्षण एम.कॉम., एम.ए.(मराठी) असून पत्रकारिता व जनसंवाद विषयात पदव्युत्तर पदविका प्राप्त केलेली असून व्यवस्थापन व जनसंपर्कशास्त्र यात आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रथम जनसंपर्क अधिकारी म्हणून १५ वर्षे सेवा केलेली आहे. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती येथून वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. लेखक डॉ. किशोर फुले ‘जनसंपर्क’ हे पुस्तक डायमंड पब्लिकेशन पुणे द्वारा प्रकाशित झालेले असून बिहार व केरळचे माजी राज्यपाल श्री. रा‌. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या ‘अजातशत्रू’ या स्मृती ग्रंथाचे मुख्य संपादक म्हणून महाराष्ट्र शासनाकडून त्यांची नियुक्ती झालेली होती. ‘भारतीय संविधान आणि डॉ. पंजाबराव देशमुख’ या श्री शिवाजी झालेलीही संस्थेद्वारे प्रकाशित ग्रंथाचे संपादन सरांनी केले.

‘शिवसंस्था’ या त्रेमासिकाचे पाच वर्षे संपादक होते. आज या त्रैमासिकाचे मासिकात रूपांतर झाले. ही गोष्ट आम्हा साहित्यिकांसाठी अत्यंत आनंददायी आहे. ‘सुरेश भट एक झंझावात’, ‘वाणिज्य’, ‘अश्वमेध’ या ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे. विविध वृत्तपत्रे आणि मासिकांमधून विविध विषयांवरील त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, बिहार व केरळचे राज्यपाल श्री दादासाहेब गवई, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, प्राचार्य राम शेवाळकर, सुप्रसिद्ध समाजसेवक प्रकाश आमटे, भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई, लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, ज्येष्ठ लोकप्रतिनिधी प्रा. बी. टी. देशमुख यांच्या मानपत्रांचे सुलेखन डॉ. किशोर फुले यांनी केलेले आहे. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या प्रा. डॉ. किशोर फुले यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ या प्रा. बी. टी. देशमुख यांच्या प्रभावी जीवनकार्यावरील पुस्तक भाषासौंदर्यसह शब्दबद्ध झाले आहे.

 

लेखक डॉ. किशोर फुले यांनी ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ या प्रा. बी. टी. देशमुख यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक भाऊंच्या प्रभावी व्यक्तिमत्वाला अर्पण केलेले आहे.
लेखक डॉ. किशोर फुले यांनी या पुस्तकात दिलेल्या मनोगतात १९७६ साली भाऊंनी ‘नुटा’ संघटनेच्या बांधणीसाठी, प्रचार-प्रसारासाठी नुटा बुलेटिन सुरू केले होते. त्या नुटा बुलेटिनचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष दि. २१ जून २०२६ ला नुटा बुलेटिनच्या सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार होता. ‘नुटा’ चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी व त्यांचे सर्व सहकारी परिश्रम घेत होते. हा विशेषांक उत्तम व्हावा म्हणून भाऊंची तळमळ होती. त्यासाठी लेखकांची यादी ठरविण्यापासून तो अंक निर्दोष व्हावा म्हणून तो तपासण्यापर्यंतचे कार्य ते चोखपणे करीत होते. पण
१९ जून २०२६ ला रात्री नुटा बुलेटिनच्या या सुवर्ण महोत्सवी विशेषांकावरून अखेरचा हात फिरवताना भाऊंची प्राणज्योत मालवली. म्हणजे जीवनाच्या शेवटपर्यंत ते आपल्या कार्यात मग्न होते. ते अनंतात विलीन झाल्यामुळे २१ तारखेचा सुवर्ण महोत्सव तहकूब करण्यात आला. हा सोहळा दि. २३ ऑगस्ट २०२६ ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के. जी. देशमुख सभागृहात झाला. त्यात नुटा बुलेटिनच्या सुवर्ण महोत्सवी विशेषांकासोबत ‘प्रा. बी. टी. देशमुख स्मृती विशेषांक’ प्रकाशित करण्याची वेळ नियतीने आणली आणि ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती..’ हे लेखक डॉ. किशोर फुले यांचे पुस्तकही त्यात प्रकाशित झाले.

भाऊंच्या दुःखद निधनानंतर दैनिक हिंदुस्थानमध्ये लेखक डॉ. किशोर फुले दि. २१ जून २०२६ ला ‘आमच्या देव्हाऱ्यातील दत्तात्रय गेला, आता डोकं ठेवायला पाय कुठून आणावेत?’ हा प्रदीर्घ लेख लिहिला होता. तो लेख वाचून अनेकांचे डोळे पाणावले. भाऊंचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू व बहुआयामी होते. एका लेखात ते सामावणारे नव्हते. भाऊंच्या तेरवीपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू रोज लिहावेत हा विचार लेखकाच्या मनात आला आणि दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक मा. श्री. विलास मराठे यांनी तो तात्काळ उचलून धरला. ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ या शीर्षकाखाली भाऊंच्या व्यक्तिमत्त्वावर लेखक डॉ. किशोर फुले यांनी अकरा लेख सोमवार दि. २२ जून ते गुरुवार दि. २ जुलै २०२६ पर्यंत सलग लिहिले. या त्यांच्या लेखाचा इतर वाचकांप्रमाणे मी ही एक वाचक होतो. हे सर्व लेख लेखकाने अशा लालित्यपूर्ण भाषेत लिहिले होते की, प्रा. बी. टी. देशमुख यांच्या अष्टपैलू आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन वाचकांना जवळून घडत होते.

प्रा. डॉ. किशोर फुले लिखित संसदपटू, लोकप्रतिनिधी मा. आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दिव्यात्वाची जेथं प्रचिती’ हे पुस्तकाचे शीर्षक लेखकाने अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रभावी दिलले आहे. हे शीर्षक मराठीतील अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय “जेथे दिव्यात्वाची प्रचिती, तेथे कर माझे जुळती” या सुभाषितावर आधारित आहे. त्यामुळे या शीर्षकात एक उपजत लय, नादमयता आणि काव्यात्मक गोडवा आहे. शीर्षकात वापरलेले ‘दिव्यत्व’ म्हणजे अलौकिक किंवा थोरपण आणि ‘प्रचिती’ म्हणजे अनुभव किंवा साक्षात अनुभूती हे शब्द अत्यंत दर्जेदार, गंभीर आणि वजनदार आहेत. केवळ तीन शब्दांमध्ये संपूर्ण पुस्तकाचा गाभा आणि उद्देश अतिशय प्रभावीपणे लेखकाने मांडला आहे. संसदपटू प्रा. बी. टी. देशमुख यांचे कार्य, त्यांचे अष्टपैलू आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व सामान्य माणसासाठी प्रेरणादायी आणि ‘दिव्य’ आहे. त्यांच्या जीवनाचा आणि विचारांचा आदर्श वाचकांसमोर ठेवणे, हा या शीर्षकाचा मुख्य आशय आहे. हे शीर्षक वाचताच मनात आपोआप “तेथे कर माझे जुळती” हा पुढचा विचार येतो. म्हणजेच, बी. टी. देशमुख यांच्या संसदीय आणि सामाजिक कार्याबद्दल लेखकाने व्यक्त केलेली ही सर्वोच्च आदरंजली आहे. ‘प्रचिती’ या शब्दातून लेखकाने वाचकांना असे सुचवले आहे की, हे पुस्तक केवळ एक चरित्र नसून, बी. टी. देशमुख यांच्या ध्येयनिष्ठ आणि प्रामाणिक जीवनप्रवासाचा जिवंत अनुभव वाचकाला करून देणारे माध्यम आहे. बी. टी. सरांच्या सातत
सहवासात असल्यामुळे
सरांच्या जीवनकार्याचा – स्वभावाचा साक्षात अनुभव – प्रचिती लेखकाला आली आणि या शीर्षकापासून सुरू झालेली लेखमाला तेच शीर्षक देऊन पुस्तकरूपात प्रकाशित झाली. बी. टी. सरांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाला चपखल बसणारे शीर्षक पुस्तकाला दिल्याबद्दल लेखक धन्यवादास पात्र ठरले आहेत.

लेखाच्या संदर्भासाठी श्रीमती सुशिलाताई देशमुख, श्री. भरतभाऊ देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई, डॉ. सौ. दीपाताई यांची त्यांना खूप मदत झाली हे लिहिण्यास लेखक विसरले नाहीत. लेख प्रकाशित झाल्यावर लेखकाला वाचकांच्या अंतःकरणपूर्वक भरपूर प्रतिक्रिया आल्या आणि माझ्यासह अनेक वाचकांनी या लेखांना पुस्तक रुपात प्रकाशित करावे असा आपुलकीचा सल्लाही दिला. अनेकांनी दिलेल्या या सल्ल्यांनी लेखकाचे मन भरून आले. पुस्तक प्रकाशित करण्याची लेखकाला प्रेरणा मिळाली आणि ज्ञानपथ पब्लिकेशनचे संचालक श्री. सुशील सुकलकर यांनी हे पुस्तक पूर्णत्वाला नेले. नुटाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी प्रकाशनाची अनुमती दिली. नुटा बुलेटीनच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. लेखकाने या सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

दैनिक हिंदुस्थान परिवाराचे श्री. उल्हास मराठेंसह, श्री. विनोद, श्री. विलास, सौ. मनीषाताई, श्री. विवेक, चि. सर्वेश व सर्व कर्मचारी यांनी या लेखमाला प्रसिद्धीसाठी लेखकाला बहुमोल सहकार्य केले. या सर्वांचे लेखकाने आभार व्यक्त केले आहे.

‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ या पुस्तकात लेखक डॉ. किशोर फुले यांनी “आमच्या देव्हाऱ्यातील दत्तात्रय गेला आता डोकं ठेवायला पाय कुठून आणावेत ?” असे करुणमय शीर्षक मनोगतातील लेखाला देऊन स्वतःच मन मोकळं केलं. येथे लेखकाने प्रा. बी. टी. देशमुख यांना केवळ एक लोकप्रतिनिधी किंवा मार्गदर्शक न मानता, त्यांची तुलना आपल्या गृहालयात असलेल्या ‘देव्हाऱ्यातील दत्तात्रयाशी’ (देवांशी) केली आहे. यावरून त्यांच्याबद्दल लेखकाच्या मनात असलेला सर्वोच्च आदर आणि कृतज्ञता व्यक्त होते. ‘देव्हाऱ्यातील देव जाणे’ म्हणजे घरातील मुख्य आधारस्तंभ किंवा रक्षणकर्ता गमावणे होय. त्यांच्या जाण्याने समाजाचे किंवा त्यांचे मार्गदर्शन घेणाऱ्यांचे जे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, ते यातून लेखकाने अधोरेखित केले आहे. “आता डोकं ठेवायला पाय कुठून आणावेत ?” या वाक्यातून पराकोटीची व्याकुळता दिसते. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते किंवा जिला योग्य मार्ग हवा असतो, तेव्हा ती मोठ्यांच्या पायावर डोके ठेवून आधार शोधते. प्रा. बी. टी. देशमुख यांच्या निधनामुळे आता अशी हक्काची, विश्वासाची आणि आदरणीय व्यक्ती उरली नाही, ही अनाथ किंवा पोरकी झाल्याची भावना यातून लेखकाने अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली आहे. लेखकाने अत्यंत साध्या पण प्रभावी रूपकांचा वापर या शीर्षकात केला आहे. बी. टी. देशमुख यांच्यासाठी ‘दत्तात्रय’ आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘पायांवर डोके ठेवणे’ ही रूपके वाक्याला सामान्य भाषेपेक्षा खूप उंचावर नेतात. हे शीर्षक वाचताना मनात आपोआप एक तीव्र दुःख आणि व्याकुळता अर्थात करुण रस निर्माण होतो. शब्दांची निवड इतकी अचूक आहे की, लेखकाच्या मनातील ती दुःखद वेदना वाचकाच्या काळजाला थेट भिडते. वाक्याची रचना खूप संथ, गंभीर आणि लयबद्ध आहे. “आमच्या देव्हाऱ्यातील दत्तात्रय गेला…” मधील ‘द’ अक्षराची पुनरावृत्ती आणि शेवटचा प्रश्नार्थक टोन (“…पाय कुठून आणावेत?”) यामुळे वाक्याला एक वेगळेच आंतरिक भाषिक सौंदर्य प्राप्त झाले आहे.

मूल्यनिष्ठा, समर्पण, अभ्यासूपणा, वैचारिकता, कर्तृत्व, वक्तृत्व, संसदपटुत्व या तत्त्वांचा प्रतिशब्द म्हणजे लोकप्रतिनिधित्वाचा मानदंड निर्माण करणारे प्रा. बी. टी. देशमुख होतं. येथे लेखकाने अल्पाक्षरात भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे अचूक वर्णन केलेले आहे. पुढे लेखक म्हणतात की, “आयुष्य कसे असावे ? ते कसे घडवावे ? याचा वस्तुपाठ म्हणजे भाऊंचा जीवन प्रवास होता.” आयुष्यात काहितरी करून दाखवण्याची जिद्द या भरोवशावर भाऊंनी आपली ‘देशमुखी’ निर्माण केली. ही देशमुखी आंदण मिळालेली नव्हती तर ती स्वकष्टाने प्राप्त केली होती. नवव्या वर्गात असताना संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ते सहभागी झाले. राजकमल चौकातील संयुक्त महाराष्ट्राच्या सभेत नवव्या वर्गातील भाऊराव तुळशीराम देशमुख या पोरसवदा वयाच्या मुलाने खणखणीत भाषण केले. सभेतील डॉ. दाजीसाहेब पटवर्धन यांच्यासह आपल्या धारिष्ट्याने, चळवळ्या स्वभावाने आणि खणखणीत वक्तृत्वाने भाऊराव देशमुख या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. राहायची सोय नव्हती, जेवणाची भ्रांत नव्हती. यशवंतराव खापर्डे भाऊरावांना बाळासाहेब मराठे यांच्याकडे (आप्पा) घेऊन गेले. आप्पा गुणग्राहक आणि दैनिक हिंदुस्थान परिवार म्हणजे सर्वांचे आश्रयस्थान. आप्पांनी भाऊरावांना दैनिक हिंदुस्थानमध्ये काम दिले आणि भाऊरावांनी आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे प्रचंड मेहनतीने दैनिक हिंदुस्थानचा केवळ कर्मचारीच नाही तर आप्पांच्या मानसपुत्राचे स्थान प्राप्त केले होते.

विदर्भ महाविद्यालयात भाऊंचे शिक्षण झाले. प्राचार्य प. सि. काणेंसारख्या गुरुंच्या तालमीत ते घडले. भाऊ विदर्भ महाविद्यालयाच्या छात्रसंघाचे अध्यक्ष होते. विदर्भ महाविद्यालयाच्या छात्रसंघाचे अध्यक्ष असताना स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांना आणले. भाऊराव देशमुख या छात्रसंघ अध्यक्षाने त्यावेळी केलेले भाषण युवा नेतृत्वासाठी एक आदर्श ठरले. भाऊंच्या नेतृत्वाची बीजं याकाळात अंकुरीत झाली. पुढे त्याचे वटवृक्षात रूपांतर कसे झाले हे त्यांनाही कळले नाही. नागपूर विद्यापीठ शिक्षक संघ (नुटा) ते अध्यक्ष झाले. या संघटनेला भाऊंच्या नेतृत्वात उर्जितावस्था प्राप्त झाली होती. या पुस्तकाच्या अनुक्रमाणिकेत दिल्याप्रमाणे वटवृक्ष, मेधावी विद्यार्थी, आदर्श शिक्षक, वहिनी, कृतज्ञता, संवेदनशीलता,
दूरदृष्टी, ज्ञानलालसा, नेतृत्व, लोकप्रतिनिधित्वाचा मानदंड, कर्मयोगी अशा अकरा लेखातून त्यांनी या पुस्तकात प्रा. बी. टी. देशमुख यांचे आदर्श व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे आणि पुस्तकाच्या शेवटी प्रा. बी. टी. देशमुख यांना शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (स्वायत्त) अमरावती येथे २०२३ मध्ये संपन्न झालेल्या शताब्दी महोत्सवात प्राचार्य प. सि. काणे यांच्या शुभहस्ते जे मानपत्र देण्यात आले ते प्रकाशित केले आहे. या मानपत्राचे लेखन व अभिवाचन लेखक डॉ. किशोर फुले यांनी केले.

‘वटवृक्ष’ या पहिल्या मथळ्याखाली लिहिलल्या लेखामध्ये भाऊंना वृतवृक्षाची फक्त उपमा दिलेली नाही तर ती पूर्णपणे सिद्ध करून दाखविली.
“जमिनीचं अस्तर भेदून वटवृक्ष विस्तारतो. त्याच्या पारंब्या विस्तारतात. महावृक्ष होतो. बादलीभर पाण्यासाठी तो तरसत नाही. पाषाणाला भेदून पाणी शोषून घेतो. आपल्या भव्यतेच्या जाहिरातीही वटवृक्षाला लावाव्या लागत नाहीत आणि सावलीचे भाडेही तो कुणाकडून वसूल करीत नाही.”

“जमिनीचं अस्तर भेदून वटवृक्ष विस्तारतो.” या पहिल्या वाक्यात ‘भेदून’ आणि ‘वटवृक्ष विस्तारतो’ या शब्दांचा वापर केला आहे. ‘वटवृक्ष विस्तारतो’ हा शब्द वापरल्यामुळे झाडाचे भव्य आणि अथांग रूप डोळ्यांसमोर उभे राहते. जमिनीच्या वरच्या थराला ‘अस्तर’ (कापडाचे अस्तर ज्याप्रमाणे आतून जोडलेले असते) अशी उपमा दिलेली आहे. ते कठीण अस्तर फाडून किंवा भेदून वर येण्याची झाडाची ताकद या शब्दांतून व्यक्त होते. वाक्य वाचताना एक प्रकारचा आंतरिक नाद आणि लय जाणवते. यामुळे वाक्य अधिक परिणामकारक आणि ऐकायला सुभाषितातल्या ओळीसारखे वाटते. हे वाक्य केवळ निसर्गाचे वर्णन करीत नाही, तर बी. टी. सरांसारख्या संकटावर मात करून पुढे जाणाऱ्या माणसाच्या संघर्षावरही भाष्य करते. कोणत्याही कठीण परिस्थितीला (जमिनीचे अस्तर) भेदून, संकटांवर मात करून माणसाने आपले व्यक्तिमत्त्व बी. टी. सरांनी ‘वटवृक्षासारखे’ समृद्ध आणि विशाल बनविले, हे येथे लेखकाने लालित्यपूर्ण भाषेत सांगितल्यामुळे वाचकांच्या मनाला स्पर्श करून जाते.

