तामीळनाडूतील क्रांती-प्रतिक्रांती; मंडलयुगाने व पेरियार युगाने दलित-ओबीसी एकत्र आणलेत, म्हणून ब्राह्मणवाद गाडू शकलेत.

SHARE:

(भाग – ६) – ‘जेव्हा आपण दुसर्‍याकडे एक बोट दाखवितो तेव्हा आपल्याकडे चार बोटं असतात’ याप्रमाणे तामीळनाडूमध्ये जे काही घडलं ते विजय व त्याच्या खांद्यावर बसलेले संघ-भाजप-कॉंग्रेस कसे जबाबदार आहेत हे आपण पाहिले. संघ-भाजपाच्या षडयंत्राला दलित व ख्रिश्चन वोटबँक कशी बळी पडली, हेही आपण पाहिले. परंतू या परिस्थितीला स्वतः स्टॅलिन, त्यांचा डीऐमके पक्ष व त्यांचे मार्गदर्शक तत्वज्ञान पेरियारवाद हे तिन्ही घटकही कसे व किती जबाबदार आहेत, याचीही चर्चा होणे आवश्यक आहे.

२०१९ व २०२४ च्या निवडणूकांआधीच रजनीकांत व कमल हासन या दोघा सुपरस्टारचे राजकीय ब्राह्मणी संघी-बेत फसलेत व त्यांनी स्टॅलिनसमोर सपशेल माघार घेतली. त्यामुळे स्टॅलिन निवांत झाले होते. परंतू एक-दोन प्रयोग फसल्यानंतर संघ-भाजपा शांत बसणार होती का? अजिबात नाही. याच काळात मला चेन्नइचे बोलावणे आले. १ मे २०२१ रोजी चेन्नई येथे ९ वी अखिल भारतीय समाजिक न्याय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत निमंत्रित वक्ता म्हणून मी उपस्थित होतो. वेळेच्या बंधनामुळे मला माझे भाषण संक्षिप्त करावे लागले. त्यात मी ब्राह्मणी छावणीच्या विरोधात लढणार्‍या देशातील तीन मॉडेलबाबत चर्चा केली. कांशिराम यांचे जाती-जोडो फुलेआंबेडकरवादी मॉडेल, लालू-मुलायम यांचे मंडल-युगाचे समाजवादी-लोहियावादी मॉडेल व स्टॅलिन-करूणानिधीचे ब्राह्मणवादविरोधी पेरियारवादी मॉडेल! कांशिराम मॉडेल व लालू-मुलायम मॉडेल ही दोन्ही मॉडेल्स निकामी झाली असून आता केवळ एकमेव आशेचा किरण म्हणून जीवंत असलेले पेरियारवादी मॉडेलच प्रभावीपणे काम करीत आहे. अशी मांडणी केल्यानंतर देशात मोठ्या वेगाने पेशवाईची घोडदौड सुरू असल्याचेही मी सांगीतले. पेशवाईच्या या घोडदौडीत तामीळनाडूचा मजबूत किल्ला ढासळू नये म्हणून मी भाषणाच्या शेवटी सहा कलमी कार्यक्रम सुचविला होता, तो पुढीलप्रमाणे- (मूळ इंग्रजीतील भाषण मराठीत रुपांतरीत केलेले-

‘‘तामीळनाडूतील सामी पेरियारवादी जात्यंतक पक्षांनी अनेक क्रांतीकारक कायदे करून ब्राह्मणवादाला जेरीस आणले व पराभुत केले आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की, तामीळनाडुमधील जातीव्यवस्था नष्ट झालेली आहे. भारतातील जातीव्यवस्था कायम ठेवून एकट्या तामीळनाडूमधून जातीव्यवस्था नष्ट करणे शक्य नाही. त्यासाठी तामीळनाडूच्या ओबीसी नेतृत्वाला देशपातळीवरच्या जातीअंताच्या लढ्याचे नेतृत्व करावे लागेल. तामीळनाडूच्या ओबीसी नेतृत्वाला देशपातळीवरील पुढील कृतीकार्यक्रम ताबडतोब हाती घ्यावे लागतील.

१) उत्तरभारतात ब्राह्मणावादाने पुर्ण कब्जा केलेला असला तरी दक्षिणेकडच्या राज्यात अजुनही ‘अ-ब्राह्मणवाद’ थोड्याफार प्रमाणात जीवंत आहे. त्याला पुर्ण ताकदीने उभे करण्यासाठी तामीळनाडूच्या ओबीसी नेतृत्वाखाली ‘‘सीता, शंबुक, एलकलव्य, रावण व बळीराजा गौरवयात्रा’’ दक्षिणेकडील राज्यातून निघाली पाहिजे.

२) तामीलनाडूमधील सामी पेरियार यांच्या विचार-कार्यावर आधारित पुस्तकांचे भाषांतर देशातील सर्व भाषांमध्ये करून त्या-त्या राज्यांमध्ये पाठवीले पाहिजेत.

३) आम्ही २७ वर्षांपासून ‘फुले आंबेडकर विद्यापीठ’ स्थापन करुन महाराष्ट्रात फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर परीक्षा आयोजित करीत आहोत. त्याच धरतीवर ‘‘सामी पेरीयार फुलेआंबेडकर विद्यापीठाची स्थापना’’ करून देशभरात विविध भाषांमध्ये राज्यस्तरीय परीक्षा आयोजित केल्यात तर तरूण पिढीला सामी पेरीयार यांचे विचार व कार्य माहीत होईल.

४) प्रत्येक राज्यात काही ओबीसी कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत. मात्र प्रस्थापित-जातींच्या राजकीय पक्षातील ओबीसी नेते त्यांच्या कार्यात अडथळे आणीत असतात. अशा अपक्ष कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तामीळनाडू सरकारने त्यांना गौरवान्वीत केले पाहिजे व त्यांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे.

५) प्रत्येक राज्यातील अशा प्रामणिक ओबीसी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन देश पातळीवर डीऐमके सारखाच ओबीसींच्या नेतृत्वाखाली नवा ‘अब्राह्मणी पक्ष’ स्थापन करता येईल.

६) हिंदी भाषेच्या अभावात तामीळनाडू देशापासून तुटलेला आहे. आता हिंदी भाषेचा सदुपयोग करीत तामीळनाडूने देशाशी जोडून घ्यावे व जातीअंतक अब्राह्मणी क्रांतीचे नेतृत्व करावे.

उपरोक्त कृतीकार्यक्रम ताबडतोबीने हाती घेऊन देशपातळीवरच्या जातीअंताच्या चळवळीचे नेतृत्व करावे व देशात खर्‍या अर्थाने तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या स्वप्नातील समतावादी ‘बळीराष्ट्र’ स्थापण्याची मुहुर्तमेढ रोवावी. धन्यवाद!…’’   

माझे हे भाषण चेन्नईतून प्रकाशित होणारे इंग्रजी व तामीळ भाषेतील मासिक ‘‘OBC Voice’’ ने पूर्णपणे व जसेच्या तसे छापले. हे मासिक डीएमके पक्षाचे मुखपत्र नसले तरी ते एकमेव पेरियारवादी मासिक असल्याने तामीळनाडूचे दलित-ओबीसी नेते नियमितपणे वाचतात. त्यामुळे माझे हे भाषण स्टॅलिन यांच्या नजरेखालून निश्चितच गेलेले असणार! मी सुचविलेल्या सहा कलमी कार्यक्रमाबाबत ते काहीतरी प्रतिक्रिया देतील किंवा कार्यवाही करतील असे मला वाटले होते, परंतू तसे काहीही झाले नाही. याचा अर्थ ते रजनीकांत व कमल हासन शांत झाल्यावर निवांत झाले होते. हे गाफील राहणे त्यांना भोवले. राज्यातील सत्ता आपल्याच पक्षाच्या ताब्यात राहीली पाहिजे, यासाठी जे जे करावे लागते ते ते सर्वकाही केले जाते. तामीळनाडूची जनता पेरियारवादी आहे म्हणून राज्यात ब्राह्मणावादाविरोधात अधिकाधिक कडक कायदे करीत राहील्याने सत्ता आपल्याच पक्षाच्या ताब्यात राहील, याची खात्री स्टॅलिनला होती.

मात्र आपला शत्रू असलेला संघ-भाजपा राज्याबाहेर काय काय षडयंत्रे करून पेशवाईची घोडदौड करीत आहे, याची दखल स्टॅलिन यांना घ्यावीशी वाटली नाही. राज्याबाहेरील प्रामाणिक कार्यकर्ते संघ-भाजपाच्या विरोधात कसे लढत आहेत व त्याविषयी ते काय मांडणी करित आहेत, याची साधी माहिती घेण्याचेही भान त्यांना येत नाही. माझ्यासारखा आजन्म जात्यंतक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता चेन्नईत येउन आपल्यासाठी काही मुद्दे देत आहे, त्यांची दखल घेतली पाहिजे, असे स्टॅलिन यांना कधीच वाटले नाही. आपली राज्यसत्ता सुरक्षित ठेवण्यावरच ते समाधानी राहीले. शेजारची केरळम, आंध्र प्रदेश व कर्नाटक या दक्षिणी राज्यांमध्येही ब्राह्मणवादविरोधी परंपरा आहे, परंतू तेथेही ब्राह्मणशाहीची आग लागलेली आहे, याची दखल स्टॅलिन यांना घ्यावीशी वाटत नाही. शेजारच्या घरात आग लागली तर ती आग आपल्याही घराला जाळून खाक करेल, असा साधा कॉमन सेन्स स्टॅलिन यांच्याकडे नसावा?

    लालू-मुलायम यांचे लोहियावादी-समाजवादी मॉडेल क्रांतिकारक होते. कारण मंडल-युगाला जन्म देणारे व मंडल युगाचे यशस्वी राजकारण करून दलित-ओबीसी या दोन्ही क्रांतीकारक समाज-घटकांना एकत्र आणण्याचे काम लालु-मुलायम यांनी केले व खर्‍या अर्थाने ब्राह्मणी-संघ-भाजपाशी काडीईतकीही तडजोड न करता जीवावर उदार होऊन ब्राह्मणावादाला राजकीय सत्तेतून हद्दपार केले. परंतू कोणतेही तत्वज्ञान कीतीही क्रांतीकारक वा प्रतिक्रांतीकारक असले व ते काही काळ यशस्वीपणे कामही करते, परंतू ते तत्वज्ञान परीपूर्ण असू शकत नाही. प्रत्येक तत्वज्ञानाला काळाच्या मर्यादा असतात, त्या ओळखून ते तत्वज्ञान विकसित करायचे असते. परंतू, लोहियावादाच्या गंभीर मर्यादा लालू-मुलायम यांनी लक्षात घेतल्याच नाहीत. कर्पूरी ठाकूर, लालू, मुलायम यासारखे दिग्गज राष्ट्रीय ओबीसी नेते मंडल-युगाची उभारणी करीत असतांना तिकडे ब्राह्मणवादी संघ-भाजप रामाचे ब्राह्मणी प्रतिक वापरून मंडलविरोधी युद्धाची जोरदार तयारी करीत होते. ब्राह्मणवादी युद्ध छावणी जात्यंतक मैदानावर येउन कधीच लढत नाही, ती तुम्हाला सांस्कृतिक मैदानावर घेउन जाते व तेथे तुम्ही हत्यार खाली ठेवण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नाहीत.

लोहियावादी लालू-मुलायम रामाच्या विरोधात सांस्कृतिक लढाई लढूच शकत नाहीत, कारण खुद्द लोहिया राम-कृष्णाचे निःसीम भक्त होते. आजही लालू-मुलायम पुण्यात आल्यावर तात्यासाहेबांच्या फुलेवाड्यावर कधीच जातांना दिसत नाहीत. किंवा मुंबईत आल्यावर बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर जातांना कधीच दिसत नाहीत. मात्र शिर्डी के साई बाबाला न विसरता भेटायला जातात. हा लोहियावादाचा परिणाम आहे. लालू-मुलायम फुले-आंबेडकरवादी किंवा पेरियार वादी असते तर त्यांनी भाजपच्या रामरथाला सीता, शंबूक, एकलव्य, रावण, बळाराजा अशी अ-ब्राह्मणी प्रतिके घेउन बिहार-उत्तरप्रदेशात रथयात्रा काढल्या असत्या व रामासकट संघ-भाजप-कॉंग्रेसला कायमचे गाडून टाकले असते. जे काम सामी पेरियार यांनी तामीळनाडूमध्ये ६० वर्षे आधीच केले ते काम लालू-मुलायम बिहार-उत्तरप्रदेशात का करू शकले नाहीत? याचे उत्तर त्यांनी स्वीकारलेल्या लोहियावादात आहे. लोहियावादाच्या सांस्कृतिक मर्यादा लालू-मुलायम तोडू शकले नाहीत!

