गडकरींमुळे दिव्यांगांच्या आयुष्यात स्वाभिमानाची नवी पहाट! कृत्रिम पायांमुळे ४० दिव्यांगाना मिळाला नवा आधार; सीआरसी ठरतेय हजारो दिव्यांगांसाठी आशेचा किरण

SHARE:

नागपूर – दुसऱ्याच्या आधाराने चालावे लागणे, दैनंदिन कामांसाठी कुटुंबीयांवर अवलंबून राहणे आणि समाजात वावरताना न्यूनगंडाची भावना निर्माण होणे, या सगळ्यांचा सामना दिव्यांगांना करावा लागतो. मात्र, कृत्रिम पाय बसवून पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांच्या आयुष्यात नव्या आत्मविश्वासाचा जन्म होत असतो. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्यामुळे अश्या अनेक दिव्यांगांच्या आयुष्यात स्वाभीमानाची पहाट उजाडली आहे. शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

महाल येथील गडकरी वाडा येथे ४० दिव्यांगांना ना. गडकरी यांच्या हस्ते कृत्रिम पायांचे वितरण करण्यात आले. यावेळी पाय लावल्यानंतर आत्मविश्वासाने चालून दाखविणाऱ्या दिव्यांगांकडे बघून गडकरी देखील भारावले होते. दिव्यांगांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी गेली २५ वर्षे विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करीत असल्याचा खरा आनंद गडकरींच्या चेहऱ्यावर झळकत होता. दिव्यांगांना कृत्रिम पाय बसविल्यानंतर स्वतःच्या पायांवर चालता येण्याचा आनंद, पुन्हा काम करण्याची क्षमता आणि कुटुंबासाठी आधार बनण्याची उमेद त्यांना मिळते. नागपुरातील दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र अर्थात सीआरसी आज हजारो दिव्यांगांच्या आयुष्यात असाच सकारात्मक बदल घडवून आणत आहे. ना. नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून २०१५ मध्ये नागपुरात स्थापन करण्यात आलेले सीआरसी आज दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार बनले आहे. गडकरींच्या पुढाकारातून आजवर सहा लाखांहून अधिक दिव्यांग आणि अन्य लाभार्थ्यांनी विविध विशेष सेवांचा लाभ घेतला आहे.

गडकरी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या विविध दिव्यांग सहाय्य शिबिरांमधून आतापर्यंत ३० हजार ८४० दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना जवळपा ४२ कोटी रुपयांची सहायक उपकरणे वितरित करण्यात आली आहेत. सप्टेंबर २०२३ पासून आतापर्यंत १९ हजार ८९ लाभार्थ्यांना १६ कोटी ५५ लाख रुपये किमतीची ८४ हजार ५६६ सहायक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपकरणांमुळे अनेकांना दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करणे शक्य झाले आहे. इतरांच्या मदतीने चालणारी व्यक्ती जेव्हा स्वतःच्या पायांवर उभी राहते, तेव्हा तिच्यासाठी तो पुनर्जन्मच असतो, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली. 

दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कृत्रिम अवयव निर्मिती केंद्राची भूमिका विशेष महत्त्वाची ठरत आहे. गडकरी यांच्या खासदार निधीतून हे केंद्र कार्यरत असून, आतापर्यंत १९० हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पाय गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा चालण्याची संधी देण्याबरोबरच त्यांच्या आयुष्यातील हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचे काम या केंद्रातून होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. ALIMCO च्या सहकार्याने आधुनिक थ्रीडी प्रिंटेड कृत्रिम अवयवांसाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. याशिवाय ६७ लाख रुपये किमतीची अत्याधुनिक मोबिलिटी उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे हालचालींमध्ये अडचणी असलेल्या व्यक्तींना अधिक सुलभतेने आणि आत्मविश्वासाने जीवन जगता येत आहे.

दिव्यांगांना दयेची नव्हे, तर संधीची गरज आहे, हा विचार प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेण्याचे काम ना. गडकरी यांच्या नेतृत्वात होत आहे, याबद्दल सीआरसीचे प्रमुख श्री. प्रफुल्ल शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ना. गडकरी यांचे सहायक खासगी सचिव डॉ. प्रवीण भालेराव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा