नवी दिल्ली – महागाईच्या काळात जगणे कठीण झाले असताना सर्वसामान्य जनतेला महागाईचे झटक्यावर झटके बसत आहेत. गेल्या महिन्यात केवळ 10 दिवसांत डिझेल- पेट्रोलचे दर चार वेळा वाढवण्यात आले. आता सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. जून महिन्याचा पहिलाच दिवस महागाई घेऊन आला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच दिवसी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, 5 किलोचा छोटा घरगुती सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही
आजपासून 19 किलोच्या कमर्शिअल सिलिंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईपासून चेन्नई आणि दिल्लीपर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. नव्या दरांनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत वाढून 3,113.50 रुपये झाली आहे. तर कोलकातामध्ये हा दर 3,255.50 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत 3,024 रुपयांवरून 3,067.50 रूपये झाली आहे. राजधानी दिल्लीत हा सिलिंडर 3,071.50 रुपयांऐवजी आता 3,113.50रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत 3,237 रुपयात मिळणारा सिलिंडर आता 3,283 रुपयात मिळणार आहे.
याशिवाय, 5 किलोचा छोटा घरगुती सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. याची किंमत 339 रुपये इतकी झाली आहे. आखाती देशात युद्ध सुरू झाल्यापासून कमर्शिअल सिलिंडरच्या किमतीत तब्बल 1,373 रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये मागील महिन्यात झालेल्या 993 रुपयांच्या मोठ्या वाढीचाही समावेश आहे. या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर या काळात फक्त 60 रुपयांनी वाढले आहेत.
कमर्शियल सिलेंडरच्या वाढलेल्या दरांचा परिणाम हाॅटेल, रेस्टाॅरंट, केटरिंग व्यवसाय तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांवर होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. आधीच महागाईचा सामना करणार्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा आणखी एक मोठा आर्थिक झटका मानला जात आहे. या दरवाढीमुळे बाहेरचे जेवण मागवणे किंवा खाने महाग होण्याची शक्यता आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






