आदेशाचे पालन न करणे आले अंगलट, १५५ अधिकारी-कर्मचार्यांवर गुन्हा दाखल, उडाली खळबळ

SHARE:

छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक कामासाठी पोलिसांसह अधिकारी आणि कर्मचार्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशाचे पालन न करणे छत्रपती संभाजी नगररातील पोलिसांसह अधिकारी आणि कर्मचार्यांना चांगलेच अंगलट आले आहे. निवडणूक कामासाठी दांडी मारल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात पोलिसांसह अधिकारी व कर्मचारी अशा एकुण १५५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने ही कारवाई केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ते १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक साहित्य जमा करेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मनपा आयुक्तांनी यासंदर्भात लेखी आदेशही काढले होते. मात्र, सर्व १५५ कर्मचाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या कामावर उपस्थित झाले नाही.

निवडणूक विभागाने सिटी चौक पोलीस ठाण्याला गैरहजर असलेल्या पोलिस आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी देऊन कलम १३४ लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय दिगंबरराव मानवतकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून लोक प्रतिनिधित्व कायद्यातील, १९५१ मधील कलम १३४ अंतर्गत या सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

आरोपींमध्ये पंचायत समिती फुलंब्री, गंगापूर, मौलाना आझाद कॉलेजचे कर्मचारी, डॉक्टर, प्राध्यापक आणि विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आहेरकर यांच्याकडे सोपवण्यात आला असून, दोषींवर आता निलंबनासारखी कठोर कारवाई होण्याचीही शक्यता आहे.

Leave a Comment

अधिक वाचा