नवी दिल्ली – रिलायंस समूहाचे प्रमुख आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होऊन राहिलेल्या नाहीत. आता सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे माजी अध्यक्ष अनिल अंबानी, माजी संचालक मंजरी अशोक कक्कर आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध १,०८५ कोटींहून अधिक रकमेच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे. यामुळे अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या आहेत.
५ मार्च रोजी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपींवर एप्रिल २०१३ ते मार्च २०१७ दरम्यान पंजाब नॅशनल बँक आणि तत्कालीन युनायटेड बँक ऑफ इंडिया (जी नंतर पीएनबीमध्ये विलीन झाली) यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीमुळे कर्ज देणाऱ्या बँकांना १,०८५ कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाले.
सीबीआयने आरोप केला आहे की कंपनी आर्थिक शिस्त राखण्यात अपयशी ठरली, कर्ज निधीचा गैरवापर केला आणि बँकांनी मंजूर केलेल्या कर्ज सुविधांच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केले. परिणामी, कर्ज खाते अनियमित झाले आणि जून 2017 मध्ये ते एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आले. बँकेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित पक्षांच्या सहभागातून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
सीबीआयने टेलिकॉम कंपनीविरुद्ध नोंदवलेला हा तिसरा खटला आहे. २४ फेब्रुवारी रोजी, एजन्सीने आरकॉम, अंबानी आणि इतरांविरुद्ध बँक ऑफ बडोदाची सुमारे २,२२० कोटींची फसवणूक केल्याबद्दल आणखी एक खटला दाखल केला. एजन्सीने आरोप केला आहे की कर्जाची रक्कम संबंधित संस्थांसोबत बनावट व्यवहारांद्वारे वळवण्यात आली आणि अनियमितता लपविण्यासाठी आरकॉमच्या आर्थिक नोंदींमध्ये फेरफार करण्यात आला. सीबीआयच्या मते, २०१७ मध्ये बीओबीसोबतचे कर्ज खाते देखील एनपीए घोषित करण्यात आले होते.
दरम्यान, ईडी देखील कथित फसवणुकीशी जोडलेल्या संशयास्पद मनी लाँडरिंग अँगलची देखील चौकशी करत आहे. एजन्सीने रिलायन्स समूहातील कंपन्यांच्या १५,७०० कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये मुंबईतील अंबानींच्या ३,७१६.८३ कोटींच्या निवासी मालमत्तेचा समावेश आहे.




