बाबा, हिंदू राष्ट्र आणि मांस मच्छी.!

SHARE:

या तीस वर्षाच्या तरुणाचे नाव आहे धीरेंद्र कृष्ण गर्ग. आता त्याला परमपूज्य गुरुदेव श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज वा बागेश्वर धाम सरकार असे संबोधले जाते. मध्य प्रदेशमधील बागेश्वर धाम या मंदिराचे ते प्रमुख आहेत. त्यांना तो वारसा घरातूनच मिळालेला आहे. म्हणजे पूर्वी वडील पुजारी होते. त्यापूर्वी आजोबा. हा मुलगा मात्र खूपच हुशार निघाला. लहानपणापासूनच गावातल्या लोकांसमोर व्याख्यान द्यायचा. मानसशास्त्रीय अभ्यास चांगला होता. समोरच्याच्या मनात काय आहे हे ओळखण्याची कला आत्मसात झाली. मनकवडा बनला. भक्तांना चमत्कार दिसू लागले. भक्त नमस्कार करू लागले. भक्तांची संख्या वाढली. घरातली गरिबी संपली.

 

दरम्यान अशा साधू संतांना हेरून त्यांचा वापर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी पुढारी मंडळीकडून होऊ लागला. निवडणुका जवळ आल्या की नुसत्या राजकीय नेत्यांच्या सभा लावून काम होत नव्हते. वातावरण निर्मितीसाठी अशा बाबा लोकांचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. प्रचंड पैसा खर्च करून लाखोंच्या संख्येने भाविक गोळा केले जाऊ लागले. मग त्या राजकीय पक्षांना साजेशी वक्तव्ये हे बाबा लोक जाहीरपणे करू लागले. बाबांसोबत व्यासपीठावर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, अनेक मंत्री दिसू लागले. बाबा लोकंही कधी “हिंदू राष्ट्र बनाना है!” अशी गाणी गाऊ लागले. राजकारण आणि धर्म हातात हात घालून एकमेकांची काळजी करत आहे, असं चित्र निर्माण होऊ लागलं.

हा बाबाही काही मागे राहिला नाही. साक्षात प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला छोटा भाई म्हणून संबोधले होते. भक्तांची संख्या शेकडोहून हजारात, हजाराहून लाखांत आणि लाखांतून करोडोमध्ये कशी झाली कळलेच नाही. बाबा जे म्हणतील ते भक्त करायला लागले. बाबांनी हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची मोहीम सुरु केली. लोकांच्या झुंडी सोबत येऊ लागल्या.

बंगालमध्ये तीन दिवसांचा कार्यक्रम होता. मुख्यमंत्री स्टेजवर होते. रात्री जेवायला सोबत होते. इतर मंत्री, आमदार, खासदार कार्यक्रमात होते. ठरल्याप्रमाणे हजारो लोकांच्या झुंडी होत्या. कार्यक्रम बंगाल मध्ये असला तरी लोकांमध्ये अनेक जन उत्तर भारतातील गो पट्ट्यातून तेथे नोकरी धंदा करण्यासाठी आलेले होते. बाबाने हिंदू राष्ट्र पिपाणी वाजवली. मग आपल्या आवडी निवडी सांगू लागले. ‘मा दुर्गा के उत्सवमे आप लोग नॉनवेज खाते मुझे पसंद नही…तरह तरह का गंधा खाना बनाया जाता है…मुझे पसंद नही…आनेवाली नवरात्रीमे हर हिंदू जागे, और ऐसे लोगोको बाहर निकाले, वे पाखंडी है…’ गर्दीतल्या उत्तर भारतीय लोकांनी प्रतिसाद दिला.

आपल्याभोवती जे तेज निर्माण झालेले आहे त्यामध्ये आप्पलपोट्या राजकीय नेत्यांचा जास्त वाटा आहे हे बाबा विसरले. पण हिंदू रीतीरिवाज, परंपरा, खानपान, देविदेवतांना भोग देण्याच्या प्रथा, या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असतात, हे बाबा विसरले. बंगालमध्ये मांस मच्छी चा भोग असतो. आसाममध्ये कामाख्या देवीसमोरही बळी दिला जातो. प्रत्येक ठिकाणी देवीदेवतांसमोर शाखाहारी नैवेद्यच दिला जातो असं नाही. बाबा आपल्या धुंदीत होते. समस्त हिंदूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होते. पण झालं उलटंच!

बाबांनी खानपानावरून लोकांना डिक्टेट करण्याचा प्रयत्न केल्याबरोबर बाबांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचणारे बंगालमधील भक्तही बिथरले. संपूर्ण राज्यभर लोकांनी बाबांच्या फोटोवर चप्पल चा वापर करून फटके मारले. बाबा मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या. जनता शिवीगाळ करू लागली. सकाळ संध्याकाळ बाबांच्या सेवेत असलेले भाजपचे हिंदुप्रेमी मुख्यमंत्रीसुद्धा घाबरले. आपला आणि बाबाच्या बोलण्याचा काही संबंध नाही, हे दाखवू लागले. गुपचूप मंदिरात जाऊन मांस मच्छी खाऊ लागले. त्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करू लागले. बाबावर कारवाई करा. गुन्हा दाखल करा. बाबांना अटक करा. लोक अशा मागण्या करू लागले. बाबाही घाबरले. ‘मला असं म्हणायचं नव्हतं…चुकीचा अर्थ काढला…’ असं लंगडं स्पष्टीकरण देऊ लागले.

धर्म कुठलाही असो…लोकांच्या खाण्यापिण्यावर बंधनं घालायला लागलो की सगळं काही मुळासकट हलायला लागतं.

 

लेखक –
दिलीप लाठी
मीडिया वॉच पब्लिकेशन
(संकलन – विवेक गं. राऊत)

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा