वैकुंठीचा राणा आणि वारकरी

SHARE:

जय हरी विठ्ठल…!

महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे. म्हणूनच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या साध्या विधानाला वचनाचा दर्जा प्राप्त व्हावा इतकी यथार्थता या वाक्यात दडलेली आहे. ही परंपरा टिकविण्याचे श्रेय महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला जाते. 12 वे शतक ते 17 वे शतक या कालावधीतील वारकरी संप्रदायातील मुख्य आचार्य म्हणून ज्ञानेश्वरांना मानले जाते.
संतकृपा झाली l इमारत फळा आली ll
ज्ञानदेवे रचिला पाया l उभारिले देवालया ll
नामा त्याचा किंकर l तेणे रचिले ते आवार ll
जनार्दन एकनाथ l खांब दिधला  भागवत ll
तुका झालासे कळस l भजन करा सावकाश ll
बहिणी म्हणे फडकती ध्वजा l निरुपण केले वोजा ll

संत बहिणा बाईने आपल्या अभंगातून प्रत्येक संताने वारकरी पंथाची पताका उंचावण्यासाठी केलेले काम अगदी मोजक्या शब्दात यथोचित वर्णिलेले आहे. ज्ञानेश्वरांपूर्वी देखील वारीची प्रथा आणि वारकरी संप्रदाय होताच. बहिणाबाईच्या वक्तव्याने या कार्याला उजाळा मिळाला. तसेच या संतांनी पूर्वीच्या कार्याला प्रेरणा दिली, तेज दिले, दिशा दिल्या, त्यात चैतन्य ओतले.

संत बहिणाबाईंनी सांगितलेल्या संत मालिकेतील लोकप्रिय संत म्हणजे संत तुकाराम हेच आहेत. महाराष्ट्रातील संत मंडळीतील संत मंडळीच्या शिरपेचातीलील मुगुटमणी म्हणजे संत तुकाराम आहेत. प्रत्येक संताचे काम अलौकिकच आहे.. वेदांत सामन्यांच्या भाषेत आणणारा, सामन्यांचा असामान्य असा बुलंद आवाज म्हणजे संत तुकाराम आहेत. आपल्या रसाळ अशा अभंग रचनेने आणि व्यवहारसुलभ दृष्टांतानी संत तुकाराम मराठी भाषेच्या गळ्यातील अलंकार जणू शोभून दिसतात. म्हणून वारकर्यांच्या वारीमध्ये वारकरी “ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत पुढे पुढे चालतात.

पंढरपुरच्या आषाढी आणि कार्तिकी वारीला भक्तीचे, एकीचे, समतेचे, एकात्मतेचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. वारी केवळ भक्तीचेच नाही, धार्मिक विधी नाही तर भक्ती, स्वयंशिस्त, सेवा, समता यांची जीवनशाळा आहे. शिस्तबद्ध जीवन शैली आहे. वारीचे आश्चर्य जगभरातील लोकांना वाटते. आषाढी एकादशीच्या महिनाभर आधी पासून लाखोंच्या संख्येने लोक मोजके कपडे आणि मोजक्या जीवनावश्यक वस्तू घेऊन वारीसाठी घरून निघतात. दिवसभर चालून ते थकत नाहीत. कुठेही गोंधळ होत नाही. वस्तुंची चोरी होत नाही. आपोआप स्वयंशिस्त पाळली जाते.

वारीची वैशिष्ट्ये –
वारीत हौशे, गवशे, नवशे असतात. पण वारीत गडबड, गोंधळ दिसतच नाही. दारू पिणारे, आरडाओरडा करणारे, घाणेरडे बोलणारे लोक सुद्धा आपले आपणच सुधारून जातात. वारीमध्ये अनेक गावांच्या शेकडो दिंड्या असतात. आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांची, देहू वरून तुकाराम महाराजांची, शेगाव वरून गजानन महाराजांची, तुकडोजी, अडकोजी, अशा शेकडो दिंड्यासोबत हजारो वारकरी अत्यंत शिस्तीने टाळ आणि मृदुंगाच्या गजरात, माउली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, आणि राम कृष्ण हरीचा जयघोष करीत असतात. ही महाराष्ट्राची सांस्कृतिक संपन्नता व परंपरा आहे.

वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लहान मोठे ओळखी अनोळखीचे सारेच एकमेकांच्या पाया पडतात आणि एकमेकांना माऊली म्हणून साद घालतात. वारीत छोटा-मोठा, उच्च-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत असा स्तर-भेद, जाती-भेद, वर्ण-भेद नसतो. असतो फक्त प्रेमभाव व आदर भाव. याद्वारे वारी समतेचा संदेश देत असते. भजन, कीर्तन आणि अभंगाच्या गजरात संपूर्ण वारीचा मार्ग भक्तीमय होऊन जातो.

वारीमध्ये रिंगण असते. पण साधे कोणाला खर्चटत देखील नाही. वारीमध्ये वारकरी पावली खेळत, भजन कीर्तन करीत, फुगड्या घालीत, नामस्मरण करीत मजल दरमजल पुढे पुढे सरकत असतात. वाटेत लागणाऱ्या गावातील लोक चहा पाणी, नाश्ता, जेवणाची, त्यांच्या विश्रांतीची सोय करतात वारकऱ्यांच्या पायाला तेल लावणे, पाय दाबून देणे अशी सेवाही करतात.

वारीला नियंत्रण करण्यासाठी पोलिस नसतात. वारीत अथांग जनसागर उसळलेला असताना देखील चोरी मारी, पळवापळवी, बायकांशी लज्जास्पद वर्तन कोणी करत नाही. इथे पोलीसांची, कडक कायद्यांची गरजच पडत नाही. पौलिसांच्या ऐवजी ते काम चोपदार करतात. चोपदारांजवळ मानाचा चांदीचा दांडा असतो. तो वर केला की लोकांना शांत रहायचं आहे हे समजून जाते आणि लोक क्षणात शांत होतात. अशी ही वारी लहानथोर सर्वांनाच आकर्षित करत असते. आयुष्यात ५० वेळ पायी वारी केलेले महाभाग आहेत. परिस्थिती नसतानाही, घरी अनेक कामे असतानाही महिन्याहून अधिक काळ पायीवारीसाठी खर्च करणारे नियमित वारीला जाणारे लोक आहेत.

हल्लीच्या काळी दळणवळणाच्या सर्व सोयी उपलब्ध असताना आनंदाने पायी वारी करण्यासाठी लोक उत्सुक असतात. पायी वारी करताना प्रत्येक व्यक्तीत पांडुरंग निवास करत असतो. अशी लोकांची धारणा आहे. वारीमध्ये पांडुरंगाच्या नामरूपाच्या ठिकाणी सर्वांचे चित्त गढून गेलेले असते.

पंढरपूरला पोचल्यावर लोक अक्षरश: गहीवरून जातात. जणू आयुष्य सफल झाले. आयुष्य जगण्याला अर्थ प्राप्त झाला. त्यातून कळस म्हणजे इतक्या प्रयासाने पंढरपूरला पोचल्यावर मंदिरात गर्दी असली तर कळसाला नमस्कार करून तिथूनच पांडुरंग माऊलिशी हितगुज करतात. आपले सुख दुःख सांगतात आणि परततात.

असा हा भक्तांची काळजी वाहणारा लेकुरवाळा देव आणि वारीतील त्याची भाबडी लेकरे आहेत तोपर्यंत अखंड वारी नियमित वारी होतच राहणार.

जय जय रामकृष्ण हरि…!

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याच्या अभ्यासक, अमरावती.

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा