
“मुंबईच्या जागा वाटपामध्ये मनसेला ज्या सीट पाहिजे, त्या सीट देण्यात आलेल्या नाहीत. शिवसेनेला संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना जास्तीत जास्त पाहिजे त्या सीट त्यांना देण्यात आलेल्या आहेत” असं संतोष धुरी म्हणाले.
“नितेश राणे यांच्याशी आधीपासून संपर्क होता. काही काम असल्यास आम्ही त्यांना सांगायचो. काल प्रवेश केल्यानंतर मी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. २००७ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यावर आम्ही कुठलीही अपेक्षा ठेवली नव्हती. कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. त्याप्रमाणे मी कुठली डिमांड ठेवलेली नाही. मला सीट मिळाली नाही म्हणून नाराज नाही” असं संतोष धुरी यांनी सांगितलं. काल त्यांनी अनेक वर्षांपासूनची मनसेची साथ सोडून भाजपत प्रवेश केला. “१९४ ही शिवसेनेला दिल्यानंतर १९२ ही कोणासाठी? मागणी एवढी वाढली आणि त्यात १९२ सीट घेण्यासाठी १९४ ची जागा सोडण्यात आली. सचिन अहिर यांनी सांगितलं होतं, प्रत्येक विधानसभेत दोन जागा मिळणार आहेत. मग जागा का देण्यात आल्या नाहीत?” असा सवाल संतोष धुरी यांनी विचारला. “१९२ त्यांना पाहिजे होता, म्हणून ते कोणाचाही बळी द्यायला तयार होते. एखाद्याला सेट करायचं. त्यामुळे दुसऱ्या वरती अन्याय करायचा असा प्रकार घडलेला आहे. मी जी तयारी केली ती तयारी गुंडाळून मी आता बाहेर पडलेलो आहे” असं धुरी यांनी सांगितलं.
“जागा वाटपात आम्हाला जागा दिली नाही. परंतु नंतर आम्हाला कळलं की संदीप देशपांडे आणि संतोष धुरी कुठे दिसले नाही पाहिजेत असा बाल हट्ट होता. त्यानंतर मनातून वाईट वाटलं आणि बाहेर पडलो. राजकारणात एकमेकांवर शिंतोडे उडवले जातात. त्याप्रमाणे या गोष्टी होतात. वरळी विधानसभेत आम्ही यांच्या विरोधात लढलो होतो. आमच्यावरती बोलले या गोष्टी लक्षात ठेवून असं वागायचं आणि हा राग त्यांनी काढलेला आहे, आणि या गोष्टीला साथ राज ठाकरे यांनी दिली” असं संतोष धुरी म्हणाले.





