नाशिक – महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. रवींद्र एरंडेने नोकरीचे आमिष दाखवून तरूणांची १३ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या चौकशीत रविंद्र एरंडेच्या घरातून बनावट नियुक्तीपत्रही जप्त केले असून एरंडेने निम्मी रक्कम रोख स्वरूपात स्वीकारल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी रविंद्र एरंडेविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने एरंडेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी रवींद्र एरंडेने स्वतः सातपूर पोलीस ठाण्यात त्याला चार जण अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १२ लाख रुपयांची खंडणी मागत असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी या चार जणांना अटक केल्यानंतर तपासादरम्यान धक्कादायक पुरावे समोर आले. एरंडेच्या टॅबमध्ये तब्बल ८७ अश्लील व्हिडिओ सापडले होते. पोलिसांनी एरंडेच्या ताब्यातून ४ मोबाईल, २ पेनड्राइव्ह आणि १ मेमरी कार्ड जप्त केल्यानंतर एरंडेचे बिंग फुटले.
यानंतर एरंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी नाशिक पोलिसांनी आपल्या खास शैलीत चौकशी केली. सुरुवातीला पोलीस कोठडीत रवींद्र एरंडे तपासात पोलिसांना सहकार्य करत नव्हता. मात्र, त्याला पोलिसी हिसका दाखविताच ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असा नारा एरंडेने दिला. चौकशीनंतर रवींद्र एरंडे हा जेव्हा क्राइम ब्रांचच्या कार्यालयातून बाहेर पडला तेव्हा तो लंगडत चालत होता. लंगडत चालताना तो हा जोडून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ हे सातत्याने उच्चारत होता.
दरम्यान, महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर रात्री उशीरा आणखी एक फसवणुकीचा गुन्हा झाला आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्याने ९ जणांची १३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यासाठी त्याने आदिवासी विभागात नोकरीचे आमिष दाखवले. पोलिसांना चौकशीत रविंद्र एरंडे याच्या घरातून सरकारी नोकरीचे तीन बनावट नियुक्तीपत्रही जप्त केले आहे. या फसवणुकीत रवींद्र एरंडे याने आर्धी रक्कम रोख स्वरूपात स्वीकारल्याची माहितीही समोर आली आहे.
भोंदू अशोक खरातप्रमाणेच संशयित रवींद्र एरंडे यानेही महिलांना विविध स्वरूपाचे आमिष दाखवत भोंदूगिरी केल्याचे उघड झाले आहे. एरंडेच्या कार्यालयातून पोलिसांनी सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी जप्त केली. यावरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन मोठी मागणी केली आहे. समितीने म्हटले आहे कि रवींद्र एरंडे हा अघोरी अमानुष प्रकारांसाठी विविध वन्यजीवांच्या अवयवांची, जादूटोण्याची भीती दाखवून तसेच गरजूंना नोकरी, व्यवसाय मिळवून देण्याचे आमिष दाखवून, वेगवेगळ्या प्रकारचे शोषण करीत असल्याची शंका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आहे. एरंडेची सखोल चौकशी करून सबळ पुरावे मिळवावेत. यासह त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यासह, वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.





