जो देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघतोय त्या देशाची ही नवीन कथा आहे; पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनातून तेजस्वी बारब्दे पाटील यांची सरकारवर सडकून टीका..

SHARE:

पुणे : “जो देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघतोय, त्या देशाची ही नवी कथा आहे… जिथे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना पुस्तके हातात धरण्याऐवजी रस्त्यावर उतरून न्यायाची भिक मागावी लागत आहे.”

 

पुण्यातील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या तीव्र आंदोलनादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) च्या नेत्या तेजस्वी बारब्दे पाटील यांनी राज्य सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. सरकारच्या भोंगळ कारभारावर आणि रखडलेल्या भरती प्रक्रियेवर ताशेरे ओढताना त्यांनी व्यवस्था आणि धोरकर्त्यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

 

 

तरुणांच्या अश्रूंची आणि कष्टांची होळी

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून हजारो एमपीएससी विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षांमधील गोंधळ, रखडलेल्या निकाल प्रक्रिया, जागांची अनिश्चितता आणि मुलांच्या हातातील नैराश्य या मुद्द्यांवर बोलताना तेजस्वी बारब्दे पाटील यांनी शासनाच्या कारभाराचा पंचनामा केला.

त्या म्हणाल्या, “एक तरुण वयाची सोळा-सतरा वर्षे जिद्दीने अभ्यास करतो. आपल्या आई-वडिलांच्या घामाचा प्रत्येक थेंब आणि शेतातील मातीचा कण मोलाचा मानून पुण्याच्या किंवा इतर शहरांच्या वस्तीगृहात, खोलीत राहून दिवस-रात्र एक करतो. पण जेव्हा परीक्षा जाहीर होतात, तेव्हा कधी पेपरफुटीचे ग्रहण लागते, कधी निकाल रखडतात, तर कधी नियुक्त्या लांबणीवर पडतात. हे कुठवर चालणार?”

महासत्तेच्या दाव्यांवर थेट भाष्य

देशाला आणि महाराष्ट्राला ‘महासत्ता’ बनवण्याच्या घोषणा देणाऱ्या राजकीय नेत्यांना सज्जड सवाल करताना तेजस्वी बारब्दे पाटील यांनी विचारले की, “देशाला महासत्ता बनवण्याची स्वप्ने पाहत असताना, तुमच्याच राज्यातील होतकरू आणि प्रामाणिक तरुणांना हक्काच्या नोकरीसाठी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर हुडहुरीत किंवा उन्हात बसावे लागत असेल, तर ही कसली महासत्ता?”

“युवकांच्या हाताला काम नाही, डोक्यात नैराश्य आणि भविष्यात अंधार, अशा स्थितीत उभी राहिलेली ही नवी भारताची कथा अत्यंत वेदनादायी आहे,” असे सांगत त्यांनी सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.

आंदोलनाला वाढता पाठिंबा आणि राजकीय वातावरण

पुण्यातील या विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय व सामाजिक स्तरावरून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अनेक विरोधकांनी आणि सामाजिक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या या लढ्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत यावर काय निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. तेजस्वी बारब्दे पाटील यांच्या या सडकून टीकेमुळे प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराविरोधातील असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, विद्यार्थ्यांनी जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.

यावेळी आंदोलन स्थळी युवकांचे प्रेरणास्थान आ. रोहित पवार, आ. विश्वजित कदम, युवा नेत्या तेजस्वी बारब्दे पाटील, शिवराज मोरे, चैतन्य जायभाये, अविनाश महल्ले, ॲड. रुपाली ठोंबरे, प्रियाताई फुके व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा