राष्ट्रपिता, महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्य राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित व संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. शोभा माधव गायकवाड यांची कविता वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.
बापूं माझ्याशी बोलले…
ये बेटी शोभा, घाबरू नकोस, देशाचे भविष्य उज्ज्वल आहे,
अंधार कितीही असला तरी सत्याचाच विजय आहे l।१।l
मी पाहिले स्वप्न खादीचे, स्वावलंबी भारताचे,
तेच स्वप्न आज साकारते, तंत्रज्ञानाच्या कवेतचे l।२।l
तरुणाईकडे बघ, त्यांच्यात ऊर्जा अपार आहे,
योग्य दिशा मिळाली तर ते करतील चमत्कार आहे l।३।l
बेरोजगारी, महागाई ही वादळे क्षणिक आहेत,
श्रम आणि कौशल्याने त्यावर मात नक्की आहे l।४।l
गाव वाचवा, गाव घडवा हाच माझा मंत्र होता,
गाव समृद्ध झाला तर देश समृद्ध होतो l।५।l
धर्म-जात यात अडकू नकोस, माणूस हाच धर्म मान,
प्रेमाने जिंका सारे जग, द्वेषाला नाही स्थान l।६।l
स्वच्छता, शिक्षण, आरोग्य यावर लक्ष द्या,
देश आपोआप घडेल, फक्त सेवाभाव ठेवा l।७।l
स्त्री हीच देशाची शक्ती, तिला पुढे येऊ द्या,
तिच्या हातात सत्ता द्या, घर-देश घडू द्या l।८।l
सत्याच्या मार्गात अडथळे येतील, डगमगू नकोस,
अहिंसेचे बळ मोठे आहे, कधीच थांबू नकोस l।९।l
जा बेटी, तुझ्या लेखणीतून जागृती कर,
माझा भारत, सुंदर भारत घडवण्यासाठी काम कर l।१०।l
लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






