छत्रपती संभाजी नगर – किर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांना घरात घुसून त्यांना मारहाण करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनामध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे काही जण संतप्त झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी जमाव करून कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच चंद्रग्रहण लागले होते. या चंद्रग्रहणादरम्यान सांगलीमधील एका गरोदर महिलेने पालेभाज्या, फळे चिरून खात या सर्व अंधश्रद्धा असल्याचा संदेश दिला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरुनच बोलताना निवृत्ती महाराजांनी टीका केली होती. ती महिला आपल्या धर्माची नव्हती, ती दुसऱ्या धर्माची होती. त्यामुळे तुम्हाला आमच्या धर्मावर आक्षेप घेण्याचा मुळीच अधिकार नाही, असं महाराज म्हणाले होते. महाराजांच्या याच वक्तव्यावरुन हा वाद झाला.
त्यानंतर संबंधित व्यक्तींनी जमाव करून कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. या वेळी घरात त्यांचे कुटुंब उपस्थित होते. मारहाणीच्या गोंधळात त्यांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मारहाणीनंतर महाराजांनी व्हिडिओद्वारे जाहीर माफीही मागितली. माझ्याकडून चुकून वादग्रस्त वक्तव्य बोलले गेले, त्याबद्दल मी माफी मागतो, मात्र माझ्या कुटुंबावर, माझ्यावर अशाप्रकारे हल्ला करणे योग्य नाही. कायदेशीर कारवाई करायला हवी होती, असं ते म्हणाले.





