मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांच्या दि. ७ ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या १६० व्या जयंतीनिमित्त साहित्यिक व कवी प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांनी लिहिलेला लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
मराठी कवितेला जुन्या
चौकटीतून बाहेर काढणारे,
नव्या युगाचे, नव्या विचारांचे
सूर छेडणारे ‘केशवसुत’ ठरले,
आधुनिक मराठी काव्याचे जनक
मराठी साहित्य विश्वातील
एक लखलखते माणिक…
मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी, आधुनिक मराठी काव्याचे जनक, अग्नी संप्रदायाचे कवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांच्या दि. ७ ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या १६० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
कवीवर्य कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म दि. ७ ऑक्टोबर १८६६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या ग्रामात झाला. मराठी साहित्यात ते ‘केशवसुत’ या टोपणनावाने अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर आणि पुणे अशा विविध ठिकाणी झाले. त्यांनी पुण्याच्या प्रसिद्ध न्यू इंग्लिश स्कूलमधून १८८९ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ शाळांमध्ये अध्यापनाचे काम केले. सन -१९०१ मध्ये ते फैजपूर येथे मुख्याध्यापक आणि पुढे धारवाड महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
केशवसुतांना ‘आधुनिक मराठी काव्याचे जनक’ किंवा प्रणेते म्हणून मराठी साहित्य विश्वात आदराने ओळखले जाते. केशवसुतांनी मराठी कवितेला जुन्या चौकटीतून बाहेर काढून तिला आधुनिक रूप दिले. ‘काव्यरत्नावली’ या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून त्यांनी ‘केशवसुत’ हे टोपणनाव स्वीकारले. याच टोपण नावाने ते मराठी साहित्यात आजरामर झाले.
केशवसुतांनी एकूण १३५ कविता लिहिल्या. त्या संख्येने कमी असल्या तरी त्यांच्या कवितांनी मराठी साहित्यात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. त्यांनी मराठी काव्यात पहिल्यांदाच वैयक्तिक भावभावना आणि आत्मनिष्ठतेला स्थान दिले.
केशवसुतांच्या कवितांचे वर्गीकरण प्रामुख्याने सामाजिक बंडखोरी, निसर्गप्रेम आणि गूढ अनुभूती यांमध्ये केले जाते. त्यांची ‘तुतारी’ ही सामाजिक बंडखोरी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी क्रांतिकारी कविता, ‘नवा शिपाई’ ही समता आणि नव्या दमाचा मानवतावाद मांडणारी कविता, ‘गोफण केली छान’ ही अन्यायाविरुद्ध प्रहार करणारी सामाजिक कविता, ‘भृंग’ ही निसर्गाचे सुंदर वर्णन करणारी निसर्गकविता, ‘पुष्पाप्रत’ ही निसर्ग आणि भावनांचे सुंदर प्रकटीकरण करणारी कविता, ‘फुलपाखरू’ ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडलेली प्रसिद्ध निसर्गकविता अशा विविध विषयावरील कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत.
कवी केशवसुत यांच्या ‘गोफण केली छान!’ या अत्यंत लोकप्रिय आणि अन्यायाविरुद्ध प्रहार करणाऱ्या सामाजिक कवितेत कवी केशवसुत म्हणतात की,
स्वह्रदय फाडुनि निज नखरीं चिवट तयाचे दोर काढुनि,
गोफण वळितों ही सत्त्वाचा मी चोर !
त्वेषाचा त्या दोराला घट्ट भरुनियां पीळ,
गांठी मारितों वैराची जी न पीळ दवडील !
वैर तयांला, बसती जे स्मितचि आलस्यांत
वैर तयांला, पोकळ जे बडबडती तोर्यांत !
वैर तयांला, वैरी जे त्यांच्या पायधुळींत
लोळुनि कृतार्थ होती जे प्राप्त तूपपोळींत !
ही कविता समाजातील निष्क्रियता, आळस आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी एक क्रांतिकारी रचना आहे. कवीने स्वतःच्या अंतःकरणातील संताप आणि चीड यांपासून एक चिवट ‘गोफण’ तयार केली असून, त्याद्वारे समाजातील ढोंगी व आळशी प्रवृत्तींवर प्रहार केला आहे. केशवसुतांच्या कवितांमधून निसर्गप्रेम, सामाजिक बंडखोरी आणि मानवी हक्कांची जाणीव प्रकर्षाने जाणवते. तत्कालीन समाजातील जातीभेद, विषमता आणि अंधश्रद्धा यांवर त्यांनी आपल्या लेखणीतून कडक प्रहार केले.
‘तुतारी’ ही त्यांची अत्यंत गाजलेली कविता असून, ती सामाजिक परिवर्तनाचे रणशिंग फुकणारी ठरली. त्यांच्या या कवितेतील ओळी आजही अंगावर रोमांच उभे करतात. ‘नवा शिपाई’ या कवितेतून त्यांनी जुन्या रूढी-परंपरा नाकारत नव्या युगाच्या माणसाचा बाणा मांडला.
“ब्राह्मण नाही, हिंदुही नाही
नच मी एक पंथाचा”
हा त्यांचा विचार त्यांच्या पुरोगामी दृष्टिकोनाची साक्ष देतो. ‘आम्ही कोण?’ या कवितेतून त्यांनी कवीचे समाजातील स्थान आणि कवीची ताकद काय असते हे ठामपणे सांगितले. त्यांची ‘झपुर्झा’ ही कविता मराठीतील गूढगुंजन करणारी एक श्रेष्ठ कलाकृती मानली जाते. ‘झपुर्झा’ या कवितेच्या पालुपदात अर्थात ध्रुवपदात कवी केशवसुत म्हणतात की,
प्रकाश गेला, तिमिर हरपला:
काय म्हणावें या स्थितिला ?
झपूर्झा ! गडे झपूर्झा !
हर्षखेद ते मावळते,
हास्य निमाले,अश्रु पळाले;
कण्टकशल्यें लव वठली;
कांहीं न दिसे दृष्टीला.
या ओळींमध्ये कवीने मनाच्या एका अत्यंत उच्च आणि विलक्षण अवस्थेचे (उन्मनी अवस्था) वर्णन केले आहे. जेव्हा माणसाला सुख-दुःख, हसणे-रडणे या पलीकडचा निवांतपणा लाभतो, तेव्हा भौतिक जगातील गोष्टींचा भास नाहीसा होतो. अशा संमिश्र आणि अतींद्रिय स्थितीला कवीने ‘झपूर्झा’ असे म्हटले आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या काव्यानंतर मराठी कवितेला वैचारिक व बंडखोर दिशा केशवसुतांनीच दिली. कवी नारायण नरसिंह फडणीस यांच्या ‘काव्यरत्नावली’ या मासिकातून त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या. दुर्दैवाने या महान कवीला त्यांच्या हयातीत योग्य ती प्रसिद्धी आणि आर्थिक स्थैर्य लाभू शकले नाही.अवघ्या ३९ वर्षांचे अल्पायुष्य लाभलेल्या या युगप्रवर्तक कवीचा मृत्यू दि. ७ नोव्हेंबर १९०५ रोजी हुबळी (कर्नाटक) येथे प्लेगच्या आजाराने झाला. त्यांच्या मृत्यूनंतर १९२१ मध्ये डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीने त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या जन्मगावी म्हणजे मालगुंड येथे दि. ८ मे १९९४ रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते एका भव्य ‘केशवसुत स्मारकाचे’ उद्घाटन करण्यात आले.
केशवसुतांनी इंग्रजी साहित्यातील १४ ओळींचा ‘सॉनेट’ (Sonnet) हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने मराठीत आणला आणि तो लोकप्रिय केला. काव्याच्या स्फुट आविष्कारासाठी त्यांनी जुन्या गणवृत्तांऐवजी मात्रावृत्तांचा अधिक वापर केला आणि काही नवीन मात्रावृत्ते प्रचलित केली. केशवसुतांनी लावलेले आधुनिक कवितेचे हे रोपटे आज मराठी साहित्यात एका विशाल वटवृक्षाच्या रूपाने उभे आहे.
मराठी साहित्यात कवी केशवसुत यांना ‘अग्निसंप्रदायाचे कवी’ म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी रूढी आणि परंपरांवर कवितेतून प्रहार केले. केशवसुतांच्या काळापूर्वी मराठी साहित्यात प्रामुख्याने संतकाव्य आणि पंतकाव्य (पंडिती काव्य) लिहिण्याची परंपरा होती. समाजात अनेक जुनाट, जाचक रूढी-परंपरा आणि विषमता पसरलेली होती. केशवसुतांनी आपल्या कवितांमधून या जुन्या रूढींवर अग्नीसारखा तीव्र प्रहार केला. जुने नष्ट करून नवे निर्माण करण्याची आग त्यांच्या शब्दात होती. त्यांच्या काव्यात क्रांती, गुलामगिरीविरुद्ध प्रचंड चीड आणि विद्रोहाची भावना होती. ज्याप्रमाणे अग्नी सर्व काही जाळून भस्म करतो आणि शुद्ध करतो, त्याप्रमाणे समाजातील विषमता आणि अन्याय जाळून टाकण्याची शक्ती त्यांच्या काव्यात होती. त्यांच्या ‘तुतारी’ या प्रसिद्ध कवितेत ते म्हणतात की,
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऐका पुढल्या हाका..
या कवितेच्या माध्यमातून कवीने समाजातील जुनाट, सडलेल्या रूढी-परंपरा आणि अंधश्रद्धा त्यागण्याचे आवाहन केले आहे. समाजाला जागृत करून, अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन नव्या पुरोगामी विचारांचा स्वीकार करावा हा या कवितेचा मुख्य गाभा आहे.
‘नवा शिपाई’ सारख्या कवितांमधून त्यांनी सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि क्रांतीचा नवा संदेश दिला. हा संदेश अत्यंत ओजस्वी आणि तरुणांच्या मनात ऊर्जा निर्माण करणारा अग्नी पेटवणारा होता. त्यांच्या काव्यातील हाच क्रांतिकारी, तेजस्वी आणि ज्वलंत बाणा लक्षात घेऊन अभ्यासकांनी व समीक्षकांनी त्यांच्या विचारसरणीला आणि काव्याला ‘अग्निसंप्रदाय’ असे संबोधले आहे. समाजातील अन्यायाची राख करून नव्या युगाची पहाट आणणारे ज्वलंत आणि क्रांतिकारी विचार मांडल्यामुळे त्यांना अग्निसंप्रदायाचे कवी म्हटले जाते. केशवसुतांच्या क्रांतिकारी ‘तुतारी’ कवितेचा सन्मान म्हणून भारतीय रेल्वेद्वारे मुंबई (दादर) ते सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी एक्सप्रेस’ ही ट्रेन चालवली जाते. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९६७ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मूळ हस्तलिखितांची आवृत्ती प्रकाशित केली होती. त्यांच्या जन्मगावी, मालगुंड (रत्नागिरी) येथे ‘कवी केशवसूत स्मारक’ उभारण्यात आले आहे, जे आजही मराठी साहित्यप्रेमींसाठी एक मोठे प्रेरणास्थान आहे. असे महान अग्नि संप्रदायाचे कवी केशवसुत दि. ७ नोव्हेंबर १९०५, रोजी अनंतात विलिन झाले.
दि. ७ ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या त्यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
केशवसुतांना ।
करितो नमन ॥
करांनी वंदन ।
कोटी कोटी ॥
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय
साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व कवी, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