मात्र फुले-आंबेडकरवादाला अशी सांस्कृतिक मर्यादा नसतांना कांशीराम साहेब उत्तरप्रदेशात पेरियारसारखे काम का करू शकले नाहीत, असा प्रश्न उभा राहतो. कारण कांशिरामजी स्वतःला फुले-आंबेडकरवादी म्हणून जाहीर केले होते. तात्यासाहेबांनी ‘गुलामगिरी’, ‘शेतकर्‍याचा असूड’ व बाबासाहेबांनी ‘रिडल्स इन हिन्दुझम’ यासारख्या क्रांतीकारक ग्रंथांमधुन राम-कृष्णाच्या विरोधात लढण्यासाठी धारदार आधुनिक शस्त्रे दिल्यानंतरही कांशिरामजी यांनी रामाच्या विरोधात लढण्याचे धाडस केले नाही. तात्यासाहेबांनी दिलेले बळीराजाचे सांस्कृतिक प्रतिक व बाबासाहेबांनी दिलेले शंबूकाचे प्रतिक कांशिराम साहेबांनी कधीच स्वीकारले नाहीत. त्यामुळे ते संघ-भाजपाच्या (रामाच्या) विरोधात ते कधीच लढू शकले नाहीत. संघ-भाजपाला फायदेशीर ठरेल, असेच राजकारण कांशीरामजी करत राहीलेत. त्यांनी तामीळनाडूच्या ‘विजय’प्रमाणेच फुलेआंबेडकरांचे फोटो फक्त वापरलेत. आपल्या केडर कॅम्पमध्ये त्यांनी कधीच बाबासाहेबांच्या रिडल्स ग्रंथाचा उल्लेख केला नाही व राम-कृष्णाबाबत ‘ब्र’ शब्दानेसुद्धा कधी वैचारिक भुमिका मांडली नाही. 

कांशिराम साहेब ‘‘मी बाबासाहेबांचे ‘एन्निहिलेशन ऑफ कास्ट’ १० वेळा वाचून काढले’’ असे अभिमानाने नेहमीच सांगायचे! मग कांशिरामसाहेबांनी बाबासाहेबांचे ‘रिडल्स इन हिन्दुझ,’ एकदाही वाचले नसेल, असे कसे म्हणता येईल? कांशिराम साहेबांनी केडर कॅम्पमध्ये रिडल्स इन हिन्दुझम मधील राम-शंबुकाचे कोडे समजावून सांगीतले असते तर बसपा कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशात रामरथाच्या विरोधात शंबुकरथ निशचित काढला असता! उत्तर प्रदेशात संघ-भाजपाच्या रामाला मोकळे मैदान करून देणे, ही फुले-आंबेडकरवादाची मर्यादा नव्हती तर ती स्वतः कांशीरामजी यांची मर्यादा होती. संघ-भाजपा एका कणाइतकेही नाराज होणार नाहीत, याची कांशिरामजी यांनी डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. याचाच (गैर)फायदा उचलत बहन मायावतींनी कधी सरळ ब्राह्मण जातीशी तर कधी संघाशी व कधी भाजपशी दोस्ती करीत बाबासाहेबांच्या हत्तीला ‘गणेश’ बनवीले व ब्राह्मणांचा बाप असलेल्या परशुरामाला डोक्यावर घेउन नाचली.

सामी पेरियार यांनी फुले-आंबेडकरवादाच्या पुढे जाउन अ-ब्राह्मणवादाला आक्रमक निरिश्वरवादाची जोड देउन ‘‘पेरीयारवाद’’ सिद्ध केला व ब्राह्मणी संस्कृतीविरोधात म्हणजे राम, गणपती, सरस्वती यांच्याविरोधात रस्त्यावर येउन मैदानी लढाई केली व जिंकली. लालु-मुलायम संघ-भाजपाच्या विरोधात केवळ राजकीय मैदानात लढत होते. संघ-भाजपाचा प्राण असलेल्या सांस्कृतिक मैदानात लालु-मुलायम लढूच शकले नाहीत. कांशीरामसाहेब संघ-भाजापाच्या विरोधात ना राजकीय मैदानात लढलेत ना सांस्कृतिक मैदानात! कांशीराम, लालू, मुलायम हे नेते ब्राह्मणवादाविरोधाच्या लढाईत सपशेल पराभूत झालेत. नेते चूका करू शकतात, कार्यकर्त्यांनी का म्हणून त्या पुन्हा पुन्हा कराव्यात? त्यांना जीते-जागते जीवंत असलेले पेरियारवादाचे यशस्वी मॉडेल का दिसत नाही? आजही देशभरचे पुरोगामी कार्यकर्ते व विचारवंत कांशीराम-लालू-मुलायमचे मेलेले मॉडेल्स उरावर घेउन नाचवत असतात. अशाने संघ-भाजपासाठी मैदान साफ होते व त्यांचा पेशवाईचा रामरथ वाजत-गाजत देशभर धुमाकूळ घालतो आहे.

ब्राह्मणवादाच्या विरोधात लढाई यशस्वी करणारे पेरीयार जातीव्यवस्थेच्या विरोधात लढण्यात कमी पडले आहेत. ब्राह्मणवाद व जातीव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी त्या वेगवेगळ्या दोन बाजू आहेत, त्यामुळे जातीव्यवस्थाविरोधात लढण्याचा कार्यक्रम वेगळा असू शकतो, याचे भान पेरीयार यांना कधी आलेच नाही. पेरियारवादाच्या मर्यादा या आहेत की त्यांनी जातीअंताचा ठोस कार्यक्रम बनविलाच नाही. डॉ. बाबासाहेबांनी १९४४ साली लिहिलेल्या पहिल्या राज्यघटनेत वर्गव्यवस्था नष्ट करण्यासाठी उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयकरण व जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी जमीनीचे राष्ट्रीयकरण हे दोन कार्यक्रम दिले होते. त्याच्या जोडीला राज्यसमाजवादाचे फार मोठे क्रांतीकारक हत्त्यार दिले होते. परंतू ब्राह्मणी छावणीशी (कॉंग्रेसशी) दोस्ती करून दुसरी जात-वर्गसमन्वयवादी राज्यघटना लिहून देणे, ही डॉ. बाबासाहेबांची सर्वात मोठी मर्यादा ठरली. पेरियार दुसर्‍या अधिकृत राज्यघटनेला विरोध करीत असतांना त्यांचे पहिल्या राज्यघटनेकडे लक्ष गेलेच नाही, ही गंभीर चूक होती पेरियारवादाची! जमीनीचे फेरवाटप किंवा जमीनीचे राष्ट्रीयकरण झाल्याशिवाय जातीव्यवस्थेला कायमचे जाळून नष्ट करूच शकत नाहीत.

जातीअंताकडे जाण्यासाठी पेरियारवाद पहिला टप्पा आहे. त्यानंतर जात-वर्ग-स्त्रीदास्य नष्ट करण्यासाठी कॉ. शरद पाटलांचा सौत्रांन्तिक मार्क्सवाद हा दुसरा टप्पा आहे. भारतीय राजकारणाला जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची दिशा नाही दिली तर, तरूणाई कधी आण्ना हजारे तर कधी काक्रोच पार्टी या दिशाहीन भ्रामक डबक्यांमध्ये डुबक्या मारत राहील व एके दिवशी गटांगळ्या खात बुडून जाईल, यात शंका नाही.

 

जय जोती, जय भीम व जय पेरियार..!

 

लेखक –
प्रा. श्रावण देवरे
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्क –  ८१ ७७ ८६ १२ ५६

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment