“कृषी विद्यार्थी दिन” फक्त कागदोपत्री किंवा औपचारिकता नको; ‘ॲग्रो व्हेट – ॲग्रो इंजि. मित्र परिवार’ संघटनेचे शासनाला महत्त्वपूर्ण निवेदन!

SHARE:

नागपूर : भारताचे पहिले कृषी मंत्री, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमखे यांच्या जन्मदिनी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये “कृषी विद्यार्थी दिन” साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचे ‘ॲग्रो व्हेट – ॲग्रो इंजिनियरिंग मित्र परिवार’ या राज्यस्तरीय संघटनेने स्वागत केले असून शासनाचे आभार मानले आहेत. मात्र, हा दिवस केवळ छायाचित्राला हार घालून दाखवण्यापुरता किंवा निव्वळ औपचारिकता (बागलबुवा) ठरवू नये, अशी आक्रमक भूमिका घेत संघटनेने शासनाकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.

अभ्यासक्रमात भाऊसाहेब देशमखेंच्या जीवनाचा समावेश असावा

ॲग्रो व्हेट – ॲग्रो इंजिनियरिंग मित्र परिवार ही संघटना सन २०२३ (भाऊसाहेब यांच्या १२५ व्या जयंती) पासून डॉ. पंजाबराव देशमकृषी विद्यापीठ, अकोला व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. डॉ. पं. दे. कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमात भाऊसाहेब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा, मूल्यांकन नसणारा (non-credit) अभ्यासक्रम किंवा विषय समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, याबाबत नुकत्याच आलेल्या शासन निर्णयात (G.R.) कृषी विद्यार्थी दिन कसा साजरा केला जाईल, याची कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, अशी खंत संघटनेने व्यक्त केली आहे.

संघटना प्रामुख्याने मांडत असलेल्या ५ प्रमुख मागण्या :

१. पशुवैद्यकीय विद्यापीठातही विस्तार :

कृषी विद्यार्थी दिन हा केवळ राज्यातील कृषी विद्यापीठांपुरता मर्यादित न राहता, तो पशुवैद्यकीय विद्यापीठातही तितक्याच उत्साहात साजरा करण्यात यावा. कारण कृषी शिक्षण हा कृषी विद्यापीठाचाच एक भाग आहे.

२. महापुरुषांचे योगदान सांगणारा अभ्यासक्रम :

‘कृषी विकासाचे दीपस्तंभ’ या शिर्षकाखाली महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब देशमख, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील या सर्व मान्यवरांनी देशाच्या आणि विशेषतः राज्याच्या कृषी व सहकार क्षेत्रात दिलेले योगदान नवीन पिढीला समजण्यासाठी मूल्यमापन नसलेला विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा.

३. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा :

कृषी शिक्षण, कृषी व्यवसाय आणि इतर संबंधित बाबींवर विचार करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात यावी, जेणेकरून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व शासनाला योग्य ते धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होईल.

४. मार्गदर्शन व सत्कार सोहळे व्हावेत :

कृषी विद्यार्थी दिननिमित्त कृषी व पशुव्यवसाय क्षेत्रात नामवंत असलेले शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून उच्च पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सत्कार कार्यक्रम आयोजित करावेत.

५. आमदारांच्या उपस्थितीत ग्रामसभेच्या धर्तीवर ‘कृषी आमसभा’ :

ज्या पद्धतीने वर्षातून एकदा आमदारांच्या उपस्थितीत विधानसभा निहाय आमसभा आयोजित केली जाते, त्याच धर्तीवर दरवर्षी २७ डिसेंबरपासून पुढील एक आठवड्यात आमदारांच्या उपस्थितीत “कृषी विभाग व शेतकरी समस्या” या विषयावर विशेष ‘आमसभेचे’ आयोजन करण्यात यावे.

शासनाने गांभीर्याने विचार करावा –

वरील मागण्या केवळ मागण्या नसून शासनाला योग्य दिशा ठरवण्यास उपयुक्त ठरतील. जर शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतला, तर महापुरुषांना खऱ्या अर्थाने आदरांजली मिळेल आणि कृषी दिन साजरा करण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सार्थक ठरेल, अशी अपेक्षा ‘अग्रो व्हेट – अग्रो इंजि. मित्र परिवार’ तर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहीतकर, उपाध्यक्ष सुनील सहातुपुरे, सचिव प्रणय पराते, सहसचिव अजय तायवाडे, सचिव – डॉ. दिपक कडू (ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, नागपूर), डॉ. संजय धोटे (सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी), दिपक चौधरी (माजी विद्यापीठ अध्यक्ष, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला), हेमंत खराबे (सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक), राम आखरे, मिलिंद राऊत (कृषी सल्लागार समिती), संजय देशमुख (C.M.D., प्रथम बायोटेक प्रा. लि.), संजय सालोडकर (सेवानिवृत्त विकास अधिकारी, भा.जी.बी.नि.), प्रमोद पांडे, चक्रधर प्रल्हाद गोस्वामी (माजी व्यवस्थापक, कापूस पखान महासंघ, नागपूर) आदींसह अनेक मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा