अजितदादांचे ‘शरद पवार’ विजयी, चुरशीच्या लढतीत भाजपला मोठा धक्का…

SHARE:

नांदेड : राज्याचं लक्ष लागलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने बाजी मारली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार विजयी झाले आहेत. शरद पवार यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचा २  हजार ८२१  मतांनी पराभव केला आहे. शिवाय राष्ट्रवादी पक्षाचे १७ नगरसेवक विजयी झाले आहेत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील शरद पवार विजयी
राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर चिखलीकर यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. दुसरीकडे भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शरद पवार यांना १० हजार १९१  एवढी मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांना ८  हजार १६०  मतं मिळाली. हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

लोहा नगर परिषदेत अटीतटीची चुरस
लोहा नगर परिषदेच्या २० नगरसेवक आणि १  नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. भाजपकडून गजाजन सूर्यवंशी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शरद पवार हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. शरद पवार हे भाजपचे तालुकाध्यक्ष होते. चिखलीकर यांनी ऐनवेळी त्यांना राष्ट्रवादी पक्षात ओढत तिकीट दिले.

काँग्रेस उमेदवाराने ऐन वेळी माघार घेतल्याने भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात लढत पाहायला मिळाली. शेवटपर्यंत अटीतटीचा सामना रंगला होता. शिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती. मात्र तरीही लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे.

लोहा – चिखलीकरांनी बालेकिल्ला राखला
लोहा हे चिखलीकर यांचा बाल्लेकिल्ला आहे. मागच्या निवडणुकीत चिखलीकर हे भाजपात असताना नगर परिषदेवर झेंडा फडकवला होता. राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्यानंतरही चिखलीकर यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा