रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर गोत्यात; ७० कोटींच्या बेनामी अकाऊंट प्रकरणी ईडीने बजावली नोटीस

SHARE:

मुंबई – नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची बहिण प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणी कायम आहेत. समता पतसंस्थेतील बेनामी अकाऊंट प्रकरणात शिर्डी पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. यानंतर आता ईडीने या प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांना नोटीस बजावली असून पुढील आठवड्यात चौकशी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाचे समता पतसंस्थेत चार खाते आहेत. त्यांच्या खात्यातून तब्बल दोन कोटी चाळीस लाखांचा व्यवहार झाल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. आता याच खात्यातून २०२२ ते २०२३ दरम्यान बेनामी अकाऊंट्सद्वारे ७०.६४ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. अशोक खरात याने १३४ हून अधिक बनावट खाती उघडून निधी वळवल्याचा संशय आहे. भक्तांकडून केवायसी कागदपत्रे घेऊन त्यांच्या नकळत खाती उघडण्यात आली आहेत. त्यामळे ईडीने प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांना नोटीस बजावली असून पुढील आठवड्यात चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.

रूपाली चाकणकर यांनी खरातशी कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते मात्र, ज्या पतसंस्थेतून खरातने व्यवहार केले, त्याच समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांचे खाते असल्याचे आढळून आले आहे. तपासात याच खात्यातून २०२२ ते २०२४ दरम्यान ७० कोटी रुपयांहून अधिक संशयित व्यवहार आढळले आहेत.

अशोक खरातने अनेक व्यक्तींच्या कागदपत्रांचा वापर करून विविध पतसंस्थांमध्ये शेकडो बेनामी खाती उघडली होती, ज्यामध्ये तो स्वतः नॉमिनी होता. ज्यांचा वापर पैशांची लेयरिंग करण्यासाठी करण्यात आला. या संशयास्पद व्यवहाराची ईडी आता सखोल चौकशी करणार आहे. चाकणकर कुटुंबासाठी ईडीची नोटीस मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणात पतसंस्थेचे संचालक संदीप कोयते यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Leave a Comment