थोर विदुषी सावित्रीबाई फुले यांनी तिच्या लेकींना शिक्षणाचे बाळकडू देण्यापूर्वी सगळ्या महिलांच्या धडावर डोके होतेच आणि त्यात मेंदू नावाचा अवयव सुद्धा होताच. मग शिक्षण घेतल्यावर असा कोणता फरक पडला की त्यासाठी सावित्रीबाईंना सलाम करावा ?
गोंधळून जाऊ नका मी सावित्रीबाई आणि महिलांचे शिक्षण या दोन्हीच्या विरोधात नाही परंतु आजची महिलांची अवस्था बघून मला फक्त काही प्रश्न निर्माण झाले आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यानिमित्ताने तुमच्या सुद्धा मेंदूला झिणझिण्या आणणे एवढाच माझा हेतू आहे.
थोडक्यात केवळ शिक्षणाने महिलांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा अभ्यास करता येऊ शकत नाही, त्यासाठी विविध परिमाणे वापरावी लागतात. त्याचा वापर केल्यावर लक्षात येते की स्त्री शिक्षणाच्या पूर्वीही अतिशय समंजस, धोरणी, धीरोदात्त आणि आपली क्षेत्रे गाजवणाऱ्या महिला होऊन गेल्या आहेत परंतु त्यांचे प्रमाण नगण्य आहे.
शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यावर हा टक्का नक्कीच वाढला असला तरी सामाजिक भान, विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकॊन या सोबतच सत्य-असत्य पारखण्याची दृष्टी बहुतांश महिला आणि त्यातही शिकलेल्या भगिनी गमावून बसल्याचे जाणवते.
इतर क्षेत्रातील जाऊ द्या पण प्रामुख्याने मेडिकल क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या अनेक भगिनी दैनंदिन जीवनात इतरांच्या तुलनेत अधिक जाणकार असल्यावर सुद्धा असंख्य बुवा, बाबा, स्वामी, बापू यांच्या नादात लागलेल्या बघितल्या की त्यांच्या शिक्षणाची कीव आणि त्यांच्यावर दया येते. अमुक फुल घरात ठेवणे अशुभ असते किंवा महिलेने अमुक दिवशी हे करू नये किंवा महिलेने अमुक झाडाला स्पर्श करू नये अशी वाक्ये जेव्हा या क्षेत्रातील महिलांच्या तोंडून येतात तेव्हा मला अनेकदा स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यावीशी वाटते. सावित्रीबाई फुकट खपली बिचारी असे वाटायला लागते.
ज्यांना शरीर रचना, त्यात होणारे नैसर्गिक बदल शिकवले जातात त्याच महिला जर पाळीच्या दिवसात घरात, समाजात विटाळ पाळायला लागल्या असतील तर यांनी वैद्यकीय क्षेत्रातले नेमके कोणते शिक्षण डोक्यात शिरू दिले असेल ? असा प्रश्न पडायला लागतो.
मुलांचे जन्म कसे
होतात, ते होण्यासाठी काय करावे लागते हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय होता अश्या भगिनी मूल व्हावे म्हणून उपासतापास करायला लागल्या असतील तर नेमके कुठे चुकले ? हे शोधायला हवे.
बायकांना डोके नसते असल्या सरसकट शेरेबाजीचा मी प्रखर विरोधक आहे परंतु अश्या कुचकट म्हणी खऱ्या करून दाखविण्याच्या स्पर्धेत असणाऱ्या असंख्य महिलांचा सुद्धा मी तेवढाच विरोधक आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेने काही गोष्टी तुमच्यावर त्यांच्या मतलबासाठी लादल्या असतील तर त्याचा एकदा आढावा घेतला पाहिजे त्यासाठीच मेंदू नावाचा प्रचंड सामर्थ्यशाली अवयव निसर्गाने सगळ्यांना दिला आहे. मग करा ना. त्याचा वापर आणि ठरवा काय चुकीचे अन काय खरे ते. पण असे होताना दिसत नाही, बेंबीत कस्तुरी घेऊन सुगंधाच्या शोधात फिरणाऱ्या कस्तुरी मृग बनलेल्या भगिनी पाहिल्या की आणखी किती दिवस ह्या अश्या राहणार आहेत याची चिंता वाटते.
गावात शहरात कोणताही सत्संग, धार्मिक सोहळा असला की त्याला सर्वाधिक गर्दी महिलांची असते. महिला ह्याच सगळ्यांचे सहज सावज बनलेल्या आहेत. सगळ्याच धर्मानी महिलांना नरकाचे दार ठरवले आहे, या धर्मांचे सगळे संस्थापक महिलांच्या पोटीच जन्मले परंतु त्या सगळ्यांनी आईचे असे पांग फेडले आहे हे लक्षात घ्यायला हवे.
