आरबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत बँकेची कॅश व्हॅन लुटली, दिवसाढवळ्या तब्बल ७ कोटी घेऊन चोरटे ‘असे’ झाले पसार…

SHARE:

रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे सांगत बँकेची रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन (कॅश व्हॅन) लुटल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना कर्नाटकमधील असून या बनावट अधिकाऱ्यांनी त्या वाहनातील तब्बल ७ कोटी रुपये (८ लाख डॉलर) लुटले. या चोरट्यांकडे शस्त्रंही होती, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

बंगळुरू शहराच्या मध्यवर्ती भागातून दिवसाढवळ्या कॅश व्हॅन लुटणाऱ्या चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे.

हा दरोडा बुधवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी पडला. ६ पुरुष एका एसयूव्हीमधून आले आणि त्यांनी रोख रक्कम घेऊन जाणारी कॅश व्हॅन रस्त्यातच थांबवली.

हे पैसे बँकेच्या शाखांमध्ये नेले जात होते, असं बंगळुरूचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग यांनी बीबीसीला सांगितलं. दरोड्याचा हा प्रकार वर्दळीच्या ठिकाणी घडला.

या व्हॅनमध्ये १ चालक, १ कॅश कस्टोडियन आणि २ सशस्त्र सुरक्षा रक्षक होते.

कागदपत्रं व्हेरिफाय करायचं म्हणून कॅश व्हॅन थांबवली’

दरोडेखोरांनी व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे सांगितले. इतक्या मोठ्या रकमेची वाहतूक करण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी करायची असल्याचे ते म्हणाले.

पोलीस म्हणाले की, दरोडेखोरांनी कॅश कस्टोडियन आणि सुरक्षा रक्षकांना त्यांची शस्त्रं व्हॅनमध्ये ठेवून एसयूव्हीमध्ये बसण्यास सांगितलं. तर चालकाला रोख रकमेसह गाडी चालवण्याची सूचना दिली.

दरोडेखोरांनी काही किलोमीटर एसयूव्ही कॅश व्हॅनच्या मागे चालवली. नंतर त्यांनी चालकाला व्हॅनमधून बाहेर काढलं. कॅश कस्टोडियन आणि सुरक्षा रक्षकाला एसयूव्हीमधून उतरवलं. बंदुकीचा धाक दाखवत कॅश ताब्यात घेतली आणि त्यांनी तेथून पलायन केलं.

त्या भागात सीसीटीव्ही कमी होते.

दरोडेखोरांनी या दरोड्यात एकापेक्षा जास्त वाहनांचा वापर केला होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या कंपनीने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’चं स्टिकर आणि बनावट नंबर प्लेट

दरोड्यात वापरलेल्या एसयूव्हीवर बनावट नंबर प्लेट होती. त्यावर ‘भारत सरकार’ असं स्टिकर होतं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिली.

रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा या दरोड्याशी काही संबंध आहे का, या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.

दरोड्यात वापरलेली एसयूव्ही पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना दिली.

परंतु, गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी संशयितांनी पळून जाण्यासाठी कोणतं वाहन वापरलं हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलं.

“दरोडेखोरांनी गाडी बदलून पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले, हे तपासणीत नक्की झालंय,” असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं पोलीस यापूर्वी झालेल्या मोठ्या बँकांच्या दरोड्यांप्रमाणे या प्रकरणाचाही छडा लवकरच लावतील, याबद्दल खात्री असल्याचा विश्वास गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मे महिन्यात, विजयपुरा जिल्हा बँकेतून लॉकरची बनावट चावी वापरून ५३२ .६ कोटी रुपयांचे ५९ किलो सोनं चोरीला गेलं होतं. पोलिसांनी त्यापैकी ३९  किलो सोनं आणि काही रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच दोन माजी कर्मचाऱ्यांसह १५ जणांना अटक केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा