विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न; अंजनगाव बारी येथे 70 रुग्णांची तपासणी

SHARE:

अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल), अमरावती अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या संयुक्त विद्यमाने अंजनगाव बारी येथे नुकतेच भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नराटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय उपचार व सल्ला जागेवरच उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या विशेष तपासणी शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात कर्करोग, हृदयरोग, मेंदूरोग, बालरोग यांसारख्या गंभीर आजारांसह लघवी व किडनी संबंधित विकार, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी आणि कान-नाक-घसा संबंधित आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. तसेच एन.सी.डी. (बिगर संसर्गजन्य आजार) अंतर्गत येणाऱ्या रुग्णांचेही स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी 70 रुग्णांची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या 6 रुग्णांना अमरावती येथील मुख्य विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे. या रुग्णांवर पुढील सर्व उपचार शासकीय योजनांतर्गत मोफत केले जाणार आहेत.

 

शिबिरामध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना गुप्ता, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिंकुजय केचे, शिबीर समन्वयक अधिकारी भूपेंद्र जेवडे, अधिपरिचारिका कशिश दामले, अधिपरिचारक मिलिंद भगत, फार्मासिस्ट प्रतिमा राठोड, रुग्णवाहिका चालक दीपक शर्मा, कक्षसेवक अभिजीत उदयकर आणि आरोग्य सेविका सुजाता रोंडगे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा