१५ महिन्यांपूर्वी स्थापन झालेला ‘आयएसएलएएम’ पक्षाची मालेगावात जोरदार मुसंडी, महायूतीला मोठा धक्का

SHARE:

मालेगांव – राज्याच्या अनेक महापालिकेत सत्तेच्या जवळ पोहोचत असताना मालेगांव महापालिकेच्या निवडणुकीत महायूतीला जोरदार धक्का बसला आहे. येथे केवळ १५ महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र (आयएसएलएएम) पक्षाने मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मालेगावमध्ये इस्लाम पक्षाने तब्बल ३५ जागांवर विजय मिळवला आहे.

महाराष्ट्रात मुस्लिम बहुल मालेगाव, भिवंडी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात एआयएमआयएम, समाजवादी पार्टी आणि स्थानिक आघाड्या सत्तेची चावी स्वतःच्या हातात ठेवतात. मालेगावात एआयएमआयएम सर्वात मोठी ताकद मानली जाते. मात्र, मालेगावत इस्लाम पक्ष एमआयएमच्या पुडे गेला आहे.
मालेगाव महापालिकेतील एकूण ८४ जागांमध्ये भाजपने २ , शिवसेना १८, सपा ६, काँग्रेस ३, एमआयएम २०, इतर पक्षांने एक जागा जिंकली आहे. तर सर्वाधिक तब्बल ३५ जागा इस्लाम पक्षाने जिंकल्या आहेत. यामुळेच मालेगावात इस्लाम पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इस्लाम पार्टीच्या या विजयाने मालेगावच्या राजकीय इतिहासात नवीन पर्व सुरू झाले आहे.

इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र म्हणजेच इस्लाम या पक्षाची स्थापना मालेगाव शहराचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली. त्यांचे वडील कांग्रेसचे आमदार होते. आसिफ शेख हे मालेगाव मध्य मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४  मध्ये चुरशीच्या निवडणुकीत मौलाना मुफ्ती यांचा पराभव करत आसिफ शेख यांनी विजय मिळवला होता.

आसिफ शेख यांनी २०१९ ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते शरद पवार गटासोबत गेले. गेल्या महिन्यात शरद पवार याच्या तुतारीची साथ सोडून त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी आता इस्लाम या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली.

मालेगावात शिवसेने १८ जागा जिंकल्या आहेत. पाठिंबा बाबत अद्याप विचार केला नाही. पदाधिकारी आणि वरिष्ठांशी चर्चा करून पाठिंबासंदर्भात निर्णय घेवू असे मंत्री दादा भुसे म्हणाले. मात्र मालेगावात इस्लाम, समाजवादी पार्टी आणि ओवैसी यांचा पक्ष एकत्र आले तर त्यांना इतर कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही. हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कांग्रेसही त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

अधिक वाचा