नाशिक – महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात पती डॉ. जेजुरकर यांच्यावर मानसिक छळ केल्याचा कुटुंबियांनी आरोप केला आहे. नाशिकच्या डॉ. महिला मृत्यू प्रकरणात डॉ. पतीचे विवाहबाह्य संबंध आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्यामूळे त्यांच्या डॉ. पतीवर मानसिक छळ केल्याचा महिलेच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. शुक्रवारी ६ मार्च रोजी डॉ. मनीषा जेजुरकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या डॉ. पतीवर गंभीर आरोप केले आहेत. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूमागे त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर कारणीभूत आहे, असे कुटुंबियांनी म्हटले आहे. डॉ. मनीषा यांच्या भावाने केलेल्या आरोपांनुसार, डॉ. निलेश यांचे विवाहबाह्य संबंध होते. या कारणामुळे गेल्या काही काळापासून डॉ. मनीषा यांना मानसिक त्रास दिला जात होता. नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. निलेश यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या बहिणीला दीड वर्षांपासून मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप डॉ. मनीषा यांच्या भावाने केला आहे.
या सर्व प्रकारामुळे डॉ.मनीषा मानसिक दृष्ट्या खचल्या होत्या आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणात डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमध्ये आयुर्वेदिक सल्लागार होत्या. आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन आणि पर्यायी उपचारपद्धतींच्या माध्यमातून त्या अनेक रुग्णांना आरोग्य सेवा देत होत्या. आता कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अधिक तपास नाशिक पोलिस करत आहेत.




