आयुष्य खुप सुंदर आहे..!

SHARE:

आयुष्य कधी ऊन आहे, कधी पाऊस आहे. म्हणजेच आयुष्यात कधी सुख आहे कधी दुःख आहे. आयुष्यात सुख दुःखाचा संगम आहे म्हणून आयुष्य खुप सुंदर आहे.

आयुष्य… जणू सकाळच्या दवात न्हालेले एक हिरव पान आहे. दृष्टिकोनाचे भान आहे. कधी पावसाच्या सरीत चिंब भिजवणार, …आपणच त्याला कसे पाहतो, यावर त्याच सौंदर्य निश्चितच अवलंबून असतं.

पहाटेची कोवळी किरणं जेव्हा खिडकीतून डोकावतात, तेव्हा वाटतं हा दिवस आपल्यासाठीच जन्मलाय. चहा पिणाऱ्याला चहाच्या एका घोटाने देखील खूप आनंद मिळतो. आणि तो जर फुरके मारून पित असेल तर पाहणाऱ्याला देखील खूप आनंद मिळतो. आनंद किती छोट्या छोट्या गोष्टीत लपलाय. सकारात्मक दृष्टीने पहिले की आयुष्य किती किती आनंदाने भरून उरते. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आणि मनसोक्त आयुष्य जगावे.

आयुष्याची गंमतच अशी आहे की, ते कधी सरळ रेषेत कोणाचेच जात नाही. त्याला कुणाचाही लग्गा चालत नाही. काही वर्षाच्या अंतराने आपण आयुष्याकडे पहिले की असे दिसते की अरेच्चा हे तर वळण वळणाच्या नदी सारखे पुढे सरकत आहे. आयुष्य कधी इतके दुःख सहन करायला लावत की, असे वाटते दगडावर डोकं आपटून घ्यावं. कधी इतकी जीवनात भयाण शांतता असते की, असे वाटते की आपलं आयुष्य शांत डोहात विसावलेले तर नाही ना. आयुष्यात कधी कधी इतका आनंद वाटतो की मग माणूस कोणाचेच ऐकत नाही. आनंदाने उड्या मारतो आणि बेभान होतो. पण आयुष्य नदी सारखे वाहणे सोडत नाही.

आयुष्यात दुःख येतं परंतु दुःखाच्या काळया ढगा आड ही आशेचे इंद्रधनुष्य दडलेले असते. फक्त ते बघण्यासाठी नजर हवी. एखाद्या लहान मुलाच निरागस हसू पाहिलं की सगळे ताण क्षणात विरून जातात. आपल्या माणसाचा हात हातात असला की, वाट काटेरी असली तरी ती फुलांची वाटते. आयुष्य सुंदर आहे कारण दररोज एक नवी संधी घेऊन येते. काळाच्या जखमा पुसून टाकण्यासाठी…

पडणे, उठणे, धावणे याचेच नाव जगणे आहे.
झाडाचं पान गळत, पण झाड जगणं सोडत नाही. नव्या पळवीची वाट पाहतो. जूने जाऊन नवीन येणे हा तर सृष्टीचच नियम आहे. तसेच आपलेही एक स्वप्न तुटलं तरी दुसरे स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवणे हेच आयुष्य आहे. समुद्राच्या लाटांकडे पहा कितीतरी मागे जातात तरी पुन्हा किनाऱ्याला भेटायला येतात. आपले मनही तसेच, कितीही निराश झाले तरी एक छोट्याशा आशेवर पुन्हा उभे राहते.

आयुष्य हे पुस्तकासारखेच आहे.
त्याच्या प्रत्येक पानावर वेगवेगळी गोष्ट असते. कधी हसवणारी आणि कधी रडवणारी. आपल्याला माहित आहे की, पहिले आणि शेवटचे पान हे विधात्याचे असते. पण समजायला लागल्यापासून आपली गात्र शिथिल होई पर्यन्त त्या पानावर आपण छान रंग भरून आपल्या जीवनात उत्तम रंग भरू शकतो. जर सगळी पाने सारख्याच कथांनी भरली असती तर वाचण्यात काय मजा आली असती. म्हणूनच आयुष्याने दिलेल्या वेदनांनाही नमस्कार करावा. कारण आयुष्याचा खरा अर्थ त्यामुळेच आपल्याला कळला आहे. त्यामुळेच आपण घडलो आहोत.

संध्याकाळचा दिवा स्वतः जळून घराला प्रकाश देतो.
संध्याकाळच्या दिव्यासारखे आयुष्य स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देण्यातही एक सौंदर्य आहे. निसर्ग कधीच तक्रार करत नाही. तो फक्त फुलत राहतो. आपणही फुलायचे, जमलं तर दुसऱ्यासाठी. नाहीच जमलं तर स्वतःसाठी.. पण फुलणे सोडता कामा नये.

आयुष्य सुंदर आहे. पण ते अपूर्ण आहे आणि त्या अपूर्णतेत पूर्णत्व शोधण्याची ओढ असावी. एक सुप्रसिद्ध गाणे आहे.
“गोडी अपूर्णतेची लावेल वेड जिवा…”
आपल्याजवळ जर काही असेल तर त्यातील काही दुसऱ्याला देता आले पाहिजे.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे l 
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ll
ही उदात्त भावना आपल्यात यावी. जेव्हा आपण दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसतो तेव्हाच आपल्या जीवनाला आणि जगण्याला अर्थ येत असतो.

प्रेम, माया, आपुलकी हीच तर आयुष्याची खरी श्रीमंती आहे.
पैशाने घर विकत घेता येईल पण घरासाठी लागणारे हसू आणि आनंद, शांती विकत घेता येत नाही. म्हणून सांगते की, जोवर श्वास चालू आहे, तोवर आयुष्यातील प्रत्येक क्षण साजरा करा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे ते सुंदर नजरेने टिपता आले पाहिजे.

 

ग्रामगीताचार्य – 
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा