कल्याणमधील शालेय अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, दीड वर्षांनी शिक्षिका पत्नीला अटक, मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो सापडले अन्…

SHARE:

कल्याण : शाळेत प्रशासकीय अधिकारी असलेल्या विवेक माने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी दीड वर्षानंतर खडकपाडा पोलिसांनी शिक्षिका पत्नीसह तिच्या भावाला अटक केली आहे.

येथील एका नामांकित शाळेत प्रशासकीय अधिकारी असलेल्या ४४ वर्षीय विवेक माने या तरुणाने ऑगस्ट २०२४ मध्ये राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

काही दिवसांपूर्वी विवेकच्या वडिलांनी, मृत्यूपुर्वी आपल्या मुलाने त्याला पत्नीच्या माहेरहून धमक्या येत असल्याचे सांगितले होते, अशी माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसाकडे जप्त केलेल्या मोबाइलबाबत विचारणा केली. यांनतर पोलिसांनी प्रयोगशाळेत तपासणीसाठी धाडलेल्या मोबाइलच्या सीडीआरचा अहवाल मिळवला. या अहवालात आक्षेपार्ह फोटो आणि संभाषण तसेच विवेक याला त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांनी दिलेल्या धमक्या यांचे कॉल रेकॉर्ड मिळाले.

विवेक याची पत्नी नामांकित शाळेत शिक्षिका आहे. पोलिसांनी या पुराव्याच्या आधारे तिच्यासह तिचा भाऊ अक्षय मनोरे याला अटक केली आहे. सध्या दोघे आधारवाडी तुरुंगात आहेत. विवेकच्या मृत्यूस कारणीभूत असलेले त्याचे सासू-सासरे, त्यांची मुलगी यांनाही अटक करण्याची मागणी वडिलांनी केली आहे. विवेकची हत्या केल्यानंतर ती आत्महत्या भासविण्यासाठी त्याला फाशी दिली असा संशय व्यक्त करून पुढील तपास करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

मोबाइलमध्ये मिळाली आक्षेपार्ह माहिती
या प्रकरणी मोबाइलवरील आक्षेपार्ह माहितीवरून गुन्हा दाखल करत दोघांना अटक केल्याचे खडकपाडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अर्जुन दांडेकर यांनी सांगितले. व्हिसेरासह संशयित आरोपींच्या मोबाइल टॉवरचा अहवाल यांची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.

Leave a Comment