
पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा स्वतंत्र लढणार आहेत, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीआधीच काही राजकीय पक्षांत राडा झाला आहे. दोन्ही एकत्र येण्यास ठाकरे सेनेचा विरोध आहे. आता अजित पवारांबरोबर शरद पवारांची युती होणार आहे का? नाही हे पुढे कळणार आहे. भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला असून नव्या समिकरणांची चर्चा इथे सुरू झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने आपले स्पष्टपणे मत मांडले आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या मुद्द्यावरुन पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातील आपली भूमिका उघडपणे स्पष्ट केली आहे. पवारांच्या संभ्रमावस्थेवरुन प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याची मूभा दिली असल्याचा उल्लेख आजच केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरुन गोंधळ दिसत असतानाच राऊतांनी काँग्रेस सध्या सोबत असल्याचे वाटत नाही असेमत नोंदवले आहे. पत्रकारांशी बोलताना राऊतांनी काँग्रेसने वेगळी चूल मांडण्याची गरज नसल्याचे म्हणत एकत्र लढावे असे आवाहन केले आहे. त्याचवेळी पत्रकारांनी राऊतांना शरद पवारांची संभ्रमावस्था दिसत असल्याचा उल्लेख करत प्रश्न विचारला आहे.
शरद पवारांच्या पक्षाची फार मोठी भूमिका मुंबईत नाही, पण शरद पवारांची संभ्रमावस्था दिसते आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत का? असे म्हणत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. “मी स्वतः चर्चा करणार आहे त्यांच्याशी. सुरुवात झाली आहे काल, त्यांचा आग्रह आहे की मी बाहेर पडू नये,“ असे राऊत म्हणाले. पुढे बोलताना, “मी राज ठाकरेंना भेटणार आहे. निवडणुकीत चर्चा सुरु ठेवाव्या लागतात. त्या संवादाचा माध्यम असतात. मी त्यांना भेटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या संमतीने बोलेन. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची मुंबईत फार मोठी भूमिका नाही. मुंबईबाहेर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारसाहेबांचा आहे. आमची भूमिका अशी आहे की राज्यात एकत्र लढायला हवं,“ असे राऊत म्हणाले.
तसेच या विषयावर बोलताना अगदी शेवटच्या वाक्यात राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख केला. आता अजित पवारांबरोबर त्यांची शरद पवारांची काय भूमिका आहे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,“ असे राऊत म्हणाले आहेत.
भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपच्या निर्णयानंतर अजित पवारांनी स्थानिक नेत्यांना शरद पवार गटाशी युतीची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले. भाजपाच्या निर्णयामुळे महायुतीतील युती तुटली आणि अजित पवार गटाला धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये याबाबत बैठकाही सुरू झाल्या असून, नाना काटे आणि सुनील गव्हाणे यांसारख्या नेत्यांनी भाजपविरोधात एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.