धर्म सगळे सोडून आपल्याच मागे एवढे का लागले असतील ? असा प्रश्न ज्या दिवशी एखाद्या महिलेला पडेल तेव्हा धर्मावर नक्कीच ग्लानी येईल हे लिहून घ्या. परंतु त्यासाठी महिलांनी आधी धर्मशास्त्रे वाचली पाहिजेत ना, किमान मनुस्मृती सारखा ग्रंथ तरी वाचायला हवा. तुम्ही वाचत नाही मात्र जे बुवा, बाबा आणि पंथ चालविणारे असतात त्यांनी हे सगळे ग्रंथ वाचलेले असतात, धर्मानी महिलांचा किती भयंकर पद्धतीने अपमान केलेला आहे याची माहिती असताना हेच महाराज, आचार्य आणि प्रवचनकार यांच्या पाठीशी महिलाच उभ्या असतात हे भयंकर आहे. सत्संग, प्रवचन मैदानावर ऐका की टीव्हीवर हे बाबा, बुवा असे काही तोटके सांगत असतात की ज्यावर कोणताही तर्क लागू पडत नसतो. अनेक कर्मकांडे महिलांच्या डोक्यात टाकली जातात कारण त्यांना माहित असते की महिला या मंचावरून काहीही ऐकून घ्यायला तयार असतात. ज्यांना साधे साधे तर्क लावता येतात त्या अडाणी महिला सुद्धा अनेकदा अश्या बुवा बाबांची टिंगल उडवतात मात्र शिकलेल्या भगिनी त्यातही एखादे लॉजिक शोधत असतात.
अनेक प्रसूती तज्ज्ञ महिला आहेत, त्यांना आईच्या पोटात मूल कोणत्या अवस्थेत असते, त्याच्या हाताच्या मुठी कश्या वळलेल्या असतात, त्यावरून हातांवर रेषा कश्या निर्माण होतात, त्याची वाढ कशी होते याचे उत्तम ज्ञान असल्यावर सुद्धा हातांच्या रेषा बघून मुलांचे भविष्य रस्त्यावरील एखाद्या कुडमुड्या ज्योतिष्याकडून बघून घेतात तेव्हा मला खात्रीच होते की वैद्यकीय ज्ञान यांच्या मेंदूतून डिलीट झाले आहे. आता केवळ या क्षेत्रातील पदवीवर यांचा व्यवसाय सुरु आहे. यासाठी केवळ महिलाच जबाबदार आहेत असा माझा सरसकट आरोप नाही त्याला कुटुंबातील वातावरण, पुरुषप्रधानता आणि वाट्याला आलेले लिंगभेद नक्कीच कारणीभूत आहेत.
जन्माला येण्यापूर्वी कुणीतरी प्रत्येकाचे नशीब लिहून ठेवले आहे अशी थाप बालपणीच आपल्या सगळ्यांच्या मेंदूवर सत्याच्या स्वरूपात कोरली जाते म्हणून काहीही केले तरी शेवटी नशिबात असेल तेच होईल हे नेहमीचे वाक्य स्वीकारण्यात महिलांना समाधान वाटते. लक्षात घ्या नशीब मानणे म्हणजे जगातील सगळ्या महिलांचा पराक्रम, प्रयत्न, जिद्द आणि अभ्यास नाकारणे होय.
एक कल्पना करून बघा, जन्मापासून तर मरेपर्यंत सगळे काही लिहिलेले असेल तर तुमच्या प्रयत्नांना कुठलाही अर्थ उरत नाही. महिला या वर विचार करताहेत हे लक्षत आल्यावर काहींनी त्याला नशिबाला पण प्रयत्नांची जोड आवश्यक असते अशी थाप मारली आहे. जर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नशीब लिहिलेले असते तर ज्याची कल्पना देवांनाही नाही असे शोध, मानवाने लावले नसते. मानवी मेंदूची व्यापकता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ज्यांना नाकारायची होती त्या धर्मव्यवस्थानी हा कचरा आपल्या डोक्यात टाकला आहे आपण त्याचे प्रभावी वाहक बनलेले आहोत, एकदा हे ओझे झटकून मोकळा श्वास घेण्याची गरज आहे.
भगिनींनो तो तुम्ही घेणार आहात की नाही ? जो कधी दहावी बारावीच्या पुढे शिकला नाही असा प्रवचनकार खुशाल काहीही फेकत असतो आणि माझ्या शिकलेल्या भगिनी त्यावर माना डोलवत नाहीत तर त्याचे तंतोतंत पालन करायला लागतात हे अधिक गंभीर आहे. शिकलेले परिवार गर्भात स्त्री भ्रूणहत्या करायला लागले यामागे याच धर्मव्यवस्थेने दिलेले संस्कार आहेत याचा विसर महिलांना पडल्याने सगळा अनर्थ झाला आहे तो व्यवस्थित समजून घेता आला तर बघा.
लेखक –
पुरुषोत्तम आवारे पाटील
साहित्यिक तथा पत्रकार, अकोला.
(संकलन – विवेक गं. राऊत)
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