‘मेधावी विद्यार्थी’ या दुसऱ्या लेखांमध्ये परिस्थितीवर मात करून उपजत बुद्धिमत्तेने आणि अंगभूत कौशल्याने बीटीभाऊ परिस्थितीवर स्वार कसे झाले आणि विद्यार्थी जीवनात यशस्वी कसे झाले. हे अल्पाक्षरात सांगण्याचा प्रयास केला आहे. अभावाच्या मुशीतूनच समृद्धीचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न भाऊंनी केला. येथे लेखकाने विरोधाभासात्मक सौंदर्य प्राप्त केले आहे. या वाक्यात ‘अभाव’ ( गरिबी) आणि ‘समृद्धी’ (वैभव/यश) हे दोन परस्परविरोधी शब्द एकत्र आले आहेत. अडचणींमधूनच यशाचा मार्ग निघतो, हा जीवनाचा एक मोठा सकारात्मक विचार या विरोधाभासातून अत्यंत प्रभावीपणे लेखकाने मांडलेला आहे. ‘मुशीतून’, ‘समृद्धीचा’, ‘प्रशस्त’ यांसारख्या तत्सम (संस्कृतप्रचूर) शब्दांच्या वापरामुळे वाक्याला एक वेगळे गांभीर्य, संथपणा आणि भव्यता प्राप्त झाली आहे. लेखकाचा सकारात्मक संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. हे वाक्य केवळ लेखनाचा दर्जा वाढवत नाही, तर संकटांवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा देणारे ठरते. अत्यंत मोजक्या आणि भारदस्त शब्दांतून लेखकाने एक मोठा जीवनप्रवास आणि संघर्ष अचूकपणे अधोरेखित केला आहे. आदरणीय श्री बाळासाहेब मराठे यांच्या दैनिक हिंदुस्थानमध्ये झाडपोस करण्यापासून तो खिळे जुळवण्यापर्यंत सर्व कामे भाऊंनी केली. लेखक येथे म्हणतात की, बातमीचे खिळे जुळवता जुळवता त्यांनी आयुष्य बांधलं. येथे ‘खिळे जुळवणे’ ही एक तांत्रिक आणि भौतिक प्रक्रिया आहे तर दुसरीकडे ‘आयुष्य बांधणे’ ही एक अत्यंत भावनिक आणि अमूर्त गोष्ट आहे. या दोन भिन्न गोष्टींची सांगड घालून लेखकाने एक सुंदर विरोधाभास निर्माण केला आहे. “बातमीचे खिळे जुळवता जुळवता त्यांनी आयुष्य बांधले” या वाक्यात रूपक अलंकार आला आहे. कारण येथे उपमेय आणि उपमान या दोन्ही गोष्टी एकच आहेत, असे दाखवले आहे. इथे बातमीचे खिळे जुळवण्याची भौतिक प्रक्रिया आणि स्वतःचे आयुष्य घडवण्याची – सांधण्याची मानसिक अथवा व्यावहारिक प्रक्रिया या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत परंतु लेखकाने या दोन्ही प्रक्रियांमध्ये कोणताही फरक न दाखवता, ‘बातमीचे खिळे जुळवणे’ म्हणजेच ‘आयुष्य बांधणे’ असे थेट समीकरण मांडले आहे. या दोन्ही संकल्पना एकमेकांत इतक्या एकरूप झाल्या आहेत की, उपमेय (आयुष्य) हेच उपमान (बातमीचे खिळे) बनले आहे. येथे कामाची प्रक्रिया (खिळे जुळवणे) आणि जीवनाचा संघर्ष (आयुष्य बांधणे) यामध्ये एकरूपता दाखवली आहे. केवळ पोटापाण्यासाठी काम न करता, त्या कामातूनच त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन सार्थकी लावले आणि एक आदर्श उभा केला, हा सखोल अर्थ यातून व्यक्त होतो. या वाक्यामध्ये ‘जुळवता जुळवता’ या पुनरुक्त शब्दांमुळे एक प्रकारची लय आणि नाद निर्माण झाला आहे. हे नादमाधुर्य वाचकाला खिळवून ठेवतो आणि वाक्याचा प्रभाव वृद्धिंगत करतो. अल्पाक्षरात भाऊंच्या संपूर्ण जीवनाचा संघर्ष, त्यांची निष्ठा आणि कष्ट अत्यंत प्रभावीपणे मांडलेले आहे. हे या वाक्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल.

काम करताना आप्पांची भाषा, काम करण्याची पद्धती, श्रमप्रतिष्ठा, मूल्यनिष्ठा येथे आत्मसात केली. सकाळी कॉलेज, संध्याकाळी हिंदुस्थान सांभाळणाऱ्या भाऊंनी विद्यार्थी चळवळीचे नेतृत्वही केले होते. हे नेतृत्व पुढे कसे विकसित झाले हे सर्वांनाच माहिती आहे. आई-वडिलांच्या, थोरामोठ्यांच्या संस्कारांशी भाऊंनी कधीही प्रतारणा केली नाही. गरिबी सहन केली पण उधारीची श्रीमंती अंगावर कधी चढविली नाही. भाऊंच्या स्वभावाचे अचूक वर्णन येथे लेखकाने केलेले आहे.

‘आदर्श शिक्षक’ या तिसऱ्या लेखांमध्ये आदर्श शिक्षक कसा असावा ? हे बीटी सरांच्या व्यक्तिमत्त्वातून सांगण्याचा लेखकाने प्रयास केलेला आहे. १९६४ साली नागपूर विद्यापीठाच्या एम. ए. राज्यशास्त्र परीक्षेत भाऊ गुणवत्ता यादीत आले. सरकारी नोकरीची दालनं भाऊंना खुली असताना समाजऋण फेडण्यासाठी बीटीभाऊंनी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय,अमरावतीची नोकरी स्वीकारली. पैशापेक्षा तत्त्व महत्त्वाचे पण आज या तत्त्वाचे दर्शन आपल्याला घडेल की नाही हा प्रश्न आहे येथे मात्र तत्त्व सांभाळणाऱ्या भाऊंच्या स्वभावाचे दर्शन लेखकाने घडविले आहे. तासिकेच्या ठोक्याला वर्गात जाणे आणि तासिका संपल्याचा ठोका होताच वर्गातून बाहेर पडणे हा त्यांचा शिरस्ता होता. त्यांचे वर्तन, साधा पेहराव, जसे बोलणे – तसे
वागणे, विद्यार्थ्यांविषयी त्यांची आस्था, व्यवसायनिष्ठा, विद्वत्ता आणि सरांचा आचारधर्म याशिवाय महाविद्यालयातील त्यांचा वक्तशीरपणा, प्रतिपादन शैली, आदर्श अध्यापन पद्धती, विषयाचा सखोल अभ्यास आणि विद्यार्थ्यांविषयी असलेला जिव्हाळा यामुळे ते लवकरच विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले. विद्यार्थीप्रिय झाले. लेखक डॉ. किशोर फुले यांनी बी. टी. सरांविषयी सांगितलेल्या या सर्व गुणांमुळे आदर्श शिक्षक, आदर्श प्राध्यापक कसा असावा ? या प्रश्नाचे उत्तर येथे मिळते आणि मनात विचार येतो की, आदर्श विद्यार्थ्यातून आदर्श नागरिक घडविण्याचे भाऊसाहेबांचे स्वप्न जसे साकार करण्याचा प्रयत्न बी. टी. सरांनी केला तसाच प्रयत्न आज प्रत्येकाने केला पाहिजे तेव्हाच भाऊसाहेबांचे हे आदर्श विद्यार्थ्यांतून आदर्श नागरिक घडवण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाईल, असे मला वाटते.

बी. टी. सरांच्या दुःखद निधनानंतर दैनिक हिंदुस्थान मधील लेखकाचा लेख वाचून त्यांचे विद्यार्थी राहिलेले सुप्रसिद्ध पत्रकार प्रा. न. मा. जोशी यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी लेखकाला केलेला फोन आजच्या शिक्षकांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. आदर्श शिक्षकाने फक्त अध्यापनच करू नये तर आपल्या विषयाची विद्यार्थ्यांना लवकर आकलन होणाऱ्या भाषेत पुस्तके लिहून प्रकाशित करावी. हे बी. टी. सरांनी केले. त्यांनी राज्यशास्त्राची पुस्तकं इंग्रजी व मराठी भाषेत लिहिली व प्रकाशित केली. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा झाला तसेच राज्यशास्त्राला पुरक असणाऱ्या अनेक पुस्तकांचे लेखन बी. टी. सरांनी केले. आजच्या शिक्षकांनी कोणाचा आदर्श ठेवावा तर बी. टी. सरांचा आदर्श ठेवावा हेच लेखकाला येथे सांगायचे आहे.

‘वहिनी’ या चौथ्या लेखात लेखक डॉ. किशोर फुले यांनी सहधर्मचारिणी कशी असावी तर बी. टी. सरांच्या धर्मपत्नी सारखी आदर्श असावी. हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या लेखातील सौ. सुशिलाताईंचे प्रभावी व त्यागमय व्यक्तिमत्त्व वाचून असे वाटते की,
“त्याग आणि समर्पणाचा,
सुशिलाताईंच्या मनी भाव ॥
जिच्या सोज्वळ अस्तित्वाने,
उजळले चाहिकडे पतीचे नाव ॥
सदाचाराने जगून धर्माने चालली,
तीच कुटुंबाची माऊली बनली ॥”
“वादळाशी आयुष्याच्या नीरगाठी बांधणे सोपे नसते.” येथे लेखकाने रूपक अलंकारात भाऊंच्या जीवनाचे वर्णन केलेले आहे. येथे भाऊंच्या आयुष्यातील संघर्षाला थेट वादळ हे रूपक वापरले आहे. संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या पाठीशी सक्षम, समर्पित सौ. सुशिलाताई या सहधर्मचारिणी उभ्या होत्या त्या सावित्रीबाई सारख्या. या माऊलीने प्रकृती अस्वास्थ्यातही आपले दुखणे बाजूला ठेवून धर्माचरण पूर्ण केले.

‘कृतज्ञता’ या पाचव्या प्रकरणात लोकांना दिलेली वेळ पाळणे आणि दुसऱ्याने दिलेली वेळ काटेकोर पाळणे हा त्यांचा शिरस्ता आयुष्यभर होता. हा भाऊंचा वेळ पाळण्याचा गुण अतिशय मोलाचा वाटतो, कारण लेखक म्हणतात की, घड्याळ त्यांनी केवळ हातावर नाही बांधले; आयुष्य घड्याळाच्या काट्याला बांधले. माणसांची, भावंडांची, नातेवाईकांची आणि पडत्या काळात ज्यांनी ज्यांनी आधार दिला त्या सर्वाप्रती त्यांच्या अंतःकरणात सदैव कृतज्ञता असे. अशा प्रकारची कृतज्ञता आज हरविलेली दिसते. कृतघ्नतेचे दर्शन मात्र घडते. “आपल्या मामांनी श्री. पुंडलीकराव घोम यांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला नसता तर आम्ही भावंड इथपर्यंत पोहोचलो नसतो” ही भावना त्यांच्या अंतःकरणात सदैव असे. मामाची सुकन्या श्रीमती सुशिलाताईशी विवाह करून कृतज्ञताभावाने त्यांनी ते नाते अधिक घट्ट केले.

‘भारतीय संविधान व स्वातंत्र्य आंदोलन’ हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आठ भावंडांच्या मागे जो मामा आधार म्हणून सदैव उभा राहिला त्या मामाला, श्री. पुंडलीकराव घोम यांना अर्पण केले. कृतज्ञता हा गुण कसा अंगीकरावा ते भाऊंच्या चरित्रातून शिकण्यासारखे आहे. लेखकाने या भाऊच्या गुणाचे वर्णन विविध उदाहरणे देऊन लालित्यपूर्ण भाषेत सांगितले आहे.

‘संवेदनशीलता’ या सहाव्या लेखात अनेक उदाहरणातून लेखकाने बीटी सरांच्या आयुष्यातील अनेक उदाहरणातून संवेदनशीलता या गुणाचे दर्शन ललितरम्य भाषेतून घडविले आहे. लेखक म्हणतात की, आपल्या कार्यासिद्धीसाठी अत्यंत कर्तव्य कठोर असणारे भाऊ आयुष्यातील अनेक कोपऱ्यात शरदाच्या चांदण्यासारखे शांत, शीतल मृदू झाले आहेत. त्यासाठी लेखकाने भाऊंचे स्वीय सहाय्यक अविनाश देशमुख यांचे उदाहरण दिलेले आहे. आपली आमदारकी गेल्यानंतर अविनाशच काय ? हा करुणमय विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी अविनाशला भरपूर मदत केली. आता ही मदत कशी केली यासाठी वाचकांना मूळ पुस्तकाचे वाचन करणेच योग्य ठरेल, वाचनाअंती वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण होईल आमदार असावे तर बीटीं सारखे.

‘दूरदृष्टी’ या सातव्या लेखांमध्ये बीटी भाऊंनी स्वतःच्या आणि भाड्याने घेतलेल्या प्लॉटवर एचफोर हे अस्सल बियाणं तयार करून शेतकऱ्यांना विकलं. कुटुंबात निर्माण झालेली आर्थिक समस्या दूर करण्याचा त्यांनी असा अशाप्रकारे प्रयत्न केला. भाऊ जायच्या पाच-सहा दिवस अगोदर लेखक भाऊंच्या घरी विविध विषयावर चर्चा करीत बसले होते. ती चर्चा अखेरची ठरली म्हणून लेखक म्हणतात, भाऊंना ऐकता आलं आमचं ते परमभाग्यच म्हटलं पाहिजे आणि शेवटी ते म्हणतात,”
इहलोकात देवदर्शन वारंवार कुठे होतं ?” हे व्यतिरेक अलंकारात केलेले भाऊंच्या स्वभावाचे वर्णन लेखकाचे भाषाप्रभुत्व सिद्ध करते.

“ज्ञानलालसा” या आठव्या लेखात “ज्ञानासारखी दुसरी शक्ती नाही.” अनन्वय अलंकाराने या लेखाचा प्रारंभ केलेला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकत असताना भाऊंची बौद्धिक प्रतिभा सर्वच गुरुजींनी ओळखली होती. दैनिक हिंदुस्थानमध्ये नोकरी करतानाही त्यांची ज्ञानलालसा वृद्धिंगत होत होती. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक पटकविणारे भाऊच होते. विदर्भ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात तासंतास बसून अध्ययन करणाऱ्या – वाचन करणाऱ्या बीटी भाऊंचा आदर्श आजच्या टीव्ही – मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी आचरणात आणणे आवश्यक आहे.
भाऊंची ज्ञानलालसा बघून लेखकाने त्यांना ‘ज्ञानतपस्वी’ ही उपाधी दिली आहे, कारण घराचे दोन मजले ग्रंथालयासाठी समर्पित करणारे भाऊ आणि ग्रंथालयात साडेतीन हजार ग्रंथ संग्रही ठेवणारे भाऊ होते. या त्यांच्या ग्रंथसंग्रहाचा आणि वाचन संस्कृतीचा आदर्श शिक्षक – प्राध्यापकांनीच नव्हे तर वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने घेतला पाहिजे. असे वाचकांना वाटल्याशिवाय राहणार नाही.

‘नेतृत्व’ या नवव्या लेखांमध्ये बी. टी. सरांचे नेतृत्व गुण येथे सांगण्याचा प्रयास लेखकाने केलेला आहे. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठातील कार्य असो की १९८३ मध्ये स्थापन झालेल्या अमरावती विद्यापीठातील कार्य असो बी.टी.सरांच्या प्रभावी कार्यपद्धतीतून त्यांच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणाचे दर्शन घडत असे.

‘लोकप्रतिनिधींचा मानदंड’ या दहाव्या लेखात लोकप्रतिनिधी कसा असावा तर बीटी सरांसारखा हे येथे लेखकाने सांगितले आहे. सतत ३० वर्षे म्हणजे आयुष्यातील दहा हजार नऊशे पन्नास दिवस भाऊ लोकप्रतिनिधी म्हणून जनकल्याणाचा ध्यास घेऊन सभागृहात लढत होते. आमदारकीसाठी वैयक्तिक इच्छा-आकांक्षा, नातेवाईक, निवांतपणा, आयुष्यातील मौजमजा त्यागणारे भाऊ जगावेगळेच म्हणावे लागेल. अकरा आदर्श लोकप्रतिनिधीची
गुणवैशिष्ट्ये बी. टी. सरांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरली होती असे लेखक आत्मविश्वासाने लिहितात. लोकप्रतिनिधी कसा असावा ? तर बी. टी. सरांसारखा आदर्श असावा, हेच येथे लेखकाला सांगायचे आहे.
आपल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ सांसदीय कारकीर्दीत सर्व सांसदीय आयुधांचा प्रा. बी. टी. देशमुख या लोकप्रतिनिधीने उपयोग करून अपक्ष निवडून येणारा हा एकटा लोकप्रतिनिधी जनकल्याणार्थ सिंहासारखा लढला. लोकप्रतिनिधीच्या लढ्याला ‘सिंहाची’ उपमा दिल्यामुळे त्यांचा कणखरपणा आणि जनहितार्थ असलेला तीव्र संघर्ष वाचकाच्या डोळ्यांसमोर हुबेहूब लेखकाने उभा केलेला आहे. ‘सिंहासारखा लढला’ या शब्दप्रयोगामुळे साध्या विधानाला एक वेगळी भव्यता आणि नादमयता प्राप्त झाली आहे, जी ऐकायला व वाचायला अधिक प्रभावी वाटते तसेच या वाक्यातून बीटी सरांच्या शौर्य, पराक्रम आणि धैर्याची अनुभूती येते, त्यामुळें भाषेत वीर रस निर्माण झालेला आहे.

