महाराष्ट्रातील हजारो तरुण तरुणी सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न घेऊन वर्षानुवर्षे अभ्यास करत आहेत. हातात पदवी आहे, डोक्यात ज्ञान आहे, मेहनत करण्याची तयारी आहे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. मात्र या सगळ्यांच्या बदल्यात त्यांच्या वाट्याला येतेय ती सततची अनिश्चितता.. पेपरफुटी, परीक्षा पुढे ढकलण्याची भीती, निकालाची प्रतीक्षा आणि भरती प्रक्रियेतील गोंधळ. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ही केवळ एक स्पर्धा परीक्षा नाहीय. ती राज्यातील लाखो कुटुंबांच्या आशा, आर्थिक संघर्ष आणि तरुणांच्या भवितव्याशी जोडलेली व्यवस्था आहे. पण आज या व्यवस्थेकडे पाहिलं, तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीपेक्षा त्यांची सहनशक्तीच जास्त तपासली जात असल्याचं दिसतं.
MPSC ची तयारी करणारा विद्यार्थी एका दिवसात तयार होत नाही. अनेक वर्षे तो स्वतःच्या आवडी, नोकरीच्या संधी, सामाजिक आयुष्य आणि वैयक्तिक सुखांचा त्याग करतो. ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी शहरात खोली घेऊन राहतो. आईवडील शेती, मजुरी किंवा छोटा व्यवसाय करून त्याचा खर्च भागवतात. काही विद्यार्थी स्वतः अर्धवेळ काम करून अभ्यास करतात. महागडी पुस्तके, क्लासेस, टेस्ट सिरीज, राहण्याचा खर्च, प्रवास आणि इंटरनेट यासाठी मोठी रक्कम खर्च होते. एका परीक्षेच्या तयारीसाठी घरातील अनेक वर्षांची बचत खर्ची पडते. या सगळ्या संघर्षानंतर जर परीक्षा वेळेवर झाली नाही, निकाल वेळेवर लागला नाही किंवा भरतीची प्रक्रिया वर्षानुवर्षे लांबली, तर त्याचा फटका फक्त विद्यार्थ्याला बसत नाही तर संपूर्ण कुटुंबाला बसतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ‘वय’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. सरकारी सेवेसाठी असलेल्या वयोमर्यादेमुळे प्रत्येक वर्ष महत्त्वाचं ठरतं. एखादी परीक्षा पुढे ढकलली गेली, भरतीची जाहिरात उशिरा आली किंवा निकाल रखडला, तर विद्यार्थ्याच्या हातातून संधी निसटू शकते. वय वाढत जातं, पण भरतीच्या जागा वाढत नाहीत. काही विद्यार्थी दोन-तीन वर्षे एका परीक्षेची वाट पाहतात. त्यानंतर परीक्षा झाली तरी निकाल, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि नियुक्ती या प्रत्येक टप्प्यावर विलंब झाला, तर त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे प्रतीक्षेतच निघून जातात. प्रशासनासाठी हा ‘विलंब’ असतो पण विद्यार्थ्यासाठी तो आयुष्याचा एक महत्त्वाचा काळ असतो.
या विद्यार्थ्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे भरती प्रक्रियेतील सातत्याचा अभाव. कधी जाहिरात उशिरा येते, कधी पदांची संख्या कमी असते, कधी परीक्षा पुढे ढकलली जाते, कधी अभ्यासक्रम किंवा परीक्षा पद्धतीबाबत संभ्रम निर्माण होतो. कधी एखाद्या प्रश्नावर आक्षेप घेतला जातो, कधी निकालाला विलंब होतो. कधी पेपर फुटतो. विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं, कोणत्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचं आणि पुढची संधी कधी मिळणार, याचं स्पष्ट चित्र दिसत नाही. त्यामुळे अभ्यासापेक्षा नोटिफिकेशन तपासणे, सोशल मीडियावरील अपडेट्स पाहणे आणि अफवांवर चर्चा करणे यात त्यांचा वेळ जातो. अभ्यासाची दिशा बिघडते आणि मानसिक ताण वाढतो. MPSC च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा केवळ ‘सरकारी नोकरी मिळत नाही’ इतकाच मर्यादित नाही. हा प्रश्न राज्याच्या रोजगार धोरणाचा आहे. महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, कृषी, विज्ञान आणि इतर शाखांमधून दरवर्षी हजारो विद्यार्थी पदवीधर होतात. खासगी क्षेत्रात सर्वांना योग्य संधी मिळत नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी ही स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग असते. त्यामुळे MPSC ही त्यांच्यासाठी एक मोठी आशा बनते. पण जेव्हा त्या आशेची प्रक्रिया पारदर्शक, वेळबद्ध आणि विश्वासार्ह राहत नाही, तेव्हा विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळतो.
यातील आणखी एक गंभीर बाजू म्हणजे मानसिक आरोग्य. सततचा अभ्यास, आर्थिक अडचणी, कुटुंबीयांच्या अपेक्षा, मित्रांच्या नोकऱ्या लागणे, स्वतःची परीक्षा वारंवार चुकणे आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली जगतात. एका विद्यार्थ्याच्या अपयशाकडे समाज अनेकदा वैयक्तिक कमतरता म्हणून पाहतो. पण प्रत्येक अपयशामागे आळस किंवा अयोग्यता असतेच असं नाही. काही वेळा व्यवस्था इतकी अनिश्चित असते की मेहनती विद्यार्थ्यालाही योग्य संधी मिळत नाही. ‘अजून अभ्यास कर’, ‘पुन्हा प्रयत्न कर’ हे सांगणं सोपं आहे. पण त्यासाठी लागणारा पैसा, वेळ, मानसिक ताकद आणि कुटुंबाचा आधार प्रत्येकाकडे असेलच असं नाही. सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाकडे केवळ परीक्षा घेण्याच्या प्रशासकीय प्रक्रियेप्रमाणे पाहू नये. MPSC च्या प्रत्येक परीक्षेसाठी निश्चित वार्षिक कॅलेंडर असायला हवं. जाहिरात, परीक्षा, निकाल, मुलाखत आणि नियुक्ती यासाठी स्पष्ट वेळापत्रक जाहीर करून ते पाळलं पाहिजे. कोणत्याही कारणाने परीक्षा पुढे ढकलावी लागली, तर विद्यार्थ्यांना वेळेवर अधिकृत माहिती देणे आवश्यक आहे. पदांची संख्या, आरक्षण, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि निकाल याबाबत पारदर्शकता असली पाहिजे. तसेच भरती प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे वयोमर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ती सवलत किंवा विशेष संधी देण्याचाही गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
विद्यार्थ्यांना केवळ आश्वासनांची गरज नाहीय. त्यांना निश्चितता हवी आहे. ‘लवकरच परीक्षा होईल’, ‘लवकरच निकाल लागेल’, ‘लवकरच जाहिरात निघेल’ या वाक्यांनी त्यांचं आयुष्य पुढे सरकत नाही. त्यांना तारीख हवी, वेळापत्रक हवं आणि त्या वेळापत्रकावर विश्वास ठेवता आला पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनांकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहण्याऐवजी संवादाचा विषय म्हणून पाहायला हवं. आंदोलन करणारा प्रत्येक विद्यार्थी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी रस्त्यावर आलेला नसतो. अनेकदा तो स्वतःचं भविष्य वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेला असतो. MPSC विद्यार्थी हा राज्याच्या प्रशासनाचा भावी कणा आहे. आज जो विद्यार्थी अभ्यास करत आहे, तो उद्या तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, कर अधिकारी किंवा प्रशासनातील जबाबदार अधिकारी होऊ शकतो. समाजातील प्रश्न समजून घेणारे, ग्रामीण भागातील अडचणी जाणणारे आणि सामान्य नागरिकांच्या वेदना अनुभवलेले हे विद्यार्थी प्रशासनात आले, तर शासन अधिक संवेदनशील होऊ शकतं. पण त्याच विद्यार्थ्यांना आज जर वर्षानुवर्षे प्रतीक्षेत ठेवण्यात आलं, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यांच्या संघर्षाची खिल्ली उडवली गेली, तर ही केवळ विद्यार्थ्यांची हानी नसून ती राज्याच्या भविष्यातील प्रशासनाचीही हानी आहे.
महाराष्ट्रातील MPSC विद्यार्थ्यांची वाताहत थांबवायची असेल, तर भरती प्रक्रियेत वेळबद्धता, पारदर्शकता आणि जबाबदारी आणावी लागेल. विद्यार्थ्यांना दया नको, उपकार नकोत आणि पोकळ आश्वासनंही नकोत. त्यांनी केलेल्या मेहनतीला न्याय देणारी व्यवस्था हवी आहे. त्यांच्या स्वप्नांना सतत पुढे ढकलणारी नव्हे, तर त्या स्वप्नांना योग्य वेळी संधी देणारी राज्यव्यवस्था हवी आहे. कारण तरुणांच्या हातात पुस्तकं असताना त्यांना प्रतीक्षेच्या रांगेत उभं करणं, ही कोणत्याही प्रगत राज्याची ओळख असू शकत नाही.
Author: तेजस्वी बारब्दे पाटील
लेखिका अमरावती येथील रहिवासी असून सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या तथा विश्लेषक आहेत. एक स्तंभलेखक म्हणून त्यांनी स्वतः ची नवीन ओडख निर्माण केली आहे.






