कांद्याला कवडीमोल भाव अन् कर्जाचा डोंगर; कांदा उत्पादक शेतकऱ्याने कापला जीवनाचा दोर

SHARE:

नाशिक – एकीकडे केंद्र सरकार दावा करते कि शेतकर्यांचं उत्पन्न दुपटीने वाढलं मात्र दुसरीकडे कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान कांद्याला मिळालेल्या कवडीमोल भावामुळे कर्ज कसे फेडावे या नैराश्यातून एका अल्पबुधारक शेतकर्याने आपल्या जीवनाचा दोर कापला. गुलाब निकम असे या मृत शेतकर्याचे नाव असून ते नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील राहुड येथील रहीवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मृत गुलाब निकम यांच्याकडे केवळ तीन एकर शेती आहे. याच तीन एकर शेतीच्या उत्पन्नातून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत होते. शेतीतून चांगलं उत्पन्न मिळावे यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते, मात्र परतीच्या पावसाने कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते.

एकीकडे पिकाचे झालेले नुकसान आणि दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने निकम यांच्यावर कर्जाचा भार वाढतच गेला. या दुहेरी संकटामुळे नैराश्यात गेलेल्या गुलाब निकल या शेतकर्याने टोकाचा निर्णय घेत गळफास लावून आत्महत्या केली.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून 1235 रुपये क्विंटलनं कांदा खरेदी सुरू केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 50 पैसे ते 6 रूपये प्रतिकीलो दर मिळत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो 18 रुपयांपर्यंत पोहोचला आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना जवळपास 10 ते 12 रूपये तोटा सहन करावा लागत आहे.

बीड जिल्ह्यातील धारूर येथील शेतकरी संतोष शिनगारे यांनी सोलापूर मार्केटला कांदा आणला. त्यांच्या 6 क्विंटल 2 किलो कांद्याला 50 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यातून त्यांना 1,538 रुपये मिळाले. मात्र वाहतूक भाडं, हमाली, तोलाई, वारणी, इतर खर्च 24 रुपये, असा एकूण खर्च 1839 रुपये आला. 1,538 रुपये कांद्याचे मिळाले आणि खर्च आला 1839 रूपये. यामुळे त्यांना 301 रुपये आपल्या पदरातून भरावे लागले.

दरकपातीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदानाची अपेक्षा होती. मात्र याबाबत कोणतीही ठोस घोषणा न झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार रुपये हमीभाव आणि किमान 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment