वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – जीवन शिक्षणाची बोधशाळा (भाग-५)

SHARE:

वंदनीय तुकडोजी महाराजांची गुरुपरंपरा

श्रीसंत आडकोजी महाराज –
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या गुरुबद्दल लिहिले
“जातीचे असून कासार l 
वश तो केला हरिहर ll 
गेले सायुज्ज पार ll”
पुढे ते म्हणतात.
“कुल कासार असारन से l 
तुम सारथ को पाये l 
प्रगटभये वरखेडाजग तारनेकोआये l”  
संत आडकोजीच्या जन्मावेळी
पायात ध्वज, पदमांकुष, चक्रधारी l 
कर कमल चिन्ह ते धर्मगदा अवधारी ll  
नासिका सरळ नि दृष्टी भरी l 
जैसा की प्रगटला हिरा रत्न अंधारी ll 
प्रत्यक्ष परमेश्वर अवताराच्या अशा खुणा आडकोजीच्या जन्म वेळी दिसत होत्या. अडकोजी बालपणी खूप द्वाड आणि हुड प्रवृत्तीचे होते. त्यांनी लहानपणी त्यांच्या गुरू माऊलीची देखील टिंगल केली. योग्य वेळ येताच माय बाईने एका दृष्टी पातात अडकोजीला ब्रह्म दाखवून दिले.

अडकोजी वर या गोष्टीचा भयंकर असा परिणाम झाला की,  त्यांचे सारे जीवनच बदलून गेले.
“सोडिले मानधन, श्रीमंती वर पाणी l 
मारुनी वैभवा उजडल्या खाणी ll”
तेंव्हा पासून
“त्याने सोडीले घरदार l जोडीला ईश्वर l” 
यामुळे अडकोजीचे पूर्ण जीवन अंतर्बाह्य बदलले. दुसऱ्या ना चीडवण्यात, दुसऱ्यांची चेष्टा करण्यातप्रसिद्ध असणारे अडकोजी आता दुसऱ्यांच्या चेष्टेचा विषय बनले. जोतो त्यांना खिजवू लागले. कारण त्यांचे भान रहस्य नसे. कुठेतरी चिंतनात ते मग्न राहु लागले. खूळ लागले म्हणून लोक त्यांना हिंणवू लागले. साधू साधू म्हणून चिडवू लागले. त्यांच्यातील साधुत्वाच्या परीक्षेची ही भयंकर कसोटी होती. अडकोजिंच्या हातून काही चमत्कार झाले. चमत्काराशिवय लोक नमस्कार करत नाहीत. या चमत्कारामुळे त्यांचे साधूत्व लोकांच्या नजरेतून सुटले नाही.

आर्वी येथील रामा गवळ्याच्या साप चावून मेलेल्या म्हशीला त्यांनी जिवंत केले. दहेगाव रेल्वेचा मुस्तफा हा माल गुजर होता, अडकोजिंसाठी त्याचे गाव अपरिचित होते. पण बरोबर त्याच्या गावी असलेल्या त्याच्या घरी त्याला अडकोजीनी पोचवून दिले. मुस्तफाला शिकारीची आवड होती. पण शिकार करताना नेमकी त्याची गोळी चुकली आणि तो दोन वाघांच्या तावडीत सापडला. जीवन मरणाच्या अवघड स्थितीत त्याने अडकोजिंचा कळवळून धावा केला. आश्चर्य घडले आणि दोन्ही वाघ शांततेत निघून गेले. त्यामुळे मुस्तफा अडकुजीला शरण आले. मुस्तफाचा भाऊ डूल्लुमियाने एकदिवस अडकुजिना जेवावयास बोलावले. त्याने अडकोजिना कपटाने वाढलेले गोमासाचे ताट कापडाने झाकून ठेवले. तेव्हा आडकोजी म्हणाले, “गुलाबाचे फुल कुठे खात असतात का?” असे म्हणताच ताटावरील कापड काढताच ताटातील गोमासाची गुलाबाची फुले झाली. डूल्लुच्या या वागण्याने मुस्तफाला वाईट वाटले. त्याच्या बायकोने ही अडकोजिंची मनापासून सेवा केली. अडकोजिनी तिला आशीर्वाद दिला. आज ही तिची मजार भक्तांना पावते असे म्हणतात.

वंदनीय राष्ट्रसंतांनी सेवासामर्थ्य विषयी ग्रामगिते त म्हटले आहे.
“सेवेने अंगी सामर्थ्य येते l 
जे जे बोलिले तेची घडते l 
हस्ते परहस्ते सर्वची होते l 
काम त्यांचे होते, याची प्रचिती येते ll”
आडकोजिनी कोंडीबा रोहणकरांचे तमाशाला जाणे बंद केले. कोंडीबाला ते राम दर्शनासाठी रामटेक येथे घेऊन गेले. त्यावेळी प्रत्यक्ष राम आपल्याकडे बघून हसत आहे, असा कोंडीबाला दृष्टांत झाला. कोंडीबा सोबत अडकोजि चालत नसून प्रत्यक्ष राम चालत असल्याचा अनुभव कोंडीबा घेत होते. गावातील काही मुले उनाडक्या करत असत. दिवसभर गावभर हुंदडत असत. अशा सर्व बंडखोर मुलांना त्यांनी शांत करून शिस्त लावली.

दुधाचा व्यवसाय करणाऱ्या भागा बाईच्या सर्प दौंशने मृत झालेल्या मुलाच्या देहात अडकोजीनी प्राण आणले. बायजा बाईंच्या घराला लागलेली आग अडकोजिणी लोटितल्या तिर्थाने विझविली. असे अनंत समाजोपयोगी चमत्कार अडकोजिने केले. आरविच्या बाजारात कोंडीबा सोबत गेले असता. पंचमहा भुतांवर नियंत्रण असणारे अडाकोजी बाजारातून एकाएकी अदृश्य झाले आणि वरखेड येथे प्रगट झाले. ते शेवट पर्यंत वरखेड येथेच राहिले. यावेळी त्यांचे वय ६४ वर्षांचे होते.

याच आडकोजिंच्या कृपा प्रसादाने संत तुकडोजीचा जन्म झाला. प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज यांनी माणिक नाव ठेवले असतानाही आडकोजि त्यांना तुकड्या म्हणत असत म्हणून तेच नाव त्यांनी मोठ्या अभिमानाने जीवनभर लावले व पूर्ण साहित्यात तुकड्या म्हणे या नावाने ते अजरामर आहेत. संत पदाला पोचल्यावर सर्व त्यांना आदराने तुकडोजी म्हणू लागले. याबद्दल वं. तुकडोजी म्हणतात,
“माझे नाव माणिक सांगती l 
परी माझी गती तैसी नाही l 
तुकड्या नावाने लोकी खेळलो l 
उजेडी आलो तुकडे खाता ll 
सदगुरूने मज तुकड्या संबोधिले l 
ते ची मिरविले नाव लोकी ll

संत आडकोजिनी वं. राष्ट्रसंतांना कवित्व करण्याची आज्ञा केली. राष्ट्रसंतांनी 
“घे करुणा, घे करुणा, रुक्मिणी रमणा l” 
हे पद तात्काळ तयार करून आपल्या गुरुसमोर गाऊन सादर केले. आणि गुरूच्या आशीर्वादाने त्यांची सहित्यसरिता अविरत वाहू लागली. त्यांच्या सद्गुरूचे आणि त्यांचे हृदयस्थ बंध आणि अंतस्थ नाते होते. संत आडकोजिंच्या महा निर्वाण प्रसंगी असे सांगतात की शेकडो पोती मीठ टाकून अडकोजीचे शरीर झाकले जात नव्हते. त्यावेळी तुकडोजीनी मूठभर मीठ वाहिले आणि शरीर झाकले गेले.

बालवयात म्हणजे अगदी अजांणत्या वयात तुकडोजी यांनी आपल्या गुरूकडून दीक्षा घेतली. त्यावेळी सद्गुरू म्हणाले, “फिकीर करु नकोस, हाक मारशील तिथे मी उभा असेल.” याचा प्रत्यय तुकडोजीना जीवनभर आला.

अशी ही गुरू शिष्यांची अजोड जोडी आहे.
(आधार – ग्रामगीता, श्री गुरुदेव पुष्पांजली)

 

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याच्या अभ्यासक, अमरावती. 

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा