पुणे – एका डॉक्टरची १२ कोटींची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुण्याच्या डॉक्टरला एका ग्रुपमध्ये जॉईन केले आणि नंतर फसवणुक झाली आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात ७५ वर्षीय डॉक्टरची १२.३१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ११ दिवसांत पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत बनावट ॲपद्वारे हा घोटाळा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
फसवणूक करणाऱ्यांनी या ज्येष्ठ नागरिकाला सांगितले की, त्यांच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक केवळ ११ दिवसांत ५४ कोटी रुपयांपर्यंत फायदा देईल. झटपट आणि प्रचंड नफ्याच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून पीडित व्यक्तीने काही आठवड्यांमध्ये वारंवार पैसे ट्रान्सफर केले. या फसवणुकीची सुरुवात यावर्षी जानेवारी २०२६ मध्ये झाली. पीडित डॉक्टरला एका अनोळखी नंबरवरून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवून देण्याचा मेसेज आला होता.
डॉक्टरांनी यात इच्छा दाखवल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांना व्हीआयपी स्टॉक २४ नावाच्या हॉटसॲप ग्रुपमध्ये ॲड केले. या ग्रुपमधून आरोपी आकर्षक आणि फायदेशीर वाटणाऱ्या गुंतवणूक योजनांची माहिती शेअर करत होते. पीडित व्यक्तीला वारंवार सांगण्यात येत होते की, त्यांनी दिलेल्या सूचनांचे अचूक पालन केल्यास केवळ ११ दिवसांत त्यांचे पैसे अनेक पटींनी वाढतील, जास्त फायदा मिळेल. या प्रकरणात आरोपींकडून बनावट ट्रेडिंग ॲपचा वापर करण्यात आला आहे. आणि नफा मिळण्याचे आश्वासन देऊन पुण्यातील डॉक्टरची मोठी आर्थिक फसवणुक केली आहे.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार पीडित व्यक्तीने इच्छा दाखवल्यानंतर, त्याला एका बनावट ट्रेडिंग ॲपचा वापर करून फसवण्यात आले आहे. या ॲपचे नाव एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीसारखेच ठेवण्यात आले होते, जेणेकरून ते विश्वास वाटावा. पीडित व्यक्तीकडून त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीला विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यांनी पाठवलेले पैसे या बनावट ॲपवर गुंतवणूक म्हणून दाखवले जात होते. आणि त्यावर खोटा नफा दाखवून योजना खरी असल्याचा भास निर्माण केला जात होता.
७ मार्च २०२६ ते १८ मार्च २०२६ या काळात पीडित डॉक्टरने एकूण ८ मोठे आर्थिक व्यवहार केले आहेत. आणि सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या ८ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण १२.३१ कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. पुणे पोलिसांनी सांगितले की, जेव्हा पीडित व्यक्तीने आणखी पैसे गुंतवण्यास नकार दिला, तेव्हा आरोपींनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली आहे, आणि त्यांना पुन्हा पैसे पाठवण्यास भाग पाडले आहे. 3 महिन्यांच्या कालावधीत पीडित डॉक्टर फायद्याच्या आशेने पैसे पाठवत होते.
मात्र, कोणताही फायदा व पैसे परत न मिळाल्याने आणि आरोपींनी आणखी पैशांची मागणी केली आहे.फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर पीडित डॉक्टरांनी पुणे सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. आणि पुणे सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे सायबर पोलिस करत आहेत.





