खेळ आयपीएल २०२६ : गुजरात टायटन्सने पहिला विजय मिळवला आहे. त्यामुळे पॉइंट्स टेबलमधील शेवटच्या ५ संघांमध्ये उलथापालथ झाली आहे. मात्र अव्वल ५ संघ पॉइंट्स टेबलमध्ये आपल्या स्थानी कायम आहेत.
गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर आयपीएल स्पर्धेच्या १९ व्या मोसमातील १४ व्या सामन्यात बुधवारी ८ एप्रिलला शेवटच्या चेंडूवर १ धावेने सनसनाटी विजय मिळवला. गुजरातने यासह विजयाचं खातं उघडलं. तर दिल्लीने जिंकलेला सामना गमावला. दिल्लीला हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची सुवर्णसंधी होती. दिल्लीने जवळपास सामना जिंकलाच होता. मात्र शेवटच्या चेंडूवर गेम फिरला आणि गुजरातने दिल्लीवर १ धावेने सनसनाटी विजय मिळवला. या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कोणत्या स्थानी पोहचली आहे? हे जाणून घेऊयात.
सामन्याबाबत थोडक्यात
गुजरातने दिल्लीसमोर २११ धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने या धावांचा शेवटपर्यंत जबरदस्त पाठलाग केला. मात्र दिल्ली शेवटच्या चेंडूवर अपयशी ठरली. दिल्ली शेवटच्या चेंडूत २ धावा करण्यात अपयशी ठरली. दिल्लीची यासह विजयाची हॅट्रिक हुकली. दिल्लीने याआधी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं होतं.
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
गुजरातला विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. गुजरातने २ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये ३ स्थानांची झेप घेतली आहे. जीटीने ३ सामन्यांत १ विजय मिळवला आहे. जीटीचा नेट रनरेट हा -०.२७० असा आहे. गुजरात या विजयासह सहाव्या स्थानी विराजमान झाली आहे. गुजरात या सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी होती. तर गुजरातचा नेट रनरेट हा -०.४२४ असा होता. या विजयामुळे गुजरातच्या नेट रनरेटमध्ये सुधार झाला आहे. गुजरात १९ व्या मोसमात विजय मिळवणारी एकूण आठवी टीम ठरली. तर अद्याप कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच गुजरातच्या विजयामुळे मुंबईची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबई त्याआधी सातव्या स्थानी होती. तर केकेआर नवव्या आणि सीएसके दहाव्या स्थानी आहे.
दिल्लीची मोठी संधी हुकली
दिल्लीला गुजरात विरुद्ध जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेण्याची संधी होती. मात्र डेव्हीड मिलर याच्या एका चुकीमुळे विजयाचं रुपांतर झटक्यात पराभवात झालं. दिल्लीचा हा या मोसमातील पहिला पराभव ठरला. ताज्या आकडेवारीनुसार, दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी विराजमान आहे. दिल्लीने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. दिल्लीचा नेट रनरेट हा +०.८११ असा आहे. दिल्लीचा नेट रनरेट गुजरात विरूद्धच्या सामन्याआधी +१.१७० असा होता.
गुरुवारी केकेआर विरुद्ध लखनौ सामना
दरम्यान गुरुवारी ९ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स अशी लढत होणार आहे. केकेआरचा हा सामना जिंकून विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.





