नवी दिल्ली – ‘इंडियन आयडॉल ३’चा विजेता आणि ‘पाताल लोक २’ या वेब सीरिजमधील अभिनेता प्रशांत तमांगचं निधन झालं आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी या प्रसिद्ध गायकाने आपले प्राण गमावले आहेत. नवी दिल्लीतील निवासस्थानी रविवारी प्रशांत मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर येत आहे. कार्डिॲक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. दिग्दर्शक राजेश घटानी यांनी प्रशांतच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घरात मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज (११ जानेवारी २०२६ रोजी) नवी दिल्लीतल्या द्वारका रुग्णालयात प्रशांतला मृत घोषित करण्यात आलं. प्रशांतने कोलकाता पोलीस दलातही सेवा बजावली होती. त्याचप्रमाणे तो अनेक नेपाळी चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिकेत झळकला होता. नुकतीच त्याने ‘पाताल लोक’ च्या दुसऱ्या सिझनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
दिल्लीतल्या द्वारका रुग्णालयाने रविवारी सकाळी ९ वाजता प्रशांतला मृत घोषित केलं. अरुणाचल प्रदेशमध्ये लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर तो दिल्लीत परतला होता. प्रशांतला यापूर्वी कोणत्याही गंभीर आरोग्याच्या समस्यांची लक्षणं दिसली नव्हती. त्यामुळे अचानक आणि अनपेक्षिकपणे आलेल्या कार्डिॲक अरेस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. प्रशांतचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी दार्जिलिंग इथं नेलं जाईल की दिल्लीतच अंत्यसंस्कार पार पडतील, याबद्दल सध्या त्याच्या कुटुंबीयांमध्ये चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे.





