नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव l मी तू भक्त ऐसे करी ll

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे….

 

संत साहित्यात बहिरंग आणि अंतरंग दोन्हीही साधनांचा उल्लेख आढळतो. परंतु बहिरंग साधनेच्या तुलनेत अंतरंग साधनांचे उल्लेख कमी आढळतात. याचे कारण म्हणजे नेहमीच संतांचा उपदेश हा सामान्य जनतेसाठी सांगितल्या गेला आहे. धर्मशास्त्राचा परंपरागत संकेत असा आहे की मंत्र, तंत्र, योग, आणि, भक्ती ह्यातील काही गुरुगम्य रहस्य अनधिकारी व मंद बुद्धीच्या लोकांसमोर प्रकट करू नये. याबाबत खुद्द ज्ञानेश्वरांनी देखील असे म्हटले आहे की,
“खुणा जरी बोलो l
तरी मौन पडले ll”
किंवा
“मज बोलू नये ऐसे केले l
मन उन्मनी बोधले ll”
तुकारामांनी देखील
“न सांगावे वर्म l
जगी असो द्यावा भ्रम l
उगीच लागतील पाठी l
होती रितीच हिंपुटी ll”
असे उद्गार काढले आहेत.
आणि ते असेही सांगतात,
“अधिकार तैसा देऊ उपदेश l”
“संतत्व” प्राप्त झाल्याशिवाय उपदेश देण्याचा अधिकारी प्राप्त होत नाही. हे संतत्व प्राप्त होण्यासाठी तुकारामांनी “नामस्मरण” ह्या साधनांचा अवलंब केला.असे त्यांच्या अभंगातील प्रमाणावरून दिसून येते.

तसेच भक्ती करण्यासाठी एकांत मिळावा म्हणून तुकाराम घरदार सोडून भंडारा डोंगरावर जाऊन राहत असत. यासाठी त्यांनी “अंतरंग” साधनेचा अवलंब केला. अंतरंग साधनात निरनिराळे योगाभ्यास, ध्यान, मधुरा भक्ती, इ. चा समावेश होतो. तुकारामांनी रचलेल्या गौळणी ह्या त्यांनी केलेल्या मधुर भक्तीची म्हणजेच राधा भावाने केलेल्या साधनेच्या द्योतक ठरतात.

“कोणी सुना कोणी लेकी l
कोणी एक स्वतंता ll”
“अलिंगन कंठाकंठी l”
“त्यांच्या आंधळा या रुपकात ll”
“सूखे मी निजले गा l
शुन्य सारूनी तेथे ll”
किंवा
“दान मिळते आयते l
उर्ध्व मुखे आळविला, सोहम शब्दाचा नाद ll”
या अभंगातील उल्लेख कुंडलिनी योग, नांदण्यास सूचक आहेत. शिवाय कित्येक अभंगातून अनुहत, उन्मनी, तूर्या, पंच महाभूते, त्रिपुटी, सत्रावी कळा इ. वेगवेगळे अभ्यास सूचक शब्दही आले आहेत.

यावरून तुकारामांनी बहिरंग साधनेसोबतच अंतरंग साधनेचा ही अवलंब केला आहे हे सूचित होते.
“नको ब्रह्म ज्ञान,आत्मस्थिती भाव l
मी तू भक्त ऐसे करी ll
व
“जाणोनी नेणते करी माझे मन l
तुझी प्रेम खुण देवोनिया ll”
ध्यान, मौन, संन्यास ही साधने उत्तम आहेत. पण ती करण्याचा अधिकार प्रथम अंगी बनून घेतला पाहिजे. अपरिपक्व अवस्थेत घरदार सोडून संन्यास घेऊ नये, असे तुकाराम महाराज बजावून सांगतात.

भक्ती किंवा साधना ही ईश्वर विषयीची प्रेमभावना आहे. तुकारामांना मोक्षापेक्षा भक्तीचीच आवड आहे. परमेश्वराच्या भक्तियुक्त प्रेमरंगात अंतर्बाह्य न्हाऊन निघण्यासाठी भक्ताचा सहवास “संतसंग देई सदा” नित्य घडावा ,विठ्ठलाचे नाम सदा मुखी रहावे म्हणून धडपडतात
“विठ्ठल हा चित्ती l
गोड लागे गाता गीती ll”

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
संपर्क – ९५२३२७९४३२

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा