नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येवर, नागपूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ४७ वे राष्ट्रीय अधिवेशन आणि भीमसैनिकांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. येत्या सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता दीक्षाभूमी रोडवरील आय.टी.आय. मैदान, श्रद्धानंदनपेठ, नागपूर येथे हा सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न होणार आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या ४७ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन देशाचे केंद्रीय मंत्री ना. श्री. चिराग रामविलास पासवान यांच्या प्रमुख हस्ते पार पडणार आहे तर अध्यक्षस्थानी पक्षाचे युवा नेते व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे राहणार आहेत.
दिग्गजांची राहणार विशेष उपस्थिती
या ऐतिहासिक अधिवेशनाला देशभरातून अनेक दिग्गज व मान्यवर नेते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने :
पक्षाचे उपाध्यक्ष दलितमित्र गोपाळराव आटोटे, एकतावादी रिपब्लिकनचे राष्ट्रीय नेते मा. गंगाराम इंदिर्से, आर.पी.आय. चे महासचिव डॉ. राजेंद्र गवई, प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे, प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, तसेच कर्नाटकचे मा. प्रकाश मुल्भारती, गुजरातचे सुरेशभाई सोनवणे व लीलावती बेन वाघेला, आंध्रप्रदेशचे मल्लेला व्यंकटराव, म.प्र.चे मा.पी.के. गजभिये, छत्तीसगडचे जितेन्द्र भावे, दिल्ली प्रदेशचे दयानंद गौतम व राजकिशोर आनंद, तेलंगणाचे एम. प्रेमकुमार, उ.प्र.चे विजयकुमार कश्यप, हरियानाचे हरपाल सिंग, जम्मू काश्मीरचे राजकुमार ललोत्रा, ॲड. जे.के.नारायणो, श्रीमती रत्नाताई मोहोड आणि ॲड. प्रमोद सीतारामपंत कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाचे धोरणात्मक विषय आणि मागण्या
या अधिवेशनामध्ये देशातील आणि समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा करून महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. प्रामुख्याने खालील विषयांवर धोरणात्मक ठराव व निर्णय घेतले जातील :
महाबोधी महाविहार मुक्ती, खाजगी विद्यापीठे व खाजगी उद्योग यांमध्ये आरक्षण लागू करणे, उपवर्गीकरण रद्द करणे, पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यांच्या समस्या, कंत्राटी कामगार व नोकर भरती पद्धती तात्काळ रद्द करणे, देशात दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी व मजुरी-महागाई या गंभीर विषयांवर ठोस निर्णय
३५ हजार भीमसैनिकांची महागर्जना
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात दाखल होणाऱ्या देशभरातील अनुयायांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार आहे. या भव्य मेळाव्यात देशभरातून सुमारे ३५ हजार भीम सैनिक सहभागी होणार आहेत.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी नागपूर प्रदेशचे पक्षाचे अध्यक्ष मा. कैलास बोबले आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी व नियोजन करण्यात येत आहे. दीक्षाभूमी परिसरासह संपूर्ण नागपुरात या अधिवेशनामुळे एकच उत्साह व चैतन्य पाहायला मिळत आहे.
पत्रकार परिषदेला प्रामुख्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






