मुंबई – अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणुक होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचाली आता सूरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पर्यंत नाव नोंदणीकृत असलेले मतदार या पोटनिवडणुकीत मतदान करण्यास पात्र असतील.
अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर बारामती विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाल्याने, पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये बारामती विधानसभा मतदारसंघासाठी हा मतदारयादी निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदारयादी सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची छाननी करून त्या ६ मार्च २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येतील. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवार १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या अंतिम यादीच्या आधारे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, असे राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.




