
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर शाखेच्या पूर्व विभागाची जम्बो कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली. पुणे (पूर्व) शहराची कार्यकारिणी तसंच समन्वयक, निरीक्षक, शहर पदाधिकारी, प्रमुख नियुक्त्या आणि विविध सेल प्रमुखांची कार्यकारिणी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली आहे. शहराच्या पूर्व विभागाचे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांनी ही यादी जाहीर केली. यात ॲड. रूपाली पाटील ठोंबरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पक्षाच्या आखणीनुसार पूर्व विभागात वडगाव शेरी, हडपसर, शिवाजीनगर, कसबा पेठ हे विधानसभा मतदारसंघ येतात. हाजी फिरोज शेख यांची पूर्वीच कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पुणे कार्यकारिणीत ३९ उपाध्यक्ष, २२ सरचिटणीस, १७ चिटणीस आणि २० संघटक सचिवांसह जवळपास अडीचशे पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी चार विधानसभांतील अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून, उर्वरित चार मतदारसंघांची कार्यकारिणी केव्हा जाहीर होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादीतील नाराजी, हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्रवक्तेपदाच्या फेरनिवडीवेळी त्यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर ठोंबरे यांनी जाहीरपणे याबाबत भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीने त्यांच्यावर जबाबदारी सोपवत यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून माजी आमदार महादेव बाबर यांना प्रदेश प्रतिनिधीपदी नियुक्त करण्यात आलं आहे. विकास पासलकर यांची प्रवक्तेपदी, राकेश कामठे यांची शहर समन्वयक, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, बाळासाहेब कोद्रे, नारायण लोणकर आणि विजय ढेरे यांची निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हसीना इनामदार यांची महिला विभाग अध्यक्षपदी, ईशान तुपे यांची युवक विभाग अध्यक्षपदी आणि लावण्या शिंदे यांची युवती विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.




