मेक्सिकोची फातिमा बॉश मिस युनिव्हर्स, डोक्यावर मुकूट मिरवण्यापूर्वी केलं होतं स्पर्धेतून वॉकआऊट

SHARE:

२१ नोव्हेंबर २०२५

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या मिस युनिव्हर्स २०२५ चा किताब मेक्सिकोच्या फातिमा बॉशला मिळाला आहे. गोंधळ, वाद-विवादांमुळे यंदाची ही स्पर्धा चर्चेत आली होती.

शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) झालेल्या खास कार्यक्रमात फातिमाला मुकुट परिधान करण्यात आला.

मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एका कार्यक्रमात फातिमाला सर्व स्पर्धकांसमोर फटकारण्यात आलं होतं.

त्यानंतर तिने त्या कार्यक्रमातून ‘वॉकआऊट‘ केलं होतं. या वादामुळे २५ वर्षीय फातिमा चर्चेत आली होती.

त्यानंतर दोन परीक्षकांनी स्पर्धेतून राजीनामा देत माघार घेतली होती. राजीनामा देणाऱ्या एका परीक्षकाने ही स्पर्धा ‘फिक्स‘ असल्याचा दावा केला होता.

हा दिमाखदार सोहळा बँकॉकमध्ये झाला. परंतु, स्पर्धेच्या मध्येच अनेक स्पर्धक या स्पर्धेतून बाहेर पडले आणि दोन परीक्षकांनी राजीनामाही दिला होता.

विश्लेषक सांगतात की, या वादामुळे थाई आणि मेक्सिकन कंपन्यांच्या मालकांमधील सांस्कृतिक आणि धोरणात्मक मतभेद उघड झाले.

१९५२ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा हा ७४ वा हंगाम आहे.

स्पर्धेच्या क्राऊन सेरेमनीमध्ये एक खास बाब पाहायला मिळाली. ही संस्था आता फक्त दरवर्षीच्या टीव्ही शोपुरता मर्यादित न राहता, टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवरही चालणारा मोठा मीडिया ब्रँड होण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून आलं.

भारताची फुलराणी म्हणून ओळख असलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा या स्पर्धेच्या ज्युरीमध्ये समावेश होता.

मिस युनिव्हर्सची सुरुवात अमेरिकेत झाली. ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या मिस वर्ल्डसोबत ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात जास्त काळ चालणाऱ्या सौंदर्य स्पर्धांपैकी एक मानली जाते.

या स्पर्धेचं उद्दिष्ट महिलांना जागतिक प्रश्नांवर जागरुकता करण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं आहे.

हा किताब मिळाल्यावर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होण्याची संधीही मिळू शकते.

थायलंड यंदा चौथ्यांदा मिस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजन करत होतं. फॅन वेबसाइट्सनुसार, त्यांची स्पर्धक हा मुकुट जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती.

भारतीय वंशाची थायलंडची नागरिक प्रवीनेर सिंहही या स्पर्धेत होती. ती जिंकली असती तर 1988 नंतर थायलंडची पहिली, आणि आतापर्यंतची तिसरी मिस युनिव्हर्स ठरली असती.

२०१८ मध्ये थायलंडने आयोजित केलेली मिस युनिव्हर्स स्पर्धा अलीकडच्या काळातील सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे यंदाचं आयोजन त्याहूनही चांगलं होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती.

स्पर्धेदरम्यान गोंधळ

यंदाच्या हंगामाचं आयोजन थायलंडमधील प्रसिद्ध मीडिया कंपनीचे प्रमुख नोव्हात इट्साग्रासिल यांनी केलं. चाहते त्यांना मिस ग्रँड इंटरनॅशनलचे संस्थापक आणि ती स्पर्धा आयोजित करणाऱ्या कंपनीचे मालक म्हणून ओळखतात.

ही थायलंडमध्ये होणारी एक छोटी स्पर्धा आहे, जी सोशल मीडियावरील तिच्या उपस्थितीसाठी प्रसिद्ध आहे.

यावर्षीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजन करण्याचा परवाना नोव्हात यांच्याकडं, तर स्पर्धेचं मुख्य व्यवस्थापन मेक्सिकोचे उद्योजक राऊल रोचा यांनी केलं.

सुरुवातीच्या काळात या स्पर्धेत उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील महिलांचं वर्चस्व होतं. परंतु, गेल्या काही दशकांत दक्षिण-पूर्व आशियात विशेषतः थायलंड, फिलीपिन्स आणि इंडोनेशियामधून या स्पर्धेचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.

इथे या स्पर्धेला गरिबीतून बाहेर पडण्याचा किंवा सेलिब्रिटी होण्याचा शॉर्टकट मार्ग मानला जातो.

यंदाच्या आयोजनात या महिन्याच्या सुरुवातीलाच नाट्यमय वळण मिळालं होतं.

प्री-इव्हेंट कार्यक्रमात नोव्हात यांनी मिस मेक्सिको फातिमा बॉशला इतर अनेक स्पर्धकांसमोर सोशल मीडियावर प्रमोशनल कंटेंट पोस्ट न करण्याबद्दल फटकारलं होतं.

फातिमाने यावर आक्षेप नोंदवला. तेव्हा नोव्हात यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावलं आणि फातिमाच्या बाजूने उभं राहणाऱ्यांनाही स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्याची धमकी दिली.

फातिमा बॉश त्या हॉलमधून बाहेर गेली आणि तिच्या मागे इतर अनेक स्पर्धकही तिला पाठिंबा देत बाहेर पडले.

मिस युनिव्हर्स संघटनेने नोव्हात यांच्या वागणुकीला ‘दुर्भाग्यपूर्णम्हटलं. त्याचवेळी राऊल रोचा यांनी मेक्सिकोहून व्हीडिओद्वारे थाई भागीदार नोव्हात यांना ‘असं न करण्याचा’ सल्ला दिला.

नोव्हात इट्साग्रासिल यांनी नंतर यासाठी माफी मागितली आणि माझ्या काही शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

पण स्पर्धा योग्यरित्या चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांची एक टीम तिथे पाठवण्यात आली.

Leave a Comment

अधिक वाचा