व्यवसाय : मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे, तणावामुळे जगभरात अशांतता असून त्याचा परिणाम सोनं आणि चांदीच्या बाजारातही दिसत आहे. दोन्ही धातूंच्या किमतीत सातत्याने चढउतार होत असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तिन्ही देशांच्या संघर्षामुळे जगभरातील शेअर बाजार आणि कमोडिटी बाजारांची धडधड वाढली आहे. युद्धाच्या या आवाजात, गुंतवणूकदार त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा त्याच जुन्या आणि विश्वासार्ह ठिकाणाकडे वळले आहेत, ज्याला ‘सेफ-हेवन’ म्हणजेच सोनं म्हणतात. याचाच परिणाम म्हणजे आज, ६ मार्च २०२६ रोजी दिसून आला असून सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.
काल MCX वर झालेल्या किरकोळ घसरणीनंतर, आज मात्र सोनं-चांदीच्या दरांनी उसळी मारली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी ९ वाजेपर्यंत,सोन्याच्या भावात १३०२ रुपयांची वाढ झाली. या मोठ्या वाढीसह, १० ग्रॅम सोन्याच्या किमतीने 1 लाख ६० ,९५० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे चांदीचीही तीच हालत असून त्यात आणखी मोठी वाढ दिसून आली आहे. चांदी तर सोन्यापेक्षाही वेगाने वाढत आहे. चांदीच्या किमती ५६३१ रुपयांनी वाढून २ लाख ६७ हजार ८२२ रुपये प्रति किलो या दरांवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे,ही गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का, असा प्रश्न सोने आणि चांदी खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या मनात आहे. युद्धाच्या आगीत सोने-चांदी अधिक महाग होईल की त्याची चमक कमी होईल आणि येत्या काळात सोने-चांदी स्वस्त होईल?
परदेशी बाजारपेठेतही खळबळ
मात्र या दोन धातूंच्या दरातील तेजी केवळ भारतीय बाजारपेठेपुरती मर्यादित नाही. सुरुवातीच्या आशियाई बाजारपेठांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही सोन्याची चमक वाढली आहे. जागतिक COMEX वर आज सोन्याने १.१६ टक्क्यांनी वाढ झाली आणि प्रति औंस ५,१३७.७० डॉलर्सचा जादुई टप्पा ओलांडला. चांदीही यात मागे नाही; त्यात २.२७ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे, जी प्रति औंस ८४.०६ डॉलर्सवर व्यवहार करत आहे. सोन्याची जागतिक मागणी सध्या शिखरावर आहे हेच परदेशी बाजारपेठेतील या कलावरन स्पष्ट होतं.
कालच मिळाला होता दिलासा
सराफा बाजाराचा हा सध्याचा ट्रेंड आणखी धक्कादायक आहे कारण एक दिवस आधीच, म्हणजे गुरुवारी, चित्र पूर्णपणे उलट होते. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, काल सराफा बाजारात जोरदार विक्री झाली. २४ कॅरेट सोन्याची किंमत १,९६२ रुपयांनी घसरून १,६०,५८६ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोने १,४७,०९७ रुपये आणि १८ कॅरेट सोने १,२०,४४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकलं गेले. काल चांदीला सर्वात मोठा फटका बसला, एका दिवसात ७,१३५ रुपयांनी प्रति किलोग्रॅम घसरण झाली आणि ती २,६४,२१२ रुपयांवर बंद झाली. काल एमसीएक्सवर सोने ०.१५% आणि चांदी ०.१२% ने घसरून बंद झाली.




