शुद्ध बीजापोटी l फळे रसाळ गोमटी ll

SHARE:

संत तुकाराम महाराज म्हणतात की, ईश्वरी शक्तीने सर्व जग व्यापलेले आहे. ईश्वरी शक्ती म्हणजेच चैतन्य. हे चैतन्य नरदेहास प्राप्त करून घ्यावयाचे असल्यास मनुष्यास मिळालेला हा नरदेह शुद्ध असणे आवश्यक आहे. देह किंवा चित्तशुद्धी करण्याचे प्रयत्न म्हणजेच साधना किंवा तप होय. चित्तशुद्धी हा शब्द संत साहित्यात वारंवार वापरला जातो. संत तुकारामांची चित्तशुद्धीला अत्यंत महत्व दिलेले आहे.

 

शुद्ध बीजापोटी l
फळे रसाळ गोमटी ll
मुखी अमृताची वाणी l
देह वेचावा कारणी ll
सर्वांगी निर्मळ l
चित्त जैसे गंगा जळ ll
तुका म्हणे जाती l
ताप दर्शने विश्रांती ll
चित्त शुद्ध का असावे यासाठी तुकाराम दाखले देतात की, पेरणी करताना बीज शुद्धच हवे. बी जर उत्तम असेल तर त्याला उत्तम फळे लागतील व ती फळे रसाळ आणि सुंदर देखील असतील. त्याच प्रमाणे माणसाच्या मुखात सतत गोड आणि अमृततुल्य शब्द असतील, त्याची वाणी अमृतमय असेल आणि चित्त गंगा जलाप्रमाणे असेल तर अशा साधू वृत्तीच्या, सज्जनांच्या दर्शनाने माणसाच्या जीवनातील सर्व त्रास, ताप, दुःख, दैन्य इत्यादी बाबतचे सर्व प्रश्न किंवा समस्या दूर होऊन त्याच्या मनाला विश्रांती मिळेल. चित्तशुद्धीला असे अनन्यसाधारण महत्व असल्याने संत तुकाराम त्यांच्या अनेक अभंगातून चित्तशुद्धी हा शब्द वापरतात.

खऱ्या संताचे बोलणे देखील अमृततुल्य असावे. त्याचे मन पवित्र व निर्मल असावे. असा सत्पुरुष सर्व व्यापातापातून माणसाचे रक्षण करू शकतो. अनंत यातना, चिंता, त्रास, संकटे असलेल्या संसार रूपी सागरातून तरुन जाण्यासाठी तो खचलेल्या माणसाला हिमत देऊ शकतो. ज्याप्रमाणे शुद्ध बीजामुळे उत्तम, फळ मिळते. त्याचप्रमाणे अमृततुल्य वाणी व शुद्ध चित्त असणाऱ्या संतांचे बोलणे माणसाच्या मनातील दुःखे दूर करून तेथे सज्जन माणसासारखेच पवित्र व निर्मळ मन असणारी आणि कोणालाही न दुखावणारी शुद्ध अंतःकरणाची, चित्त शुद्ध असणारी गोड माणसेच समाजात निर्माण होतील आणि हा समाज सुखी होईल. असा विश्वास तुकारामांना आहे.

सत्कर्म करणे आणि चांगले वागणे, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हाच माणसाचा खरा धर्म आहे. मानवी जीवन आणि मानवधर्म हे परस्पर संगत व्हावयास पाहिजे. मनुष्य जे कार्य करतो ते एकतर धर्मानुकुल तरी असते किंवा अधर्माचे तरी तरी असते. म्हणून आधीच चांगला विचार करून, चित्त शुद्ध ठेवून चांगलेच कर्म करावे. जे धर्माला धरून राहील. मनुष्याचे कर्म हे धर्म आणि अधर्म यात समाविष्ट होत असते.

मनुष्याच्या जन्मा बरोबर चांगले वागून, जिभेवर अमृत ठेवून बोलण्याचा, सत्कर्म करण्याचा धर्मही त्याच्यासोबत जन्माला आलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनातील प्रत्येक कर्माच्या क्षणी तो त्याच्यासोबत असतो.
एक प्रसिद्ध सुभाषित आहे, “स्त्री घरच्या दारापर्यंत बरोबर असते. इष्टमित्र स्मशाना पर्यन्त पोचविण्यासाठी जातात. देह चिते पर्यंत राहतो. त्यानंतर परलोक मार्गाने जीव एकटाच जात असतो. पण त्याच्या बरोबर त्याने आयुष्यभर केलेला धर्म सतत सोबत असतो.”

संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला मानवता धर्म चित्तशुद्धी, मुखी अमृताची वाणी, देह सत्कार्यासाठी झिजवणे, हाच आहे. जगाने सुखी व्हावे यासाठी हा मूलमंत्र तुकारामांनी दिलेला आहे.
याच मूलमंत्रात समाजाच्या उत्थानाची ताकद आहे.
“शुद्ध चर्या हे संतांचे पूजन l
लागतची धन नाही वित्त ll”
शुद्ध आचरणावरच तुकारामांचा भर आहे. मन, चित्त शुद्ध झाले की आचरण आपोआपच शुद्ध होतेच.

तत्कालीन भरकटलेल्या व मरगळलेल्या समाजाला दिशा, प्रेरणा, आणि चैतन्य देण्याचे तसेच अध्यात्मा बरोबरच लौकिक संसारही नीटनेटका करण्याचे कार्य तुकारामांनी करून फार मोठी सामाजिक कामगिरी देखील केली आहे.

 

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा