कर्नाटकात काळाचा घाला: शिंपले वेचायला गेलेल्या एकाच कुटुंबातील १० जणांचा बुडून अंत

SHARE:

कर्नाटक – कारवारमध्ये शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 10 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबातील लोकांचा खाडीत बुडून मृत्यू झाला. कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात रविवारी ही घटना घडली आहे. शिराळी येथील तट्टीहक्कू परिसरातील वेंकटापूर खाडीत शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील लोकांवर काळाने झडप घातली. समुद्राच्या भरतीमुळे खाडीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने झालेल्या या भीषण दुर्घटनेत 10 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. 3 महिलांना बचाव पथकांनी वाचवले आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिराळीतील शारदहोळे परिसरात राहणाऱ्या नाईक कुटुंबातील 13 सदस्य रविवारी सकाळी वेंकटापूर खाडीत पारंपरिक पद्धतीने शिंपले गोळा करण्यासाठी गेले होते. स्थानिक भागातील अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे अशा प्रकारे खाडीत जाऊन शिंपले गोळा करण्याचे काम करतात. मात्र, यावेळी भरतीमुळे खाडीतील पाण्याची पातळी वेगाने वाढली. परतीच्या मार्गावर काही जण खोल पाण्यात अडकले. आणि ही मोठी दुर्घटना घडली आहे.

या दुर्घटनेत 8 महिला आणि 2 पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तर महादेव जट्टप्पा नाईक हे अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. बचावलेल्या 3 महिलांना उपचारासाठी उडपी आणि मणिपाल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये लक्ष्मी मादेव नाईक, लक्ष्मी महादेव नाईक, लक्ष्मी शिवराम नाईक, उमेश मंजनाथ नाईक, मास्तम्मा मंजुनाथ नाईक, लक्ष्मी अण्णप्पा नाईकज्योती, नाईक, मालती नाईक, मंजम्मा गोत्ता नाईक आणि नागरत्ना परमेश्वर नाईक यांचा समावेश आहे.

तर या दुर्घटनेतून बचावलेल्या मादेवी मंजुनाथ नाईक, लता जगदीश नाईक आणि नागरत्ना ईश्वर नाईक यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यापैकी दोघींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, बचाव पथके आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खाडीत शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्यात आले. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. या घटनेनंतर तालुका रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावल्याने कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आहेत.

संपूर्ण भटकळ तालुक्यावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, समुद्रात भरती सुरू झाल्यानंतर खाडीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. खाड्यांमध्ये भरती-ओहोटीचा परिणाम अतिशय वेगाने जाणवतो. पाण्याची पातळी काही मिनिटांत वाढू शकते. शिंपले गोळा करण्यात गुंतलेल्या कुटुंबीयांना वाढत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते अडचणीत सापडले. काही जण खोल पाण्यात वाहून गेले. आणि ही मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक भागांमध्ये पूर्वसूचना यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.

तसेच भरती-ओहोटीची माहिती देणारे इशारा फलक, सुरक्षित वेळापत्रक आणि सतर्कता उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. झखाडी परिसरात शिंपले गोळा करणे, मासेमारी करणे किंवा पाण्यात उतरून कोणतेही काम करताना भरती-ओहोटीच्या वेळांची अचूक माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे असते. भटकळमधील वेंकटापूर परिसरातील खाडीवरही समुद्राच्या भरतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने पाण्याची पातळी अचानक वाढल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. या दुर्घटनेमुळे खाडी भागांतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा