कर्मयोगी – वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोवळ्या वयात लहानपणीच श्रीसंत आडकोजी महाराजांचे शिष्यत्व पत्करले आणि अजाणत्या वयापासून परमार्थ मार्गातील साधना सुरू केली.
“आपुला आपण उध्दार करावा l
संतदेवाचा सहारा घ्यावा ll” (अ.३१/१०६)
या त्यांच्या वचना प्रमाणे साधना चालू असतानाच संत वचनाचा आधार घेऊन त्यांनी आपला स्वतःचा उद्धार केला. पण अवतीभोवतीची परिस्थिती आशादायक नव्हती. देश पारतंत्र्यात होता. गरीब अज्ञानी जन कुठेतरी भरकटत चालले होते. त्यांची ही दुर्दशा बं. महाराजांनी हेरली. या जनतेच्या उद्धारासाठी आपल्याला काय करता येईल, हाच विचार रात्रंदिन महाराजांच्या डोक्यात होता. आधी या लोकांना भक्तिमार्गा ला लावले पाहिजे. आणि यात त्यांचे चित्त स्थिर झाल्यावरच त्यांच्या जीवन सुधारण्याच्या किंवा उद्धराच्या गोष्टीकडे लक्ष द्यावे हे ठरवून ते म्हणू लागले,
“भक्तिविना उद्धार नाही कुणाचा l
भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा l”
महाराज भजन म्हणताना स्वत: उत्तम खंजिरी वाजवत असतं. या भक्तीला त्यांनी सामाजिक सुधारणांची जोड दिली. खांजिरीचा साथीने, भजनाचा उपयोगही त्यानी मोठ्या कळकळीने गाऊन सर्वांगीण उद्धारासाठी केला. भजने व खंजिरी ही दोन साधने त्यांनी आयुष्यभर वापरली. त्यांची भजने आजही लोकांच्या पाठ असून त्या भाजनातून भक्ती कशी करावी याचे उत्तम मार्गदर्शन मिळते. या भजनातून लोकांच्या आचरणात व व्यवहारात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आलेली आहे. या मुल्यांमुळे त्यांच्यात अंतर्बाह्य बदल झाला असून त्याचा परिणाम शुद्ध आचरणात झालेला आहे. ते सन्मार्गाला लागले आहेत.
भगवी टोपी धारण करणारी शुद्ध आचरण करणारी गुरूदेव भजनी मंडळी सदवर्तन आणि सत्कर्याची जबाबदारी उचलतात. गावोगावी जाऊन भजने करून जनमानसात चैतन्य आणतात हे कार्य वरवर सोपे दिसत असले तरी साधे नाही फार महत्त्वाचे राष्ट्र कार्य आहे.
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोझरी हे गाव “गुरुकुंज” या नावाने ओळखले जाते. इथेच त्यांनी आश्रम काढला. हीच वं. महाराजांची कर्मभूमी आहे. देश विदेशात ते फिरले. पण त्यांचे मन इथेच रमले. ते स्वतः एका भजनात म्हणतात,
“मज वेडची गुरूकुंजाचे l”
गुरूदेव सेवा मंडळाच्या शाखा, उपशाखा अनेक ठिकाणी आहेत. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गुरुदेवांच्या विचाराची धुरा सांभाळत आहेत. दिवसेंदिवस श्री गुरुदेव सेवा मंडळाचा व्याप वाढत आहे. त्याद्वारे वं. महाराजांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार होत आहे. वं. महाराजांनी त्यांच्या हयातीत गरीब व अज्ञानी अशा खेड्यातील व शहरातील लोकांनाही ग्राममसफाई, सुतकताई, दवाखाने, शाळा, सामुदायीक प्रार्थना, इ. गोष्टींची शिस्त लावून समाजसेवेचे धडे दिले.
वंदनीय तुकडोजी महाराजांनी “श्री गुरुदेव” या नावाने मासिक काढले होते. आपली प्रकृती चांगली नसतानाही जपानमध्ये जाऊन तेथे भरलेल्या धर्म परिषदेत तयांना अभिप्रेत असलेल्या मानवता धर्माचे, प्रेमधर्माचे स्वरूप विषद करून परत आले. महात्मा गांधी यांच्या कार्यातही त्यांनी सहभाग दिला. महाराजांना म. गांधींनी सांगितले होते की, पुणे, मुंबई सारख्या शहरांची सुधारणा ही भारताची सुधारणा नाही. जोपर्यंत खेडी सुधारली जात नाहीत तोपर्यंत भारत सुधारला असे म्हणता येत नाही. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हावयास हवे. या तत्वज्ञानाने वं. राष्ट्रसंत प्रेरित झाले खेडे सुधारण्याची चळवळ त्यांनी अखंड राबविली. त्यासाठी ते अनेक खेड्यापाड्यातून हिंडले. त्या अनुभवातून त्यांना खऱ्या भारताचे स्वरूप कळले आणि “ग्रामगीता” लिखाणाची त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ४१ अध्यायाचा ग्रामगीता हा ग्रंथ लिहून काढला. ते म्हणतात,
“ईश्वरे व्यापिले हे विश्व l
म्हणोनी जगचि आम्हा देव ll
विश्वाचा मूळ घटक गाव l
ग्रामगीता त्यासाठी ll” (अध्याय ४१/१)
खेडेजिवनाशी निगडित अनेक समस्यांचा आणि त्यावरील उपयांचा ग्रामगितेत उहापोह केलेला आहे. त्यांचे हे कार्य स्वयंभू आहे.
वं. महाराजांनी सांगितलेल्या विचारांमध्ये अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम आहे. त्याचा परिणाम असा दिसुन आला की लोकांमधे सद्भावना जागृत झाल्या. भजनासाठी आणि भाषणासाठी लाखोंच्या संख्येत जनसमुदाय जमा होऊ लागला. बऱ्याच ठिकाणचे तमाशे आणि त्या अनुषंगाने होणारी बीभत्स गाणी बंद झाली. विनोबाजिच्या भूदान यज्ञात त्यांनी उडी घेतली. विनोबजींच्या राष्ट्र कार्यासाठी जमीन मिळवून देण्यासाठी महत्वाचा वाटा उचलला. देश गुलामगिरीत असताना तेव्हाच्या इंग्रज सरकारने त्यांना चार महिने कारावासही भोगायला लावला.
ग्रामसुधारणा करताना ग्रामातील एकेक घटक सुधारावा म्हणून समाजासाठी ते चंदनासारखे झिजले आपली वाणी, लेखणी आणि भक्तितील शक्ती एकवटून त्यांनी जनतेला सामाजिकतेचे, शिस्तीचे व जबाबदारीचे भान दिले. जागृती घडवून आणली. प्रगतीसाठी परोपरीने प्रयत्न केले. अज्ञान, अंधश्रद्धा आणि भ्रमात जगणाऱ्या लोकांना जागे करण्यासाठी अथक प्रयत्न केले. मरगळ आलेल्या समाजमनात चैतन्य फुलविण्याचे काम केले. शिक्षण, आरोग्य, संस्कार, धनधान्य बाबतीत स्वयंपूर्ण आणि वैभवशाली होण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांनी चमत्कारावर कधीच भर दिला नाही. तर लोक प्रयत्न वादी व्हावेत म्हणून प्रयत्न केले. स्वार्थ आणि परमार्थ यातील फरक समजावून सांगितला. आपले जीवन सुखी करण्यासाठी स्वतःच्या समज बुद्धीचा शहाणपणाने उपयोग करावा. त्यातील मर्म समजून घेऊन आचरणात आणले तर सामान्य माणूस देहत्वाकडून देवत्वाकडे जाईल. मनुष्याचे जीवन अंतर्बाह्य बदलेल.
“गावागावासी जागवा l
भेद भाव हा समूळ मिटवा l
उजळो ग्रामोन्नतीचां दिवा l
तुकड्या म्हणे ll”
मानवाच्या कल्याणाचा समूळ व अंतर्बाह्य विचार करणारे महान संत, हे कर्मयोगी राष्ट्रसंत वं. तुकडोजी महाराज होत.
लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याच्या अभ्यासक, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






