
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव आणि फत्तेपूर येथे गेल्या काही दिवसांपासून भूकंपसदृश्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात याच परिसरातील शिरजगाव मोझरी येथे भूकंपाचे हादरे जाणवले होते. त्यावेळी केंद्र सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी या संकेतस्थळावर तपासणी केली असता भूकंपाचे धक्के बसल्याबाबत कोणतीही नोंद आढळून आली नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले होते.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत शिवणगाव आणि फत्तेपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर भूकंपाची अफवा पसरत गेली. काही लोकांनी घरातील भांडी खाली पडल्याची माहिती दिली. मात्र, या भूकंपाची नोंद भूकंपमापक यंत्रावर झालेली नाही. या घटनेची तातडीने दखल घेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन गावाची पाहणी केली आणि ग्रामस्थांना दिलासा दिला.
भूकंप सदृश्य धक्क्यांमुळे चिंतेत असलेल्या गावकऱ्यांची खासदार वानखडे यांनी आत्मीयतेने विचारपूस केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी घटनास्थळावरूनच अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. प्रशासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारची हयगय न करता तातडीने उपाययोजना कराव्यात आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या भूगर्भीय हालचालींचे नेमके कारण शोधण्यासाठी येत्या काही दिवसांत भूगर्भ वैज्ञानिकांचे विशेष पथक गावाला भेट देणार आहे. तज्ज्ञांच्या पाहणीनंतर आणि अहवालानुसार पुढील योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन बळवंत वानखडे यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले. या पाहणी दौऱ्यात तिवसा चे तहसीलदार मयूर खडसे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, सरपंच धर्मराज खडसे, पंकज देशमुख, प्रशांत कांबळे यांच्यासह संबंधीत विभागाचे तालुका प्रशासनाचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. काही वर्षांपुर्वी तिवसा तालुक्यात अशाच प्रकारच्या घटनांची नोंद झाली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली होती. या परिसरातील भूगर्भात हालचाली होत आहेत का, त्या कशामुळे होत आहेत, याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. ग्रामस्थांमध्ये या घटनांमुळे भीतीचे वातवरण आहे. ते दूर करणे गरजेचे आहे. यंत्रणेने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.




