तुका म्हणे, शोभा सांगे…
सर्वव्यापक ईश्वराविषयीची प्रेमभावना म्हणजे भक्ती होय. हा स्वतःचा स्वानुभव व्यक्त करताना संत तुकाराम म्हणतात..
“मनी असे काही l तेथे देवतेची पाही ll
पाहा जनाई सुंदरी l तेथे देव पाणी भरी ll
शुद्ध पाहोनिया भाव l त्याचे हृदयी वसे देव ll
तुका म्हणे विठोबासी l ठाव देई चरणापाशी ll”
संत तुकारामांना मोक्षा पेक्षा भक्तीचीच आवड जास्त आहे. असे एकूणच त्यांच्या भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या अभंगातून दिसून येते. पिटू भक्तीचा डांगोरा असे सांगून त्यांनी ईश्वर भक्तीचा डांगोरा पिटण्यास सुरुवात केली. देवाच्यानमृपाच्या ठिकाणीच त्यांचे चित्त गढून गेले आहे. तुकाराम स्वतःला देवाचा अंकित दास म्हणून घेतात. त्यांनी विठ्ठलालाच सर्वात्मक ईश्वराचे प्रतीक मानले.
ईश्वर चराचरातील प्राणिमात्रांच्या हृदयात वास करतो. म्हणूनच विश्वातील सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे. भक्ती ही जिव्हाळ्याचीच प्रेमभावना असली पाहिजे. भूतमात्राविषयी दया दाखविणे हा ईश्वराचा स्थायीभाव आहे. मग माणसाने सर्वांशी का प्रेमाने वागू नये.? सर्वांशी प्रेमाने वागावे हा फार मोठा संदेश संत तुकाराम देतात. त्यांच्या अनेक अभंगातून उच्च नीच भेद हा वाईट आहे असे अत्यंत प्रकर्षाने ते सांगतात. सर्वांशी प्रेमाने आदराने वागणे हीच परमेश्वराची खरी भक्ती आहे.आणि असे वागणाऱ्या खऱ्या भक्ताचा देव सांभाळ करतो असेही ते सांगतात.
“देव दयाळ दयाळ l करी तुक्याचा सांभाळ ll
तुकारामांनी आपल्या आयुष्यात खऱ्या भक्तीला प्राधान्य दिले. सर्वात्मक ईश्वराच्या भक्तीचे जिव्हाळ्याचे मर्म जो जाणतो. त्याला ते “देवाचा पुतळा” मानतात. परमेश्वराच्या भक्तियुक्त प्रेमरंगात अंतर्बाह्य न्हाऊन निघण्यासाठी भक्ताचा सहवास त्यांना महत्वाचा वाटतो. भक्तांचा सहवास आणि भक्ती दोन्हीचे मोल जाणणारे तुकाराम “भक्तीपंथ बहु सोपा” असे म्हणतात आणि “भक्ती ही कठीण सुळावरील पोळी असेही म्हणतात” यातूनच त्यांनी श्रेष्ठ साधनांना सावधगिरीचा इशारा देखील दिलेला आहे. सर्व प्राणीमात्रांना समान लेखून, सर्व प्रकारचे भेद त्याज्य करून भावासहीत भक्ती करावी, यातच मनुष्य जन्माचे कल्याण आहे. हेच मनुष्य कल्याणाचे वर्म आहे. म्हणजेच मनुष्य जातीचे कल्याण चांगल्या वागणुकीत आहे हे सांगणारे संत तुकाराम फार मोठे मानस शास्त्रज्ञ, द्रष्टेविचारवंत होते.
संत तुकारामांनी भक्तीसाठी नामस्मरण महत्वाचे मानले. त्यांच्या गुरूंनी सांगितलेला सोपा मंत्र “रामकृष्णहरी” चा जप त्यांच्या भक्तीचे साधन आणि साध्यही ठरला. संत तुकारामांच्या भक्तीचे अंतरंग त्यांचे आराध्य – विठोबाचे नामस्मरण. नामस्मरणाने तुकारामांचे चित्त चैतन्यमय झाले. आपल्या ठिकाणीच बसून त्यांनी पांडुरंगाला आवडीने आठविले. तसेच आवडीने आळविले. अखंड हरिनाम तसेच अखंड हरिनाम चिंतनाच्या, त्यांना ध्यास लागला. अखंड नामस्मरणाने ते धन्य झाले. हा स्वानुभव त्यांनी सांगितला. भक्ती मार्गात संत सहवासाला आणि गुरुप्रसादाला त्यांनी महत्व दिल्याने दोघांचे महत्त्व निकडीने सांगितले आहे. त्यांना संत समागम गुरु प्रसादामुळेच लाभला आणि भक्तीचा कळस ही गुरु कृपेमुळेच गाठता आला.
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






