कुणी २७ मतांच्या फरकानं जिंकलं, तर कुणी ९५ मतांच्या; बिहारमध्ये ‘या’ ९ जागांवर दिसल्या थरारक लढती

SHARE:

राधा चरण साह (संदेश), महेश पासवान (अगिआंव) आणि मनोज बिस्वास (फारबिसगंज) हे आपापल्या जागांवर विजयी झाले आहेत. (डावीकडून उजवीकडे)

राधा चरण साह (संदेश), महेश पासवान (अगिआंव) आणि मनोज बिस्वास (फारबिसगंज) हे आपापल्या जागांवर विजयी झाले आहेत. (डावीकडून उजवीकडे)

बिहार विधानसभा निवडणुकीत काही जागांवरील निकाल शेवटच्या क्षणापर्यंत लांबले. अनेक मतदारसंघांत उमेदवार अल्प मतांनी मागे-पुढे होत होते. काही जागांचा तर २७ आणि ९५ अशा अत्यल्प फरकाने निकाल लागला.

या जागांचा निकाल खऱ्या अर्थाने श्वास रोखणारा ठरला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत कोण, कुठे आणि किती मतांनी जिंकले हे जाणून घेऊया.

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीला ४० जागांचाही टप्पा पार करता आलेला नाही.

काही जागांवर अत्यंत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली आणि उमेदवारांमधील विजयाचं अंतरही खूपच कमी होतं.

१ . संदेश
बिहारमधील संदेश या मतदारसंघात संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) राधा चरण साह यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) दीपू सिंह यांचा पराभव केला.

या मतदारसंघात जेडीयूच्या उमेदवारांनं अवघ्या २७ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

राधा चरण साह यांना ८० हजार ५९८ मतं मिळाली, तर दुसऱ्या स्थानावरील दीप सिंह यांना ८० हजार ५७१ मतं मिळाली.

तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले जन सुराज पक्षाचे राजीव रंज राज यांना ६ हजार ४० मतं मिळाली.

२ . अगिआंव
आरातील अगिआंव मतदारसंघात भाजप आणि सीपीआय (एमएल) यांच्या उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली.

येथील मतमोजणी होत असताना निकालात अनेकदा चढ-उतार दिसून आले.

शेवटी भाजपचे महेश पासवान ९५ मतांच्या फरकाने विजयी झाले. या जागेवर सीपीआयचे (एमएल) शिव प्रकाश रंजन दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

३ . फारबिसगंज
फारबिसगंज मतदारसंघात काँग्रेसचे मनोज बिस्वास आणि भाजपचे विद्या सागर केशरी यांच्यात चुरशीची लढत झाली.

ही जागा काँग्रेसने केवळ २२१ मतांनी जिंकली. काँग्रेसचे मनोज बिस्वास यांना १ लाख २० हजार ११४ मतं मिळाली.

तर दुसऱ्या क्रमांकावरील विद्या सागर केशरी यांना १ लाख १९ हजार ८९३ मतं मिळाली.

४ . चनपटिया
पश्चिम चंपारणच्या चनपटिया मतदारसंघात काँग्रेसचे अभिषेक रंजन आणि भाजपचे उमाकांत सिंह यांच्यात जोरदार सामना झाला.

या जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने ६०२ मतांनी विजय मिळवला. अभिषेक रंजन यांना एकूण ८७ हजार ५३८ मतं मिळाली.

भाजपच्या उमाकांत सिंह यांना ८६ हजार ९३६ मतं मिळाली. या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले जन सुराज पक्षाचे उमेदवार त्रिपुरारी कुमार तिवारी उर्फ मनीश कश्यप यांना ३७ हजार १७२ मतं मिळाली.

५ . बोधगया
बोधगया जागेवर आरजेडी आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) (एलजेपी) यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली.

आरजेडीचे कुमार सर्वजीत यांनी एलजेपीचे (रामविलास) उमेदवार श्यामदेव पासवान यांना 881 मतांनी पराभूत करून विजय मिळवला.

कुमार सर्वजीत यांना १ लाख २३६ मतं मिळाली. तर एलजेपीचे (रामविलास) श्यामदेव पासवान यांना ९९ हजार ३५५ मतं मिळाली.

६ . बख्तियारपूर
आणखी एका जवळच्या लढतीत एलजेपीचे (रामविलास) अरुण कुमार यांनी आरजेडीचे अनिरुद्ध कुमार यांना ९८१ मतांनी पराभूत केलं.

अरुण कुमार यांना 88 हजार 520 मतं मिळाली, तर अनिरुद्ध कुमार यांना ८७ हजार ५३९ मतं मिळाली.

जन सुराज पक्षाचे उमेदवार बाल्मिकि सिंह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना ६ हजार ५८१ मतं मिळाली.

७ . बलरामपूर
बलरामपूर जागेवर एलजेपी (रामविलास) आणि एआयएमआयएम यांच्यातही चुरशीची लढत पाहायला मिळाली.

एलजेपीच्या (रामविलास) संगीता देवी यांनी एआयएमआयएमचे मोहम्मद आदिल हसन यांना ३८९ मतांनी पराभूत केलं.
संगीता देवी यांना ८० हजार ४५९ मतं तर मोहम्मद आदिल हसन यांना ८० हजार ७० मतं मिळाली.

या जागेवर सीपीआयचे (एमएल) महबूब आलम तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना ७९ हजार १४१ मतं मिळाली.

८ . ढाका
या जागेवर आरजेडीचे फैसल रहमान १७८ मतांनी विजयी झाले. त्यांना भाजपचे पवन कुमार जयस्वाल यांनी जोरदार टक्कर दिली.

फैसल रहमान यांना १ लाख १२ हजार ७२७ तर पवन कुमार जयस्वाल यांना १ लाख १२ हजार ५४९ मतं मिळाली.

तिसऱ्या क्रमांकावर जन सुराजचे उमेदवार डॉ. एलबी प्रसाद यांना ८ हजार ३४७ मतं मिळाली.

९ . जहानाबाद
आरजेडीचे राहुल कुमार यांनी चुरशीच्या लढतीत जेडीयूचे चंदेश्वर प्रसाद यांना ७९३ मतांनी पराभूत केले.

राहुल कुमार यांना 86 हजार 402 मतं, तर जेडीयूचे चंदेश्वर प्रसाद यांना ८५ हजार ६०९ मतं मिळाली.

या जागेवर जन सुराजचे उमेदवार अभिराम सिंह यांना ५ हजार ७६० मतं मिळाली.

 

Leave a Comment

अधिक वाचा