नवी दिल्ली – अमेरिका-इस्रायल इराण युद्ध हे ९ व्या दिवसीही सुरूच आहे. या युद्धाची आता भारतीयांना झळ बसण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्या गॅसच्या किमतीत प्रति सिलेंडर ६० रुपयांची वाढ करण्यात आली. ही दरवाढ तत्काळ शनिवारी लागू करण्यात आली. यासोबतच, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलो व्यावसायिक एलपीजीच्या दरात ११४.५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
पश्चिम आशियातील युद्धामुळे इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक थांबली आहे. इराण आणि ओमानमधील अरुंद जलमार्ग जो पर्शियन आखाताला ओमानच्या आखात आणि अरबी समुद्राशी जोडतो, जिथून भारताच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त एलपीजी आयात होतात. भारताच्या सुमारे ४० टक्के तेल आयात आणि अर्ध्याहून अधिक एलएनजी आयात देखील याच समुद्रधुनीतून होते. होर्मुझमधून सागरी वाहतुकीत बंद झाल्याने कच्चे तेल, पेट्रोलियम इंधन आणि नैसर्गिक वायूच्या आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजीच्या कीमतीत वाढ करण्यात आली आहे. घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्या गॅसच्या किमतीत प्रति सिलेंडर ६० रुपयांची तर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलो व्यावसायिक एलपीजीच्या दरात ११४.५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेचे असलेल्या व २०१६ पासून मोफत एलपीजी कनेक्शन मिळालेल्या १० कोटींहून अधिक गरीब कुटुंबांनादेखील ही दरवाढ सहन करावी लागेल. तसेच नागरिकांना घरात दोन एलपीजी सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी पहिला सिलिंडर अर्ज घेतल्यानंतर १५ दिवसांनी अर्ज करता येत होता. आता अचानक २५ दिवसांचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या वेबसाइटनुसार, विना-अनुदानित १४ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत आता दिल्लीत ९१३ रुपये झाली, जी पूर्वी ८५३ रुपये होती. याशिवाय मुंबईत विनाअनुदानित एलपीजीची किंमत आता ९१२.५० रुपये, कोलकातामध्ये ९३९ रुपये आणि चेन्नईमध्ये ९२८.५० रुपये झाली.