‘कर्मयोगी’ या अकराव्या लेखात लेखकाने, “भाऊ रुबाबात जगले. अदबीने वागले. आत्मासन्मानासाठी कधी तडजोड केली नाही. रुबाबात गेलेही. कर्मयोग्यासारखे!”
येथे रुबाबात जगले, रुबाबातच गेलेही’ या शब्दांची झालेली पुनरावृत्ती अत्यंत प्रभावी आहे. यामुळे वाक्याला एक सुंदर आंतरिक लय आणि नादमाधुर्य प्राप्त झाले आहे. विरोधाभासातून येथे सत्य मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. ‘जगणे’ आणि ‘जाणे’ (मृत्यू) या दोन परस्परविरोधी संकल्पना आहेत. मात्र, त्या दोन्ही क्रियांना ‘रुबाबात’ या एकाच शब्दाने जोडून लेखकाने जीवन आणि मृत्यू या दोन्ही प्रवासांमधील सातत्य आणि मोठेपणा अतिशय सुबकपणे मांडला आहे. उपमा अलंकाराचा सहज वापर येथे लेखकाने केटेला आहे. वाक्याच्या शेवटी ‘कर्मयोग्यासारखे’ हा शब्द वापरून येथे सुंदर उपमा दिली आहे. यामुळे प्रा. बी. टी. देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाला थेट एक ऋषितुल्य किंवा निष्काम कर्म करणाऱ्या व्यक्तीची उंची प्राप्त झालेली आहे. वाक्याच्या शेवटी असलेले उद्गारवाचक चिन्ह (!) या विधानामागील आदर, कौतुक आणि आदरांजलीची उत्कट भावना तीव्रतेने व्यक्त करते.
‘रुबाबात जगले’ याचा अर्थ असा की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अत्यंत स्वाभिमानाने, नैतिक मूल्यांशी तडजोड न करता आणि करारीपणाने जगले. त्यांचे जनमानसातील आणि राजकारणातील स्थान मानाचे होते. ‘रुबाबातच गेले’ यातून लेखकाला हे सुचवायचे आहे की, मृत्यू समोर असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर किंवा कार्यात कोणतीही लाचारी, भीती किंवा दैन्य नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपली प्रतिष्ठा आणि वैचारिक श्रीमंती ढळू दिली नाही. नुटा बुलेटीनच्या स्मरणिकेचे कार्य करता करताच ते अनंतात विलिन झाले. ‘कर्मयोगी’ म्हणजे अशी व्यक्ती जी फळाची आशा न धरता अविरतपणे आपले कर्तव्य करत राहते. प्रा. बी. टी. देशमुख यांनी प्राध्यापक, आमदार, संसदपटू, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आयुष्यभर जनसेवेचे जे व्रत चालविले, ते एका खऱ्या कर्मयोग्यासारखेच निष्कलंक होते, हा अथांग अर्थ या एका शब्दात सामावलेला आहे, म्हणूनच लेखकाने बी. टी. सरांसाठी ‘कर्मयोगी’ या शब्दाचा उल्लेख येथे अतिशय चपखलपणे केलेला आहे. अशाप्रकारे जनकल्याणासाठी कर्म करणार्‍या बीटी सरांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व या लेखांमधून ओसंडून वाहताना दिसते.

पुस्तकाच्या मलपृष्ठावर मा. आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांचा जीवनपट दिलेला असून भाऊंचे सहा – कलर फोटो छापले आहेत. मुखपृष्ठावरील प्रा. बी. टी. देशमुख यांची हास्य मुद्रा आणि पुस्तकाचे शीर्षक व लेखकाचे नाव आकर्षक पद्धतीने प्रकाशित केले आहे.
प्रकाशनाच्या क्षेत्रात नावाजलेल्या ज्ञानपथ पब्लिकेशन, अमरावती यांनी ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ हे पुस्तक आकर्षक व सुंदर स्वरूपात प्रकाशित केले आहे. संसदपटू, आदर्श लोकप्रतिनिधी प्रा. बी. टी. देशमुख यांच्या जीवन कार्यावरील व प्रभावी व्यक्तिमत्त्वावरील
‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’ हे पुस्तक संग्राह्य असून वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारे आहे. बीटी सरांवर प्रेम करणाऱ्यांसाठी तर हे पुस्तक आनंदाची पर्वणीच आहे. जन्मापासून तर अंतापर्यंत बीटी भाऊंचे भाषा सौंदर्याच्या विविध गुणांसह ललितरम्य भाषेत पुस्तक रूपात प्रकाशित केल्याबद्दल लेखक डॉ. किशोर फुले यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील लेखन प्रवासासाठी मनस्वी सदिच्छा !

पुस्तकाचे नाव : ‘दिव्यत्वाची जेथं प्रचिती’
लेखकाचे नाव : डॉ. किशोर फुले
भ्र.ध्व. : ९४२३१२४७०८
प्रकाशकाचे नाव : ज्ञानपथ प्रकाशन, अमरावती.
पृष्ठसंख्या : ३२
मूल्य : १००₹

 

समीक्षक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा