नागपूर : द साऊथ पब्लिक स्कूल, ओंकार नगर, नागपूर यांच्या वतीने २२, २३ आणि २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान नागपूरमधील मिहान (MIHAN) येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूर येथे ९ व्या आंतरराष्ट्रीय मुख्याध्यापक शैक्षणिक परिषदेचे (IPEC-26) आयोजन करण्यात आले आहे. ‘अंडरस्टँडिंग वॉट (वर्ल्ड ऑफ वंडरफुल) जनरेशन्स – ब्रिजिंग इनसाइट्स अँड इनोव्हेशन्स’ (Understanding WOW – World of Wonderful Generations – Bridging Insights and Innovations) ही या तीन दिवसीय परिषदेची मुख्य मध्यवर्ती संकल्पना (Theme) असणार आहे.
या परिषदेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, हैदराबाद, लखनऊ, नोएडा, गुजरात, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह देशातील विविध राज्यांमधून आणि शहरांमधून नामांकित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
परिषदेची ठळक वैशिष्ट्य –
२२ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन आयआयएम कोझिकोडचे संचालक प्रो. देबाशिस चॅटर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, ख्यातनाम कलाकार पद्मश्री वासुदेव कामत हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून डॉ. माला पलानी, संजना कपूर, प्रसिद्ध मेमरी ट्रेनर आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आदिती सिंघाल, तसेच आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेट्री यांसारख्या दिग्गज व्यक्ती उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परिषदेचे विशेष प्रकाशन व पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि अभिनेते तथा माजी खासदार डॉ. नितीन भारद्वाज यांच्या हस्ते ‘पाथेय – द गोल्डन एलिक्सर’ या ई-सुवेनियरचे प्रकाशन करण्यात येणार असून, विविध शाळांच्या गुणवान मुख्याध्यापकांना ‘नचिकेता’ व ‘सुपर नचिकेता’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकास कसा साधायचा, परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल कसा राखायचा, यावर या तीन दिवसीय परिषदेत सखोल मंथन केले जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण परिषदेबद्दल शिक्षण वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






