सातारा – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रिया शिंदे यांच्या कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्रावर आक्षेप घेत कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. संतोष साळुंखे व जयदीप मगर यांनी त्यांचे अध्यक्षपद रद्द करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी काही तास अगोदरच हे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता.
जयदीपकुमार मगर व संतोष साळुंखे यांनी शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी मिळवलेलं कुणबी प्रमाणपत्र खोटं असल्याची तक्रार जात पडताळणी समितीकडे केली आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रं, चुकीचे पुरावे, कुटुंबाची वंशावळ, रहिवासाचे मूळ ठिकाण लपवून, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांशी संगनमत करून कुणबी खोटं प्रमाणपत्र मिळवल. त्यामुळे त्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जयदीपकुमार मगर व संतोष साळुंखे यांनी केली आहे.
जयदीपकुमार मगर व संतोष साळुंखे यांच्या वतीने वकील दत्तात्रय घोडके यांनी याप्रकरणी वकीलपत्र सादर केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी असलेल्या प्रिया शिंदे यांनी मिळवलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे नियमांना हरताळ फासून आणि घाईघाईत मिळवले आहे. प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेले हे प्रमाणपत्र वैध ठरवू नये. या प्रकरणाची सखोल सुनावणी व्हावी आणि आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी समितीकडे करण्यात आली आहे.
प्रिया शिंदे यांनी खटाव जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. नामनिर्देशनपत्रात त्यांनी जातीचा उल्लेख केवळ मराठा असा केला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी त्यांनी कुणबी जातीचं खोटं प्रमाणपत्र सादर केलं आहे. प्रिया शिंदे कुणबी नसून मराठा आहेत, हे शासन दरबारी असलेल्या नोंदीवरून स्पष्ट होते.
प्रिया शिंदे या कधीही वडूजमध्ये वास्तव्यास नव्हत्या. मात्र, जात प्रमाणपत्रासाठीच्या अर्जात त्यांनी वडूजचा चुकीचा पत्ता दिला आहे. आधारकार्डवरील पत्ता, इतर कागदपत्रांवर असणारे पत्ते विचारात न घेता आणि दबावापोटी चौकशी न करता मंडल अधिकाऱ्यांनी अहवाल दिला. त्यामुळे प्रिया शिंदे यांना दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयदीपकुमार मगर व संतोष साळुंखे यांनी केली आहे.





